Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मिरजगाव उपकेंद्रांतर्गत
सिंगल फेजने १२ तास वीज!
मिरजगाव, १८ मार्च/वार्ताहर

वीज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे येथील उपकेंद्रांतर्गत गावांना केवळ ८ तासच वीज मिळत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होताच ख

 

डबडून जागे होत कनिष्ठ अभियंत्यांनी कोंभळी फीडरअंतर्गत सिंगल फेज लाईनने बारा तास वीजपुरवठा सुरू केला! त्यामुळे संबंधित गावांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात इतरत्र १२-१३ तास वीजपुरवठा होत असताना मिरजगाव उपकेंद्रांतर्गत गावांना मात्र दिवसातून केवळ ८ तास, म्हणजे ५ तास कमी वीजपुरवठा सुरू होता. गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून हे चित्र असताना संबंधित यंत्रणा मात्र ढिम्म होती. या उदासीनतेवर ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध करून बोट ठेवले होते. त्याची मात्रा लगेच लागू पडली.
मिरजगाव उपकेंद्रातून आष्टी तालुक्यातील कानडी व पिंप्री या गावांना होणारा वीजपुरवठा बंद केला जाणार आहे. उपकेंद्रातील कोंभळी फीडरमध्ये सिंगल फेजद्वारे १२ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला. अन्य संबंधित गावांनाही मार्चअखेर याच प्रकारे १२ तास वीज मिळण्यास सुरुवात होणार आहे.
राष्ट्रवादीचे शाखाध्यक्ष संजय पवार, डॉ. सुभाष सूर्यवंशी, संपतराव बावडकर, डॉ. राजेंद्र तोडमल, डॉ. पंढरीनाथ गोरे, विजय पवळ, अतुल जाधव, अशोक गोरखे, कुलदीप गंगावणे, राजेंद्र गोरे, रमेश घोडके, प्रल्हाद गुंजाळ आदींनी, तसेच संबंधित गावांतील वीजग्राहकांनी या प्रश्नी आवाज उठविल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार मानले आहेत.