Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सराईत गुन्हेगार सुभ्या भोसलेला अटक पारनेर पोलिसांची कारवाई
पारनेर, १८ मार्च/वार्ताहर

तीन वर्षांपूर्वी पोलीस पथकावर हल्ला करून फरार झालेला सराईत गुन्हेगार सुभाष मटक्या भोसले

 

ऊर्फ सुभ्या याला पोलिसांनी आज (बुधवारी) दुपारी गावकऱ्यांच्या मदतीने जेरबंद केले.
कुख्यात गुन्हेगार सुभाष उर्फ सुभ्या मटक्या भोसले तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपअधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र ससाणे यांनी पोलीस कर्मचारी व गावकऱ्यांच्या सहकार्याने आज पहाटे भोयरे गांगर्डा शिवारात सापळा रचला.
तब्बल आठ तासांच्या प्रतिक्षेनंतर सुभ्या भोसले पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सुभ्याची वस्ती दरीत असल्यामुळे पोलिसांना व गावकऱ्यांना त्याला पकडण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. सुभ्या नेहमी शस्त्र बाळगत असल्यामुळे पोलिसांनी सशस्त्र कारवाई केली.
नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व पारनेरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, तत्कालीन पोलीस अधीक्षक सुनील रामानंद, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांचे पथक २६ जुलै २००६ रोजी भोयरे गांगर्डा येथे कोम्बींग ऑपरेशन करण्यासाठी गेले असता सुभ्या भोसले याने या पथकावर दगडफेक केली होती. या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांनी त्यावेळी गोळीबारही केला होता. मात्र, सुभ्या भोसले पळून जाण्यात यशस्वी ठरला. तब्बल तीन वर्षांनी सुभ्या भोसलेला पकडण्यात पोलिसांना यश आले.
जिल्ह्य़ातील श्रीगोंदे तालुक्याबरोबरच पुणे जिल्ह्य़ातील दौंड, बीड जिल्ह्य़ातील अनेक गुन्ह्य़ांमध्ये सुभ्या भोसलेचा सहभाग आहे. त्याला पकडल्यामुळे अनेक गुन्ह्य़ांचा तपास लागण्याची शक्यता पोलीस निरीक्षक ससाणे यांनी व्यक्त केली.