Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आणखी एका तोतयाला नगर महाविद्यालयात अटक
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

बारावीच्या तोतया परीक्षार्थीचा गैरप्रकार नगर महाविद्यालयात आज पुन्हा उघडकीस आला. या

 

तोतयाला कोतवाली पोलिसांनी अटक केली. राज्य परीक्षा मंडळाचे विभागीय सदस्य जगन्नाथ सातपुते यांच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला.
आज मानसशास्त्राचा पेपर होता. मंडल सदस्य सातपुते परीक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी नगर महाविद्यालय केंद्रात सकाळी गेले होते. केंद्र संचालक श्याम खरात यांना त्यांनी स्थळप्रतीवरून परीक्षार्थीची खातरजमा करण्याची सूचना केली. तपासणीत राहुल विल्यम हिवाळे या मूळ परीक्षार्थीऐवजी अशोक विनायक गुंड (रा. पिंपळगाव माळवी, नगर) हा तोतया उत्तरपत्रिका लिहिताना आढळला. सातपुते व खरात यांनी केलेल्या उलटतपासणीत त्याची बनवेगिरी उघड झाली. खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हिवाळे व गुंड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. तपासणीत आणखी दोन परीक्षार्थीवर कॉपीची केस करण्यात आली. गेल्या गुरुवारी (दि. १२) याच केंद्रात गणिताचा पेपर देणाऱ्या एका तोतयाला अटक करण्यात आली होती.