Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

१३ दिवसांत २४ कोटी वसुलीचे आव्हान थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा तोडण्याची मोहीम
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

महावितरणतर्फे सध्या वीजबिल वसुली युद्धपातळीवर सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत थकबाकी

 

भरा; अन्यथा वीजजोड तोडू असा पवित्रा वीज कर्मचाऱ्यांनी घेतल्याने थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक हजार रुपयांवर थकबाकी असणाऱ्या घरगुती, व्यावसायिक थकबाकीदारांचे या मोहिमेमुळे धाबे दणाणले आहे.
गेल्या १-२ महिन्यांत नगर विभागाची वसुली उद्दिष्टापेक्षा बरीच कमी होत आहे. मार्च एण्डींगमुळे वरिष्ठ कार्यालयाकडून वसुली संदर्भात कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महावितरण सध्या वसुली या एकाच कामात गुंतलेली दिसते.
मार्चसाठी विभागाला ४० कोटी ५४ लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आजपर्यंत १६ कोटी १८ लाखांची वसुली झाली आहे. उर्वरित १३ दिवसांत सुमारे २४ कोटी ३६ लाख वसूल करण्याचे आव्हान वीज कर्मचाऱ्यांसमोर आहे.
दरम्यान, महावितरणच्या या धडक वसुली मोहिमेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरीक हबकले आहेत. सध्या सुगीचे दिवस आहेत. बिगरमोसमी पावसामुळे काही भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात ही मोहीम सुरू असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. सामान्य व्यावसायिक, नोकरदारांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.
बिल न भरल्यास वीजजोड तोडले जात असल्यामुळे वीज अधिकाऱ्यांवर पुढाऱ्यांचा दबाव येत आहे. अनेक अधिकारी आपले मोबाईल बंद ठेवत आहेत. वसुली मोहिमेमुळे वीजचोरीकडे काहीसे दुर्लक्ष होत असले, तरी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पर्याय नाही. बिलवसुली हाच सध्याचा एकमेव महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे फक्त वसुलीवरच लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नागरिकांनी बिले भरून महावितरणला सहकार्य करावे आणि कटू प्रसंग टाळावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता दिलीप पडळकर यांनी केले आहे.