Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

गटनेत्यावरून युतीत मतभेद
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

महापालिका आयुक्तांच्या ‘३३जणांच्या एकत्रित गटाचा गटनेता कोण?’ या पत्रानंतर शिवसेना-

 

भारतीय जनता पक्ष युतीत मतभेद निर्माण झाले असल्याचे समजते. आम्हाला विश्वासात घेऊनच नाव निश्चित करावे, असे भाजपचे म्हणणे असून सेनानेत्यांची त्याला तयारी नाही.
लवकरच आम्ही एकत्र बसून यावर निर्णय घेऊ, असे याबाबत बोलताना सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले. सेनेचेच माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी, ‘आमदार अनिल राठोड सध्या मुंबईत आहेत. नगरला आल्यानंतर तेच याबाबत अंतिम निर्णय घेतील’, अशी माहिती दिली. भाजपच्या वतीने या विषयावर उघडपणे बोलायला कोणी तयार नाही. मात्र, सेनानेत्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच हा निर्णय केला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
मनपाच्या ६५ नगरसेवकांमध्ये नाशिक विभागीय आयुक्तांनी फक्त सेना-भाजप युतीने ३ अपक्षांसह नोंदणी केलेला गटच अधिकृत धरला आहे. मात्र, ही गटनोंदणी करताना गटनेत्याचे नाव देण्याचे युतीच्या नेत्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळेच आता मनपा प्रशासनाने ३३जणांचा गट ग्राह्य़ धरला असला तरी या एकत्रित गटाचा गटनेता कोण, याबाबत युतीकडे विचारणा केली आहे. हे ३३जण एकत्र बसून यासंदर्भात अजूनही निर्णय घेऊन मनपा आयुक्तांना कळवू शकतात. मात्र, हा गटनेताच विरोधी पक्षनेता म्हणूनही नियुक्त होणार असल्यानेच युतीत त्याबाबत रस्सीखेच निर्माण झाली असल्याची माहिती मिळाली.
विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती महापौरांनी करायची असली, तरी ती कशी करायची याबाबत मनपा कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार सभागृहातील विरोधी पक्षांपैकी सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या पक्षाच्या गटनेत्यास नियुक्त करणे अपेक्षित आहे. या नियमानुसार ३३जणांचा सेना-भाजप व ३ अपक्षांचा एकत्रित गट हाच विरोधी सर्वात मोठा गट होतो. त्यामुळेच त्यांच्या गटनेत्याला महत्त्व आले आहे. युतीने यापूर्वी मनपा आयुक्तांना पत्र देऊन विरोधी पक्षनेतेपदी बाळासाहेब बोराटे यांची नियुक्ती जाहीर करावी असे सुचवले आहे. मात्र, बोराटे हे गटनेते नसल्याने त्याला कायदेशीर आधार नाही.
सेना-भाजप व ३ अपक्ष यांच्या एकत्रित ३३जणांच्या गटाला नेता नसला, तरी त्यांच्यातील सेना व भाजपने आपापल्या गटनेत्यांची (अनुक्रमे अनिता राठोड व गीतांजली काळे) अधिकृत नोंदणी केली आहे. ३ अपक्षांनी मात्र स्वतंत्रपणे गटनेत्याची नोंदणी केलेली नाही. त्यामुळेच सेना-भाजपची स्वतंत्र गटनोंदणी व गटनेता ग्राह्य़ धरल्यास ३ अपक्षांना स्वतंत्र करावे लागेल व ते युतीच्या दृष्टीने तोटय़ाचे आहे. म्हणूनच त्यांच्यासमोर ३३जणांचा एकत्रित गटनेता नियुक्त करून मनपा आयुक्तांना तसे कळवण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.
सेनेकडून या पदासाठी अनिता राठोड, तसेच बोराटे हे इच्छुक आहेत. ३३जणांच्या गटात सेनेचे सर्वाधिक म्हणजे १८ सदस्य (दोघे बंडखोर असले, तरी गटनोंदणीत असल्यामुळे त्यांची गणना सेनेतच होणार) आहेत. भाजपचे १२ व ३ अपक्ष आहेत. कमी सदस्यसंख्येमुळे भाजपने आपल्या नगरसेवकांमधून कोणाची नियुक्ती करावी असा आग्रह धरलेला नाही. मात्र, सेनेतीलच पण आमची संमती असेल त्यालाच नियुक्त करावे, अशी मात्र मागणी केली आहे.
यासंदर्भात आमदार राठोड यांच्याशी चर्चा करण्यासाठी शहरप्रमुख कदम यांच्यासह सेनेचे काही पदाधिकारी आज मुंबईत गेले असल्याची माहिती मिळाली. निर्णय तेथेच होईल व आमदार राठोड तो नगरमध्ये जाहीर करतील, असे कळते. असे होऊ नये, आमचे मत विचारात घ्यावे म्हणून भाजपच्या एका नेत्याने मुंबईत राठोड यांच्याशी संपर्क साधून नगरमध्येच याची चर्चा करू, असे सुचवले असल्याचे समजले.