Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राजळेंच्या विरोधात गांधींची मुंबईत ‘फिल्डिंग’
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेसचे पाथर्डीतील आमदार राजीव राजळे यांच्या भाजपतर्फे लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीने

 

नगरमधील पक्षाचे प्रबळ दावेदार माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी सावध झाले असून, त्यांनी मुंबईत राजळेंच्या विरोधात जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे.
मतदारसंघातील पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची ते मुंबईत पक्षश्रेष्ठींशी भेट घडवून आणत आहेत. राजळेंना फक्त उमेदवारीच नाही, तर त्यांना पक्षात घेणेच कसे तोटय़ाचे आहे हे या शिष्टमंडळांकडून पक्षश्रेष्ठींना पटवून दिले जात आहे. याशिवाय ‘सत्ताप्राप्तीसाठी भाजप काहीही करेल’ असा चुकीचा संदेश मतदारसंघातील पारंपरिक मतदारांपर्यंत जाण्याची भीतीही पक्षश्रेष्ठींना दाखवण्यात येत आहे. दुसरे इच्छुक माजी नगराध्यक्ष अभय आगरकर हेही राजळे यांच्या विरोधात त्यांच्या नेहमीच्या सुप्त पद्धतीने वातावरण निर्माण करत आहेत. ओबीसी समाजगटाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला असून, भाजपचा हा निष्ठावान मतदार राजळेंच्या उमेदवारीने पक्षापासून दुरावेल असे स्पष्ट मत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नोंदवले असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, भाजपच्या उमेदवारांची दुसऱ्या टप्प्यातील यादी २६ मार्चला जाहीर होणार आहे. त्यामुळे नगर मतदारसंघातील उमेदवारीचा संभ्रम तोपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. राजळे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू असली, तरी त्यांच्या सर्व हालचाली मात्र गुप्तता बाळगून होत आहेत. त्यामुळे संभ्रम वाढतच चालला आहे.
ढाकणे-राजळेंचे मनोमिलन मुंडे कसे साधणार?
पाथर्डी, /वार्ताहर-भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक असणाऱ्या ढाकणे-राजळे यांच्या संभाव्य मनोमिलनाविषयी तालुक्यात कमालीचे कुतूहल आहे. नगरमधून भाजपला मराठा समाजाचा उमेदवार हवाच होता. तो राजळेंच्या रूपाने भाजपला, विशेषत मुंडे यांना मिळाला. मात्र, एकेकाळचे राजकीय विरोधक व सध्याचे निष्ठावान कार्यकर्ते असणाऱ्या ढाकणे यांना डावलून मुंडे राजळेंना प्रवेश देणार नाहीतच असा विश्वास ढाकणेसमर्थक ठामपणे व्यक्त करत आहेत. राजळे यांनी आज दिवसभर नगर येथेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बोलावून बैठका घेतल्या. ढाकणेसुद्धा नगरमध्येच होते. मुंडे आज दिल्लीत असल्याने राजळे मुंबईला गेले नसल्याची चर्चा असून, ते मुंबईला दाखल होताच राजळे-ढाकणे मनोमिलनाच्या प्रक्रियेला गती येऊ शकेल. राजळे-ढाकणे अशी युती झाल्यास येणाऱ्या लोकसभा व विधानसभेला दोघांचाही मोठा फायदा होणार आहे. मात्र, यापूर्वी या दोघांमध्ये झालेल्या युतीनंतर दोघांमधील वादाने उग्र स्वरूप धारण केल्याचा अनुभव लक्षात घेता राजळे-ढाकणेंची मोट मुंडे कशी बांधतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राजळेंच्या भाजपप्रवेशाने कोंडी झालेल्या आमदार नरेंद्र घुले यांनी आज मुंबई गाठली. राजळेंना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालवल्याचे समजते.