Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
अग्रलेख

टेंभा उतरवला!

लालूप्रसाद यादव यांच्यापुढे काँग्रेसला लाचारी करावी लागते आहे, याला काँग्रेसचे अरेरावीपूर्ण धोरणच जबाबदार आहे. बिहारमध्ये लालूंचा राष्ट्रीय जनता दल आणि रामविलास पास्वान यांचा लोकजनशक्ती पक्ष यांच्याशी काँग्रेसने समझोता केला आणि या दोन्ही पक्षांनी मिळून काँग्रेसला

 

बिहारमध्ये लोकसभेच्या तब्बल तीन जागा सोडायचे मान्य केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बिहारमध्ये लढवलेल्या जागा चार होत्या, पैकी तीन जागांवर ते विजयी झाले होते. आता तो पक्ष लालूंकडे आणखी आठ जागांची मागणी करतो आहे. गंमत म्हणजे पास्वानांच्या त्या अर्थाने ‘राष्ट्रीय’ नसलेल्या पक्षाला लालूंनी १२ जागा सोडल्या. गेल्या निवडणुकीत पास्वानांच्या पक्षाने आठपैकी चार जागाजिंकल्या होत्या. त्यांना लालूंनी बोनस दिला आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत हे दोघेही परस्परांना पाण्यात पाहात होते. ही स्थिती का निर्माण झाली, हे काँग्रेसनेच पाहायला हवे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. तिथे त्यांना लढवायच्या होत्या अकरा जागा. त्या अकरांपैकी लालूंच्या सख्ख्या मेव्हण्याला दोन जागा लढवण्यासाठी काँग्रेसने भाडय़ाने घेतले आहे. ‘गंगाजल’ चित्रपटात प्रकाश झा यांनी साधू यादव नावाच्या एका पात्रावर बिहारमध्ये सारे क्रौर्य चित्रित केले आहे, त्याच नावाने प्रत्यक्षात वावरणारा लालूंचा मेव्हणा तशाच कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्याला या खेपेला लालूंनी झिडकारले असेल आणि उमेदवारी नाकारली असेल तर ही गोष्ट चांगली की वाईट? एरवी कोणत्या पक्षातर्फे किती गुंडांना उमेदवारी देण्यात आली आहे, याची इत्थंभूत माहिती पुरवणाऱ्यांनी आता साधू यादवला एकदम पवित्र करून घेतले. ‘गंगाजल’चे निर्माते प्रकाश झा यांना रामविलास पास्वान यांनी उमेदवारी देताच याच साधूने थयथयाट सुरू केला आहे. प्रकाश झा यांना उमेदवारी देऊन पास्वानांनी आणि त्यांची उमेदवारी उचलून धरून लालूंनी कोणता सामाजिक न्याय केला आहे, असा सवाल या साधूने केला आहे. साधू यादवला उमेदवारी नाकारण्यातच हा न्याय दडला आहे, हे त्याला बहुधा माहीत नसावे. काँग्रेसच्या संधीसाधूंना हा गुंड साधू दोन ठिकाणांहून उद्या निवडून आला तरी चालणार आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शरद पवारांनी अशाच एका ‘भल्या’ माणसाच्या उमेदवारीची तरफदारी करताना ‘निवडून यायची क्षमता’ अधिक महत्त्वाची असल्याचे आपल्या पित्त्यांना सांगितले होते. तेच आज काँग्रेस नेते बिहारमध्ये सांगणार आहेत. सध्याची दुनिया अशाच भल्यांची आहे, हे काँग्रेसपेक्षा जास्त शरद पवारांना कळले, ते आता काँग्रेसलाही उमजले आहे. लालूंनी पवारांनाही त्याच दमात फटकारले आहे. त्यांना बिहारमधून निदान त्यांच्या पक्षाचे एक नेते तारिक अन्वर यांना निवडून आणायचे आहे. काँग्रेसबरोबर लालू आणि पास्वानांची आघाडी होऊ शकणार नसली तरी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ती