Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वहनक्षमता घटली, दुरुस्तीही रखडली!
महेश जोशी, कोपरगाव, १८ मार्च

सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन गोदावरी डावा-उजवा कालवे त्यावरील बांधकामे जीर्ण

 

झाल्याने वारंवार फुटतात. या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४० कोटींची गरज असून, दोन्ही कालव्यांच्या रुपाने लाभार्थी शेतकरी सरकारला दर वर्षी सुमारे ४० ते ४५ कोटींचे उत्पन्न देतात. कालव्यांची वहनक्षमता घटल्याने पुरेसे पाणी मिळू शकत नाही, अशी स्थिती आहे.
नाशिक जिल्ह्य़ातील निफाड व सिन्नर, तर नगर जिल्ह्य़ातील राहाता, कोपरगाव आदी तालुक्यांतील सुमारे सव्वा लाख एकर शेतीचे भवितव्य या कालव्यांवर अवलंबून आहे. कालव्यांमध्ये झाडे, वेडय़ाबाभळी, बेशरमाची झाडे-झुडपे मोठय़ा प्रमाणावर वाढली. त्यामुळे कालव्यांची वहनक्षमता घटली. गोदावरी नदीवर बांधलेल्या दारणा धरणातून नांदूर-मधमेश्वर पीकअप वेअरमध्ये पाणी सोडण्यात येते. तेथून गोदावरी डावा व उजवा तट कालव्यांतून पाणी सोडले जाते. नाशिक जिल्ह्य़ातील धरणे भरली असतानाही कालवा फुटीमुळे, तसेच वहनक्षमता घटल्याने लाभक्षेत्रात पाणी कमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकून जातात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, आमदार अशोक काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव काळे, मंत्री राधाकृष्ण विखे आदींनी या प्रश्नी पाठपुरावा केला. मात्र, गाडा पुढे सरकत नाही! कालवे दुरुस्तीचा खर्च ४० कोटींच्या घरात आहे. मात्र, सरकारने छदामही दिला नाही. कालव्यांखाली ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. कालवे नूतनीकरणासाठी गतवर्षी अर्थसंकल्पात केवळ ७ कोटींची तुटपुंजी तरतूद केली. त्यामुळे कामे रेंगाळली असून, शेतीची सिंचन व्यवस्था धोक्यात आली. बारमही असलेल्या कालव्यावर पाणीयोजना असल्याने कालवा बंद कालावधी २० ते २२ दिवसांचा मिळतो. त्यामुळेही नव्या बांधकामास गती देता येत नाही. जलसंपदामंत्री अजित पवार यांनी पुरवणी अर्थसंकल्पाद्वारे १० कोटींचा निधी देऊ. पुढील वर्षी ३० कोटी निधीची पूर्तता अर्थसंकल्पात करू. नाबार्ड वा जलसुधार प्रकल्पातून निधी मिळवून सन २०११पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते हवेतच विरणार असल्याचे दिसते.
दोन्ही कालव्यांत मिळून १५ मोठे जलसेतू, तसेच ८०च्या आसपास मोऱ्यांची बांधकामे धोकादायक बनली आहेत. रविवारी नांदूर-मधमेश्वरजवळ ५ किलोमीटर अंतरावर दुसऱ्यांदा कालवा फुटून हजारो क्युसेक पाणी वाया जाऊन हजारोंचे नुकसान झाले. मात्र, त्याचे सोयरसुतक ना मंत्र्यांना ना पाटबंधारे विभागाला! मध्यंतरी तत्कालीन विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांनी कोपरगाव, राहाता तालुक्यांतील कालव्यांची पाहणी करून देखभाल दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी देण्याचे पत्र तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना दिले. त्या वेळी त्यांनी जागतिक बँकेच्या जलसुधारणा प्रकल्पांतर्गत तरतूद करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, निधी मिळाला नाही.