Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अ‍ॅक्शन रीप्ले
‘अ‍ॅक्शन रीप्ले’ म्हटलं की बहुतांश लोकांना अलीकडे तुफान लोकप्रिय होऊन घराघरात शिरलेले ट्वेन्टी-२० आणि वनडेतील या ना त्या कारणास्तव दाखवलले अ‍ॅक्शन रीप्ले आठवतील. अ‍ॅक्शन प्ले म्हटलं की बॅकहॅण्डचा सुरेख फटका मारणारी सानिया, प्रतिस्पध्र्याला चकवत दोन्ही पायावर फुटबॉल नाचवत थेट गोल करणारा मॅरादोना, विजेच्या चपळाईने प्रतिस्पध्र्याला ठोसे लगावणारा विजेंदर, तर

 

कधी साक्षात फेडररलाच हरवून ऑस्ट्रेलियन ओपनचं जगज्जेतेपद आपल्या नावे करणारा नदाल डोळ्यापुढे येतात. तसे इतरही अनेक क्रीडा क्षेत्रातली, पण तरीही क्रिकेटचं केवळ वेडंच नाही तर झपाटलेपणही अंगी बाळगणाऱ्या आम्हा भारतीयांना अ‍ॅक्शन रीप्ले म्हणताना दिसतो श्रीलंकेत पंचाच्या चुकीच्या निर्णयानं नाहक बाद ठरवलेला आमचा सचिन, वर्ल्डकपमध्ये आख्खी ओव्हरच झंझावती षटकारमय करणारा युवी आणि कुणाची खास विकेट काढल्यावर नखशिखांत रिअ‍ॅक्ट होणारा भज्जी..
तसं, अ‍ॅक्शन रीप्ले या संकल्पनेचं आणि मानवी स्वभावाचं जवळचं नातं. केवळ वर्तमानातच सकृतदर्शनी कार्यरत असणाऱ्या माणसाचं मन मात्र बहुतांश हरवलेलं दिसेल भूतकाळात किंवा कधी ते दिसेल वेध घेताना भविष्याचा. त्यातही त्याचे सूर मात्र दिसतील आठवणीतूनच जुळलेले आणि जर असतील या आठवणी रोमांचकारी आणि जीवापाड जपलेल्या, तर नाही होणार त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा वारंवार. या साऱ्याच आठवणी थेट तुमच्या घरात आणि अर्थात मनात आणून सोडते टीव्ही नावाची किमया आपल्या अ‍ॅक्शन रीप्लेच्या माध्यमातून. हा रीप्ले असतो कधी अजित वाडेकरच्या इंडिया टीमचा लॉर्डस्वरील ऐतिहासिक विजय, कधी ऐश्वर्या रॉयच्या जगतसुंदरीच्या किताबाची खुबसुरत वार्ता, तर कधी ए. आर. रेहमानसह भारतीय चमुचा रेकार्डब्रेक ऑस्कर. जीवनाचा अविभाज्य भाग झालेले हे सोनेरी क्षण नाहीच करता येणार अलग आपल्यातून कधीही.
अ‍ॅक्शन रीप्ले एखाद्या किमयागाराप्रमाणे घडवित असतो अपूर्व दर्शन आपल्या मनातल्या खास गोष्टीचं आणि त्या अनुषंगाने देत असतो पुनप्रत्ययाचा अनुभवही. खरंतर सारं जीवनच दिसेल व्यापलेलं या अ‍ॅक्शन रीप्लेच्या अनोख्या बाधेने. आता सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या विविध घटनांच्या चित्रफिती खरंतर पूर्वीही आपण नव्हतो का बघत आपल्याच मनाच्या कॅमेरात घेतलेल्या एकूण आंबट-गोड आठवणींच्या चित्रफितीतून कभी कभी? पण या अ‍ॅक्शन रीप्लेची गंगोत्रीच भासणाऱ्या मनाच्या निसर्गदत्त माध्यमाशिवायही कल्पक माणसाने दिल को छू लेने वाली आठवण सतत जागवत ठेवण्यासाठी इतरही पर्याय, खरंतर बहाणे शोधले. आपला किंवा आपल्या कुण्या जवळच्या स्नेह्य़ाच्या लग्नाचा वाढदिवस हा असाच खास आठवणी जागवण्याचा लाखातील एक बहाणा.
आता नामशेष होणाऱ्या काही प्राण्यांसारखी अवस्था झालेला पत्रलेखनाचाही एक अपूर्व पर्याय पत्रभेट, खरंतर असते अक्षरभेट दोन्ही स्नेहमयी मनांची. इथंही दिला जातो उजाळा धुक्यात हरवल्यागत झालेल्या पण आता नव्या संदर्भातही जाग्या होणाऱ्या आठवणींना. सर्वच स्तरावरील आठवणींचा आणि एकूणच नाटकांचाही अन्योन्य संबंध. एकच प्याला, भावबंधन, रायगडाला जेव्हा जाग येते, नटसम्राट, शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल, तो मी नव्हेच, कटय़ार काळजात घुसली, पुरूष, ऑल द बेस्ट ही इथली आणि ऑथल्लो, पिग्मॅलिअन, द थ्री पेनी ऑपेरा, ल मिझान्थ्रोप इत्यादी तिकडची नाटकं. दडले यांच्यात मानवी प्रवृत्तीचे मूलभूत साक्षात्कार, जे होतात जिवंत प्रत्येक प्रयोगाला आणि देत असतात पुनप्रत्ययाचा अपूर्व अनुभव प्रत्येक प्रयोगाला आणि प्रयोगानंतरही अखंड. अ‍ॅक्शन रीप्लेचं इतकं भव्यदिव्य आणि प्रत्यक्ष जीवनाशीच निगडीत असा नाटकाइतका दुसरा रंगमंच नसेल कुठं.