व्हावी, असे पवारांना वाटत होते. लालूंनी त्यांनाही स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगितले आहे. निवडणुकीनंतर जर तुम्ही शिवसेनेबरोबर जाणार असाल तर तुमच्या जागांमध्ये एकाने भर घालायची आम्हाला गरजच काय, असे लालूंनी पवारांना विचारले आहे. तुम्हाला कुणाची पालखी वाहायची असेल तर ती तुम्ही खुशाल वाहा, पण आम्ही तुमचे ओझे निष्कारण कशाला उचलू, असे त्यांनी पवारांना विचारले आहे. याच काँग्रेसने महाराष्ट्रात मात्र पवारांच्या पक्षाच्या दांडगाईपुढे शरणागती पत्करली आहे. पवारांनी आपल्या पक्षाला पूर्वीपेक्षा जास्त जागा लढवायच्या आहेत, असे म्हटले आहे. काँग्रेसने ताणून धरायचा आविर्भाव आणला असला तरी पवारांपुढे त्यांचे नेते लोटांगण घालायलाही कमी करणार नाहीत, अशी अवस्था आहे. त्यातल्या त्यात एकच बरे, की दहाजण निवडून आणणारा पक्ष ‘राष्ट्रीय’ कसा, असा प्रश्न करून देशपातळीवर या पक्षाचे स्थान काँग्रेसने किमानपक्षी स्पष्ट केले. ऐन निवडणुकीच्या रणक्षेत्रात काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार आडवे करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायची व्यूहरचना केली जात असल्याची उघड चर्चा होऊनही केंद्रातले काँग्रेस नेते पवार दुखावणार नाहीत, यासाठी धडपडताना दिसत आहेत. लोकसभेच्या महाराष्ट्रात असणाऱ्या ४८ जागांमध्ये काँग्रेसचे निवडून येणारे सदस्य दोन आकडी संख्येपर्यंतही पोहोचणार नाहीत, हे पाहिले जाणार असेल तर काँग्रेस कुणाच्या जोरावर केंद्रात सत्तेवर यायची अपेक्षा बाळगून आहे? काँग्रेसचा मार्ग उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमधून जातो, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग परवा म्हणाले. सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसला गेल्या खेपेला मिळाल्या तेवढय़ा १४५ जागा मिळाल्या तर कदाचित सध्याची संयुक्त पुरोगामी आघाडी त्यांना कायम ठेवता येईल. खरे तर पूर्णत: सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसला २७२ जागा मिळवता आल्या पाहिजेत. एवढय़ा जागा स्वबळावर जिंकण्याएवढा काही हा शूरवीर पक्ष नाही. तेवढी धडाडीही त्यांच्याकडे नाही. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. बिहारमध्ये त्या ४० आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे २९ आणि २५. बिहार आणि उत्तर प्रदेशातून त्यांचा मार्ग जाणार असेल तर या दोन राज्यातल्या १२० पैकी गेला बाजार ६० जागा तरी जिंकता येतील, हे पाहायला हवे की नको? उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर काँग्रेसने समझोता केला आणि समाजवादी पक्षाने अगदी उदार होऊन काँग्रेससाठी जागा किती सोडायचे ठरवले तर १७. त्यात बिहारमधून लढवायच्या १२ जागांपैकी एकतृतियांश काँग्रेस उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा ठेवली तर चार उमेदवार यशस्वी होऊ शकतात. उत्तर प्रदेशात सतरा जागा लढवल्या तरी सर्वच्या सर्व उमेदवार यशस्वी होऊ शकणार नाहीत. तिथेही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पाचच