Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी द्या; न्यायालयाचा मनपाला आदेश
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

महापालिकेतील ५११ कामगारांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करावी असा आदेश

 

औद्योगिक न्यायालयाने मनपाला दिला. नगरपालिका असल्यापासून मनपा कामगार युनियनने न्यायालयात हा दावा दाखल केला होता.
युनियनचे सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी ही माहिती दिली. कायम सेवेमध्ये सामावून घेत नसलेल्या या कामगारांना युनियनमुळेच मनपाला कायम सेवेत दाखल करून घ्यावे लागले. तसे करताना मनपाने त्यांना पाचवा वेतन आयोग लागू केला नाही.
त्याविरोधातही युनियनने दाद मागितली होती. दरम्यान, नगरपालिकेचे मनपात रुपांतर झाले. त्यानंतर या कामगारांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात आला, पण नगरपालिका काळातील फरक नाकारण्यात आला. युनियनने त्याविरोधात औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला. त्याचा निकाल कामगारांच्या बाजूने होऊन मनपाने सर्व कामगारांना दि. १ जानेवारी ९६ ते ५ मार्च २००१ या काळातील पाचव्या वेतन आयोगाची थकित रक्कम अदा करावी, असा आदेश न्यायालयाने दिला.