नाटकासारखीच पण खऱ्या अर्थाने आम आदमीची आणि म्हणून सर्वव्यापीही अशी पुनप्रत्ययाचा लखलखीत अनुभव देणारी गोष्ट सिनेमाची. इथंही व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येक चित्रपटाचा आणि त्यातील प्रत्येक घटकाचाही प्रेक्षक आगळा, वेगळा आणि निराळाही.
आपल्या खास आवडीच्या चित्रपटासाठी सिनेमागृहाच्या वारंवार फेऱ्या मारणारेही कमी नसतात. कधी आपल्या प्राणप्रिय हिरो-हिरॉईनसाठी, तर कधी अफलातून कथानकासाठी, तर कधी दे दणादण अ‍ॅक्शनसाठी, तर कधी धमाल कॉमेडीसाठी ही चित्रपट वारकरी मंडळी पहात असतात एकच चित्रपट पुनपुन्हा. दिलीपकुमारसाठी देवदास, हेमंतकुमारच्या मधूर संगीतासाठी नागीन, तर मधुबालेसाठी आवर्जून आणि वारंवारही पाहिला जातो मुगले आझम. एकाच चित्रपटातील पटकथा, दिग्दर्शन, संगीत, अभिनय आवडणारे प्रेक्षक वेगवेगळे. म्हणून एखादा चित्रपट साऱ्याच घटकांसाठी जातो एकाच वेळी पाहिला अलोट गर्दीत आणि तोही पुनपुन्हा त्यावेळी तो चित्रपट निश्चितच श्रेष्ठ दर्जाचा असतो. यातील काही चुनेगिने चित्रपट निवडताना आठवतात इतरही अनेक आणि मन म्हणतं क्या भुलू क्या याद करू? इथल्या मातीच्या गंधाने दरवळणारे आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेले काही चित्रपट आहेत. शेजारी, बरसात, जिस देशमें गंगा बहती है, नया दौर, प्यासा, गाईड, पडोसन, आँधी, एक गाव बारा भानगडी आणि दादांचा सोंगाडया आणि ग्लोबल प्रेक्षकांना पुनप्रत्ययाचा अनुभव देणारे बेनहर, द लॉन्गेस्ट डे, व्हेअर ईगल्स डेअर, द ट्रम्प, ओमेन, जुरॅसिक पार्क आणि टायटॅनिक.
अ‍ॅक्शन रीप्लेचा असाच एक सुरेल आविष्कार म्हणजे आपलं संगीत. सिनेसंगीतापासून रागदारीपर्यंतचे सारेच प्रामाणिक उपासक आहेत.
गानकोकिळा लता मंगेशकरांचा लंडनच्या अलबर्ट हॉलमधील कार्यक्रम आणि पुण्याचा नित्यनियमानं आणि निष्ठेने होणारा सवाई गंधर्व ही दोन मंतरलेली नावं संगीताच्या इतरही मैफिलींच्या, नावाजलेल्या गायक-गायिकेच्या नाईटस् आणि सारेगमपसारखे टीव्हीवरील स्पर्धात्मक कार्यक्रमांच्या आठवणी जागवल्याशिवाय कशा राहतील? जाता जाता, पुनप्रत्ययाच्या संदर्भात आपसूक आठवावा अक्षरवाङ्मयाचा कालातीत पर्याय. इथंही भिन्नरुची जोपासते छोटय़ापासून वृद्धांपर्यंत सारेच वाचनसंस्कृतीचे आंतरिक प्रेरणेत वाचनात दंग झालेले वारस. कुणाच्या हाती केशवसूत, कुणाच्या ग्रेस, कुणाच्या सोबतीला तो मी नव्हेच, कुणाच्या हाती फुलराणी, कोणी रमलेत गोटय़ात, कुणी श्यामच्या आईत. कुणी मग्न ययातित, कुणी रणांगणात, कुणी दिसले घेताना हेम्लेटची नवी आवृत्ती, कोणी गुलाग अर्चीपिल्यागोची आणि सर्वाच्याच अंतरीच्या अमोल आठवणींचा नजराणा कालातीत असतोच हाताशी फोटो अल्बमच्या अभिनव रूपात आणि असतो नेहमीच देत पुनप्रत्ययाचा मन उचंबळून देणारा अनुभव. कालौघात पिवळ्या पडणाऱ्या आणि प्राचीन शिल्पागत दिसणाऱ्या आपल्याच फोटोमागील आठवणींचा नायगारा चिंब भिजवणारा, सभोवताल धुसर करणारा. थोडक्यात, करता येईल अ‍ॅक्शन रीप्लेच्या त्सुनामीच वर्णन थोडक्यात?