उमेदवार विजयी होतील, असे मानले तर सत्तेचा महामार्ग जाणाऱ्या दोन राज्यांमध्ये त्यांचे नऊ उमेदवार यशस्वी होतील. राजस्थानमध्ये लोकसभेच्या जागाच २५ आहेत. तिथे सध्या काँग्रेसचे अशोक गेहलोत यांचे सरकार आहे. भाजपच्या वसुंधरा राजे यांचे सरकार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले, ते त्यांच्यातल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे आणि वसुंधरा राजे यांच्याविषयी राजस्थानी जनतेत असणाऱ्या तिडीकीमुळे. काँग्रेसचा वकूब एवढा आहे, की त्यांचा कुणी सत्तेवर आला की दुसऱ्या दिवसापासून काँग्रेसविरोधी वातावरण त्या राज्यात फुलायला लागते. म्हणजे पंचवीसपैकी अगदी बारा जागांवर काँग्रेस विजयी होईल, अशी अपेक्षा ठेवली तर तीन राज्यांमध्ये मिळून हा राष्ट्रीय पक्ष २१ जागा मिळवू शकेल. उत्तरेतले आणखी एक महत्त्वाचे राज्य म्हणजे मध्य प्रदेश. तिथे लोकसभेच्या २९ जागा आहेत आणि राज्यात भाजप सत्तेवर आहे. मध्य प्रदेशात आम्ही पूर्वी एवढे चांगल्या स्थितीत आजही नाही, अशी कबुली दिग्विजयसिंग यांनी देऊन टाकली आहे. गेल्या खेपेला काँग्रेसने या राज्यात चार जागा जिंकल्या होत्या. आज परिस्थिती बिकट असूनही या जागा काँग्रेस टिकवेल असे मानले तर काँग्रेसकडे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या चार राज्यांच्या १७४ जागांपैकी २५ जागा येऊ शकतात. महाराष्ट्रात काँग्रेसची वाट लावून टाकायचा जवळपास ‘निश्चय’ शरद पवार आणि त्यांचे सध्याचे नवे परंतु छुपे सहयोगी यांनी केला असेल तर त्यांचा हा नवा ‘पॅटर्न’ अभ्यासण्यातच काँग्रेसजनांना आपली ताकद खर्ची घालावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणुकीनंतर भरपूर वेळ मिळायची शक्यता आहे. निकालानंतर त्यांचे डोळे उघडतील, तेव्हा हातातून केंद्रातली सत्ता गेलीही असेल. या स्थितीपर्यंत काँग्रेस पक्ष खाली आला तर त्यात आश्चर्य वाटू द्यायचे कारण नाही, कारण पक्षीय संघटनेचा तिथे पुरता बोजवारा उडाला आहे. पाच वर्षांपैकी पाचही वर्षे जनतेसाठी कष्ट करणारा पक्ष ही या पक्षाची प्रतिमा पूर्वीही होती, असे नाही, पण निदान शेवटच्या वर्षभरात तरी काँग्रेसजनांना काही काम करायची बुद्धी होत असे आणि मग ते निवडणुकांना सामोरे जायला सिद्ध होत. आता ते काम दाखवणार तरी कुणाला आणि ते पाहायला आहे तरी कोण? कुणी किती जागा मिळवल्या पेक्षा कुणी किती जागा गिळंकृत केल्या, याची जिथे राजरोस चर्चा होते, तिथे अपेक्षा तरी काय करणार? लालूप्रसाद यादव हे शंभर टक्के धर्मनिरपेक्ष आहेत. लालकृष्ण अडवाणींना बाबरी मशिद प्रकरणात बिहारमध्ये अटक करायचे धाडस लालूंनीच दाखवले होते. या उलट अडवाणींशी शरद पवारांनी १९९८-९९ मध्ये चक्क समझोता केला होता. काँग्रेसने महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागा लढवायची आवश्यकता असताना काँग्रेसनेते पवारांसमोर मात्र २६-२२ चा घोळ घालत बसले आहेत. निवडणूक तोंडावर येऊनही त्यांचे साधे उमेदवार निश्चित होऊ शकलेले नाहीत. अशा या पक्षाचा टेंभा लालूंनी उतरवला, तर त्यात नवल ते काय?