Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

सामाजिक बदल घडविणारे साहित्य हवे - नारायण सुमंत
श्रीरामपूर, १८ मार्च/प्रतिनिधी

सामाजिक बदलास हातभार लावणाऱ्या साहित्याची आज गरज असून, ग्रामीण भागातून आलेले

 

संवेदनशील लेखक अशी साहित्य निर्मिती क रू शकतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी केले.
येथील पत्रकार विकास अंत्रे यांच्या ‘झेंडूची फुलं’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सुमंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विनोदी कथाकार चंद्रकांत महामिने होते. संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार, पत्रकार रामदास ढमाले उपस्थित होते. सुमंत म्हणाले की, शोषित घटकांच्या जीवनातील वास्तव साहित्यातून येणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण लेखकांची पिढी सामान्य जनतेच्या भाकरीची प्रेरणा घेऊन आली. या लेखकांमध्ये सामाजिक बदल घडविण्याची क्षमता आहे. झेंडूची फुलं कथासंग्रह लिहिणाऱ्या अंत्रेंना हीच प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. महामिने यांनी अंत्रे यांच्या कथा वाचकाला अंतर्मुख करतात. यातील काही कथा कादंबरीचा विषय होऊ शकतात. लेखक अंत्रे यांनी याचा विचार करावा, असा सल्ला दिला. पत्रकार ढमाले, सुनिताराजे पवार, पंकज लोढा यांची भाषणे झाली. अंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन गोर्डे यांनी केले. करण नवले यांनी आभार मानले.