Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

अगदी सुरुवातीस जिजामाता उद्यान त्यानंतर गेल्या वर्षी सागर उपवन आणि नंतर पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिलोंडा ट्रेल या सर्व ठिकाणी झालेल्या सिटीवॉकमध्ये लोकसत्ताच्या वाचकांतर्फे एक विनंती वारंवार करण्यात आली ती म्हणजे ऐन वसंतामध्ये पुन्हा एकदा वनस्पतीतज्ज्ञांसमवेत सिटीवॉककरण्याची. खरेतर दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागातर्फे ऐन वसंतोत्सव सुरू असताना वृक्षसौंदर्याचा रसास्वाद नावाचा एक अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमादरम्यान मुंबईतील हिरवाईचा एक फेरफटका मारला जातो. वसंत म्हणजे फुलांचा ऋतू. म्हणजेच एक नयनरम्य सौंदर्यसोहळा..

गतिमंदांनी साकारली छोटेखानी गुढी
होळी झाली की बाजारात पारंपरिक साज चढविलेल्या छोटेखानी, रंगीबेरंगी, सुशोभित अशा गुढी पाहायला मिळतात. मात्र बाजारात सर्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या गुढींपैकी अनेक गुढी या सर्वसामान्यांच्या तुलनेत गतिमंद असलेल्या मुलांनी बनविलेल्या असतात, हे बहुधा थोडय़ाच लोकांना माहीत असेल. दादरच्या ‘आव्हान पालक संघा’तील गतिमंद मुलेही गेल्या आठ वर्षांपासून अशा छोटेखानी आणि आकर्षक गुढी बनवत असून त्यांनी तयार केलेल्या गुढींना बाजारात मोठी मागणी आहे. यंदा तर या संघाने पाच हजार गुढी बाजारात आणल्या आहेत. गतिमंद मुलांसाठी १८ वर्षांपर्यंत विशेष शाळा असतात. मात्र त्यानंतर त्यांचे भवितव्य काय असा प्रश्न सदर मुलांच्या पालकांना सतावत असतो. याच चिंतेतून दादरच्या ‘आव्हान पालक संघा’ची स्थापना करण्यात आली. संघाच्या सचिव वंदना कर्वे यांचा यात सिंहाचा वाटा आहे. कर्वे यांची मुलगी गतिमंद आहे. १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत ती विशेष शाळेत शिकली. मात्र ती शिकत असतानाच कर्वे यांना तिच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. आपल्या सारखीच अवस्था इतर गतिमंद मुलांच्या पालकांची असणार हे लक्षात घेऊन त्यांनी या संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९९० मध्ये ‘आव्हान पालक संघा’ची स्थापना करण्यात आली. दोन मुलांपासून सुरू झालेल्या या संघात आता २८ मुलांचा समावेश आहे. प्रत्येक मुलाकरीता विशेषकरून मुलींसाठी अर्थार्जन उपलब्ध करून देण्याकडे संघाचा कल आहे. गतिमंद मुलांच्या मदतीने निरनिराळ्या हंगामात लागणारे हार, कंठय़ा, तोरणे, शुभेच्छा भेट-कार्ड, सुशोभित पणत्या, तुळशी-वंृदावने इत्यादी वस्तू या मुलांकडून तयार करवून घेतल्या जातात. याशिवाय नोकरदार महिलांसाठी नित्य उपयोगाच्या वस्तू निवडून स्वच्छ केलेल्या ताज्या पालेभाज्या, शेंगभाज्या, किसलेले सुके, ओले खोबरे, सुक्या चटण्या, भाजणी व वेगवेगळे पीठ या वस्तूही कार्यशाळेत उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र या मुलांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये सर्वाधिक मागणी असते ती छोटेखानी गुढीला. सध्याच्या धावपळीच्या आणि घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालणाऱ्या जीवनात गुढी उभारण्यासाठी लोकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे बाजारातील ‘रेडीमेड’ गुढी घेण्याकडे लोकांचा कल असतो. त्यातही मोठय़ा गुढीपेक्षा छोटय़ाशा जागेत चपखल बसेल व सुशोभित अशा गुढय़ांना जादा मागणी असते. बाजारातील हा नवा ट्रेंड लक्षात घेऊन या अशी गुढी मुलांकडून तयार करून घेतल्या जातात. गेली आठ वर्षे ही संस्था गुढी बनवित आहे. पहिल्या वर्षी विविध आकाराच्या अवघ्या ३५० गुढी तयार करण्यात आल्या होत्या. मात्र दुकानदारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पहिल्याच प्रयत्नात सर्व गुढी विकल्या गेल्या व मागणी वाढली. परंतु पहिला प्रयत्न आणि गतिमंद मुलांनी तयार केलेल्या या गुढी विकल्या जातील की नाही या शंकेने फारच कमी प्रमाणात त्या बनविण्यात आल्या होत्या. पहिल्या वर्षीचा अनुभव आणि प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या वर्षी गुढींचे प्रमाण दुप्पट करण्यात आले. पण त्यावेळीही तीच परिस्थिती निर्माण झाली. यंदा या गतिमंद मुलांनी सुमारे पाच हजार गुढय़ा बनविल्या आहेत. प्रामुख्याने चार प्रकारच्या गुढय़ा ही मुले बनवितात. त्यामध्ये मध्यम आकाराची गुढी, मोठी गुढी, स्टँड गुढी आणि कार गुढी यांचा समावेश असतो. यापैकी कार गुढीचा ‘शो-पीस’ म्हणूनही वापरता येऊ शकते. याशिवाय विशेष अशी गुढी असलेले भेट-कार्डही बनविण्यात आले आहे. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे सर्व मुला-मुलींच्या नावाने पोस्टामध्ये जमा करण्यात येतात. या गुढी प्रभादेवी येथील नवकार स्टोअर, सवरेदय, माटुंगा येथील उल्हास दुग्धालय, जवाहर बुक डेपो, दहिसर येथील गणेश सुगंधालय, पनवेल येथील श्री नर्सरी येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मो. क्र. ९८१९००७६१७, ९८१९९८१४२८ वर संपर्क साधावा.
प्रतिनिधी

