Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘गांधींना उमेदवारी नाकारल्यास भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे’
राहुरी, १८ मार्च/वार्ताहर

नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी न दिल्यास पक्षाचे राहुरीतील

 

पदाधिकारी व सदस्य राजीनामे देतील, असा इशारा माजी शहराध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिला.
पाथर्डीचे आमदार राजीव राजळे यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षाचे कोर्यकर्ते भांबावून गेले आहेत. त्यामुळेच उमेदवारी न मिळाल्यास गांधी यांना अन्य कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा आहे. गांधी यांच्या नावास पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी छुपा विरोध सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा कार्ड वापरले जाणार असून, भाजपनेही तोडीस तोड उमेदवार म्हणून मराठा कार्ड वापरण्याचे ठरविले आहे. त्यातून राजळे यांचे नाव पुढे आले. पारख व निष्ठावंतांनी मात्र त्यास विरोधाचा सूर आवळला आहे. या घडामोडींमध्ये गांधी यांनी बसपच्या हत्तीवर स्वार व्हावे, असा मतप्रवाह गांधी समर्थकांत
बळावत चालला आहे. भाजपचे राहुरीचे आमदार चंद्रशेखर कदम व तालुक्यातील पदाधिकारी,
कार्यकर्ते यांच्यात उघडपणे दोन गट आहेत. जिल्हाध्यक्ष प्रताप
ढाकणे यांनीही गांधी यांच्या
विरोधात मध्यंतरी भूमिका घेतली होती.
उमेदवारी निश्चित मानून गांधींनी प्रचारकार्यही सुरू केले. राहुरीत कार्यालयासाठी जागाही शोधली. ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वर उपाध्ये यांच्या निवासस्थानी गांधी यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. आता अचानक वेगाने बदल घडू लागल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गांधी हत्तीवर स्वार होणार की कमळ हातात घेणार, याविषयी चर्चा होत आहे.