Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

श्रीगोंद्यात पावणेदोनशे रोहित्रांवरील वीज खंडित‘महावितरण’ची मोहीम
संजय काटे, श्रीगोंदे, १८ मार्च

तालुक्यात वीजपंपाच्या ४४ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी ‘महावितरण’ने धडक मोहीम

 

उघडली असून, वसुलीसाठी आजपर्यंत पावणेदोनशे रोहित्रांवरील पूर्ण वीज खंडित केली. वीजपंपधारकांची ही अवस्था असतानाच तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठय़ासाठी लागणाऱ्या पंपाची १ कोटी १५ लाखांची ‘महावितरण’ची बाकी थकविली. कर्जमाफीनंतर वीजबिल माफी मिळेल या अपेक्षेने थकबाकीचा आकडा फुगला. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना, तर निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांपुढे अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.
निवडणुकांच्या पूर्वी वीजबिल माफीची घोषणा होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ही घोषणा झाली नाही. आता ‘महावितरण’चे वसुलीपथक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत येऊन धडकले. तालुक्यात श्रीगोंदे व बेलवंडी या दोन उपविभागांतर्गत ‘महावितरण’ कारभार करते. श्रीगोंद्यांतर्गत ४९, तर बेलवंडीअंतर्गत ४० गावे आहेत. दोन्ही उपविभागांतर्गत २३ हजार कृषिपंप ग्राहक आहेत. १ हजार ७८८ रोहित्रांमधून त्यांना वीजपुरवठा होतो. तालुक्यात ४४ कोटींची थकबाकी या कृषिपंप ग्राहकांकडे आहे. वर्षभर स्वस्थ बसणारी ‘महावितरण’ची यंत्रणा आता मार्च महिना आला की खडबडून जागी झाली. या ४४ कोटींपैकी तालुक्यातून कृषी पंपासाठी दोन कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र, आता हे उद्दिष्ट शेवटच्या टप्प्यात पूर्ण करण्यासाठी थेट रोहित्र बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
गेल्या ४-५ दिवसांत तालुक्यातील सुमारे १७५ रोहित्र बंद करण्यात आले. या रोहित्रांवर थकबाकी नसणाऱ्या शेतकऱ्यालाही त्यामुळे भरुदड सहन करावा लागत आहे. मात्र अधिकारी म्हणतात, नाईलाज आहे! त्याशिवाय वसुली कशी होणार? या दोन कोटी उद्दिष्टापैकी सुमारे ७० लाख वसुली झाली. अशा खंडित रोहित्रामुळे शेतकऱ्यांची मात्र झोप उडाली आहे. ऊस, कांदा, फळबागा, भुईमूग यासह चारा पिके शेतात उभी असताना रोहित्र बंद होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नेते लोकसभा निवडणूक तयारीत गुंतल्याने या प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.
एकीकडे कृषिपंपचालकांची ही अवस्था असताना दुसरीकडे घरगुती, व्यापारी वीज ग्राहकांची सुमारे दोन कोटी २० लाखांची थकबाकी आहे. तालुक्यातील २६ हजार अशा ग्राहकांकडे ही थकबाकी आहे. कृषिपंप, घरगुती या थकबाकीसह गावोगाव पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील ८० ग्रामपंचायती या थकबाकीच्या जाळ्यात सापडल्या आहेत. तालुक्यातील सुस्थितीत असणाऱ्या बेलवंडी, मढेवडगाव, देवदैठण, पारगाव, भानगाव, मांडवगण, वांगदरी, पेडगाव, अजनूज, टाकळी, कडेवळीत, हिरडगाव, अजनूज, लिंपणगाव या ग्रामपंचायती ‘महावितरण’च्या थकबाकी यादीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
थकबाकी वसुलीसाठी भांडणारे ‘महावितरण’ही वीजजोड देताना कोंडीत सापडले. ‘पैसे भरा, तत्काळ वीजजोड घ्या’ योजनेतील जवळपास ९०० वीजजोड ७ वर्षांनंतरही संबंधित देऊ शकले नाहीत.
सरकारी कार्यालयांकडे साडेतीन लाखांची बाकी!
शेतकरी, व्यापारी, ग्रामपंचायती थकबाकीत असताना व त्या वसुलीसाठी महावितरण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत असताना, शहरातील सरकारी कार्यालयेही थकबाकीच्या कचाटय़ात अनेक वर्षांपासून आहेत. तहसील कार्यालय व निवास, पोलीस ठाणे व वसाहत, पंचायत समिती कार्यालये व निवास यांच्याकडे ‘महावितरण’ची साडेतीन लाखांची थकबाकी आहे. वसुलीसाठी पाठपुरावा केल्यानंतर चालू बाकी जमा करून थकबाकी मात्र भरली जात नसल्याची माहिती समजली.