इंग्रजाळलेले संभाषण, ‘तिकिट विंडो’वर कायम इंग्रजी नाटकांची बुकिंग, हायफंडू वातावरण.. अभिजनांच्या एनसीपीएमध्ये अचानक घुंगुरांचे नाद ऐकायला येतात, ढोलकीवरची थाप ऐकू येते, अभिजनांच्या संस्कृतित न बसणाऱ्या शिटय़ा घुमू लागतात आणि काहीतरी वेगळे घडत असल्याचा अनुभव येतो. एनसीपीएत यावेळी खरोखरच काहीतरी वेगळे घडत आहे. आपल्या चौकटीला छेद देऊन एनसीपीएच्या संचालिका आणि ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी पारंपरिक लावणीच्या जतन-संवर्धनासाठी पुढाकार घेतला आणि विजयाबाईंची ही इच्छा महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचलनालय, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीअंतर्गत शाहीर अमरशेख अध्यसन केंद्राने लगेच उचलली. केवळ महोत्सवी स्वरूप न ठेवता लावणीची सर्वागाने चर्चा व्हावी, अशी भूमिका घेण्यात आली आणि एनसीपीएत राज्य शासनाचा लावणी महोत्सव आणि कार्यशाळेला मंगळवारपासून सुरूवात झाली. विजयाबाईंच्याच हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी लोककला अकादमीचे प्रबंधक डॉ. प्रकाश खांडगे, नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार आणि सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित होते. सध्याच्या लावण्यवतींनी पारंपरिक लावणी कलावतींचा आदर्श समोर ठेवावा व लावणीला बाजारी स्वरूप देऊ नये, अशी कळकळीची विनंती यावेळी केली. छाया खुटेगावकर आणि रेश्मा-वर्षां परितेकर या लावणी कलाकारांनी पारंपरिक लावणीचे उत्तमोत्तम अविष्कार सादर केले.
छाया : प्रदीप कोचरेकर