Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शाश्वत शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर आवश्यक - डॉ. देशमुख
राहुरी, १८ मार्च/वार्ताहर

शाश्वत शेतीसाठी पिकांचा प्रकार, जमिनीचा मगदूर व हवामानानुसार पाण्याचा थेंब न् थेंब कार्यक्षमपणे वापरण्याची जाणीव शेतकऱ्यांत निर्माण होण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ शेतकरी व

 

अधिकारी यांना प्रशिक्षित करीत आहे. त्यामुळे पाण्याची उत्पादकता वाढून कार्यक्षम वापर होईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केली.
राहुरी विद्यापीठातील आंतर विद्या शाखेच्या जलसिंचन प्रशिक्षण केंद्रात आयोजित पाण्याची उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेती प्रात्यक्षिके व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अधिष्ठाता (कृषी) डॉ. अंकुश जाधव, कृषिविद्या विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत गायकवाड, पाणी व्यवस्थापन योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ पाटील या वेळी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, जॉर्डन व इस्त्राएल देशांचा विचार करता, राज्यात पडणारा पाऊस पुरेसा आहे. पावसाच्या पाण्यापैकी ३० टक्के पाण्याचा वापर, तर ७० टक्के पाणी वाहून जाते. या पाण्याचे नियोजन करून साठवण केल्यास मृदसंधारण, उतारास आडवी मशागत, शेततळी यांचा वापर केल्यास पाण्याची उत्पादकता वाढेल. राज्याचा बहुतांश भाग अवर्षणप्रवण असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे सिंचनावर मर्यादा आहेत. केवळ १६.२ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे.
डॉ. जाधव, डॉ. गायकवाड, तसेच प्रशिक्षणार्थी शेतकरी शिवगोंडा मोडके (कोल्हापूर), धनपाल जुगल (कोल्हापूर), नितीन चौधरी, अनिल त्रिभुवन (धुळे) यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ. एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले.
प्रशिक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्य़ातून सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था (घोसरवाड, तालुका शिरोळ) येथून ५० शेतकरी, तसेच धुळे जिल्ह्य़ातून, प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी (शिरपूर) येथून ५२ शेतकरी व तीन महिला शेतकरी सहभागी झाल्या आहेत. प्रशिक्षण दि. २२ मार्चपर्यंत चालणार आहे.