Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बारावीचे परीक्षार्थी वाढल्याने नियंत्रणात ढिलाई
उपकेंद्रे लांब असल्याने गैरप्रकार बोकाळले
मोहनीराज लहाडे, नगर, १८ मार्च

परीक्षार्थीच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण केलेल्या उपकेंद्रांच्या परीक्षा हॉलच्या इमारती मूळ

 

केंद्रापासून लांब अंतरावर असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने नियंत्रणात ढिलाई राहते व त्यातून कॉपी व इतर गैरप्रकारांच्या उपद्रवात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्य़ात बारावीच्या परीक्षेची ५३ केंद्रे आहेत. त्यातील १० केंद्रांवर १ हजारपेक्षा अधिक, तर ५ केंद्रांत दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
वाढत्या परीक्षार्थीमुळे इमारत, त्यातील बैठकव्यवस्था, बाके (फर्निचर) यांचीही कमतरता परीक्षाकेंद्रांना भासू लागली आहे. ही व्यवस्था करताना धावपळ उडते. पर्यवेक्षकांनी प्रसार वा अध्यापनाचे कोणतेही साधन जवळ ठेवू नये, असे बंधन असताना परीक्षाकेंद्रात शिक्षक सर्रास मोबाईल वापरताना आढळतात. सोनईसारख्या मोठय़ा गावातील केंद्रावर मोठा जमाव जमला असताना एकही पोलीस बंदोबस्तासाठी उपस्थित नव्हता.
ही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत राज्य परीक्षा मंडळाच्या पुणे विभागाच्या सदस्यांनी! त्याचा अहवाल मंडळास पाठवला जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. दहावी-बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा प्रथमच कारवाईत स्वत जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भाग घेतला. परीक्षा मंडळाचे जिल्ह्य़ात ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ सातपुते, श्रीगोंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, दिलीप फलके, गोरक्ष ओहळ असे चार सदस्य आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी तेही सातत्याने केंद्रांना भेटी देतात.
बारावीच्या परीक्षेस यंदा ४४ हजार ६५ विद्यार्थी बसले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या लक्षणीय जास्त आहे. दहावीचा उंचावलेला निकाल हे प्रमुख कारण असले, तरी शिक्षणाचा प्रसार, वाढती लोकसंख्या अशी इतर कारणेही आहेत.
वाढत्या परीक्षार्थीमुळे मूळ परीक्षा केंद्रांना उपकेंद्र निर्माण करावे लागले. या उपकेंद्रांच्या इमारती मूळ केंद्रांपासून लांब आहेत. केंद्र संचालक, पर्यवेक्षक याची यंत्रणा उपकेंद्रापासून लांबच असते. गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांच्याकडून प्रशासकीय ढिलाई निर्माण होते. अनेकदा पोलिसांचा बंदोबस्त मूळ केंद्राभोवती असतो. उपकेंद्राकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. या सर्व कारणांमुळे यंदा गैरप्रकारांत मोठी वाढ झाली आहे.
नगर येथील नगर महाविद्यालय या मूळ केंद्राचे उपकेंद्र चाँद सुलताना विद्यालयात आहे. कोपरगावमधील सद्गुरू गंगागिरीमहाराज महाविद्यालय हे मूळ केंद्र गोदावरीच्या एका काठावर, तर उपकेंद्र केबीपी विद्यालय दुसऱ्या काठावर. श्रीरामपूरचे बोरावके महाविद्यालय एका टोकाला, तर उपकेंद्र डाकले महाविद्यालय दुसऱ्या टोकाला आहे. पाथर्डी तालुक्यात यंदा सर्वाधिक गैरप्रकार नोंदवले गेले. श्रीतिलोक जैन विद्यालय व एम. एम. निऱ्हाळी विद्यालय ही दोन उपकेंद्रांची ठिकाणे बाबूजी आव्हाड विद्यालय या मूळ केंद्रापासून लांब अंतरावर आहेत.
गेल्या वर्षी दीड हजार परीक्षार्थीची संख्या असलेले एकही केंद्र जिल्ह्य़ात नव्हते. हजारपेक्षा अधिक परीक्षार्थी असलेले ठिकाण अपवादात्मक म्हणजे तीन होती. त्यात यंदा मोठी वाढ झाली आहे. मंडळ ३५०पेक्षा अधिक परीक्षार्थीसाठी स्वतंत्र केंद्र मंजूर करते. परीक्षार्थीची मोठी संख्या असल्यास केंद्र संचालक केंद्राच्या विभाजनाचा प्रस्ताव सादर करू शकतो. तसा प्रस्ताव न पाठविल्यास जिल्ह्य़ातील अनेक केंद्रांच्या विभाजनासाठी मंडळास स्वत:च पावले उचलावी लागणार आहेत.
परीक्षेसाठी काम करताना मिळणाऱ्या अत्यल्प मानधनावरून पर्यवेक्षक व केंद्र संचालकांत मोठी नाराजी आहे.