Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लाच घेताना पकडलेल्या दोघांना जामीन मंजूर
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

वीजजोडासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेला महावितरणचा

 

कक्ष अभियंता शिवलिंगप्पा रामचंद्रआप्पा अतनूर व तारतंत्री इंद्रभान रघुनाथ सुपेकर या दोघांना प्रधान न्यायाधीश पाटील यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
शिरापूर (ता. पारनेर) येथील मच्छिंद्र सोपान उचाळे यांना आपल्या शेतातील विहिरीवर वीजपंप बसविण्यासाठी वीजजोड हवा होता. त्यांनी ७ जानेवारीला अर्ज दिला होता. वीजजोड मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच अतनूर याने मागितली. पैकी ६ हजार रुपये उचाळे यांनी दिले होते. उर्वरित ४ हजार रुपये देण्यापूर्वी उचाळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. मंगळवारी निघोज उपकेंद्राजवळ विभागातर्फे सापळा लावून अतनूर व सुपेकर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत अतनूर याच्या घराची झडती घेण्यात आली.
दरम्यान, महावितरणतर्फे या प्रकाराची स्वतंत्र चौकशी होऊन अतनूर याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. सुपेकर खासगी कंपनीतर्फे वीज कंपनीत कार्यरत
आहे.