Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

युवक काँग्रेसअंतर्गत फुटीने वाद उफाळला
नेवासे, १८ मार्च/वार्ताहर

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर युवक काँग्रेसमध्ये उभी फूट पडली.

 

जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले व उपाध्यक्ष अभिजित लुणिया यांच्यातील वाद उफाळला आहे. लोकसभेसाठी ओगले यांना पाठिंबा न देता तालुक्याचे रहिवासी असलेले रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड यांचे नाव लुणिया यांनी पुढे केले याचा ओगले यांना राग असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यातूनच पत्रकबाजी सुरू झाली. श्रीगोंद्याचे उपाध्यक्ष सचिन गायकवाड यांनी पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल लुणिया व कराळेंची हकालपट्टी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालुक्यातून काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्हा उपाध्यक्षपदावरून हटविण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांनाच असताना संघटनेने केवळ बागूलबुवा असणाऱ्या गायकवाड व ओगले यांनी लुणिया यांच्यावर कारवाई करणार असल्याचे कसे काय प्रसिद्ध केले, असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे ४ दिवसांपूर्वीच लुणिया व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णा पटारे, शहराध्यक्ष सचिन कराळे आदींनी प्रदेशाध्यक्ष राजीव सातव यांच्याकडे राजीनामे पाठविले आहेत. त्याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध झाले. या पाश्र्वभूमीवर आज वरील पदाधिकाऱ्यांनी शहरात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ओगले व सचिन गायकवाड यांच्यावर सर्वानीच तोंडसुख घेतले. राजीनामा दिल्यानंतरही हकालपट्टीची भाषा करून बदनामी केल्याबद्दल अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा करण्याचे ठरले.