Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अगदी सुरुवातीस जिजामाता उद्यान त्यानंतर गेल्या वर्षी सागर उपवन आणि नंतर पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिलोंडा ट्रेल या सर्व ठिकाणी झालेल्या सिटीवॉकमध्ये लोकसत्ताच्या वाचकांतर्फे एक विनंती वारंवार करण्यात आली ती म्हणजे ऐन वसंतामध्ये पुन्हा एकदा वनस्पतीतज्ज्ञांसमवेत सिटीवॉककरण्याची. खरेतर दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागातर्फे ऐन वसंतोत्सव सुरू असताना वृक्षसौंदर्याचा रसास्वाद नावाचा एक अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमादरम्यान मुंबईतील हिरवाईचा एक फेरफटका मारला जातो. वसंत

 

म्हणजे फुलांचा ऋतू. म्हणजेच एक नयनरम्य सौंदर्यसोहळा..
वाळकेश्वर अर्थात मलबार हिलचा परिसर आजही हिरवागार पाहायला मिळतो. इथले दोन महत्त्वाचे हिरवे तुकडे म्हणजे फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान. या संपूर्ण परिसरात आपल्यासोबत असतात, बहिशाल शिक्षण विभागातील तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लट्टू आणि डॉ. रंजन देसाई. फिरोजशहा मेहता उद्यानात प्रवेश करण्यापूर्वीच पोपटी रंगांच्या पालवीने सजलेला करंज पाहायला मिळतो. उद्यानाच्या डाव्याबाजूने आपण सुरुवात करताक्षणी पहिलीच भेट होते ती रतनगुंजेशी. फुलोरा जावून आता रतगुंजेला लागलेल्या शेंगा आणि काहीतर पिळ पडून फुटलेल्या व त्यातून डोकावणाऱ्या लालचूटूक गुंजा.. पिळदार शेंगा हे तर रतनगुंजेचे वैशिष्टय़च. पिळ पडलेल्या या शेंगा आणि त्यातून डोकावणाऱ्या लाल गुंजा म्हणजे एक अप्रतिम डिझाईनच. सध्या नेहरू कलादालनात सुरू असलेल्या एका छायाचित्र प्रदर्शनात या शेंगांचेच डिझाईन शेलारे नावाच्या छायाचित्रकाराने टिपलेले पाहायला मिळते. या शेंगांमधील डिझाईनची मजा त्यात नेमकी उलगडते.
त्यानंतर एका कोपऱ्यावर भेटते ते विद्येचे झाड. याची पाने पुस्तकात ठेवली की, विद्या लाभते असा एक समज रूढ आहे. त्यानंतर डावीकडे पुन्हा एकदा मोठय़ा करंजाचे दर्शन होते. मग डॉ. लट्टू माहिती देतात, करंज हा अस्सल भारतीय वृक्ष आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास त्याची पानगळ होते. पण केवळ आठवडय़ाभरातच पालवीने पूर्ण झाड भरून जाते. याची हिरवीगार पाने कैरी किंवा आंब्याच्या पॅकिंगसाठी वापरली जातात. याच्या बियांपासून तेल काढले जाते. त्याचा वापर त्वचारोगांसाठी केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव पोंगामिया पिन्नाटा. तामिळनाडूमध्ये पोंगम या सणामध्ये त्याचा वापर केला जातो. त्यावरून पोंगामिया हे नाव रूढ झाले आहे.
कौरवपिता गुयनन्सिस म्हणजे कैलासपती हा पोंगामियाच्या पुढे लगेचच भेटतो. डॉ. रंजन देसाई त्याचवेळेस आपल्याला सांगतात की, प्रचंड वाढलेला कैलासपती पाहायचा असेल तर मात्र मुंबई विद्यापीठाचा फोर्ट परिसर गाठायला हवा. त्याला इंग्रजीत कॅनन बॉल ट््ररी असेही म्हणतात. त्याच्या फुलांना खूप छान वास येतो. फुलाची रचना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे आणि मधोमध शंकराच्या पिंडीसारखा आकार आणि त्यावर फणाधारी नागासारखी रचना. हे फूल शंकराला आवर्जून वाहिले जाते. या फुलाला मंद छान वास येतो. या झाडाच्या परिसरातही मंद सुगंध येतो. पण जेवढा छान गंध फुलाला येतो, तेवढाच दरुगध त्याच्या फळांनाही येतो. विद्यापीठाच्या आवारात असलेल्या झाडाची मुळे तर अगदी दूरवर पसरलेली आहेत. या झाडातच्या बाबतीत आणखी एक गंमत डॉ. लट्टूंनी सांगितली. झाड वरून छाटले जाते तेव्हा याच्या खोडावर येणाऱ्या फुलांच्या फांद्या छोटय़ा असतात आणि जेव्हा वरची छत्र वाढते तेव्हा येणाऱ्या फुलांच्या फांद्या या अधिक लांबीच्या असतात. अर्थात हे केवळ एक- दोनदा पाहून नव्हे तर त्याचा कुणीतरी पद्धतशीर अभ्यास करून निष्कर्ष काढायला हवेत, हे सांगायलाही डॉ. लट्टू विसरत नाहीत.
आपण उद्यानातला एक कोपरा पूर्ण करून पुढे सरकतो त्याचवेळेस एका बाजूला मोठा पर्जन्यवृक्ष अर्थात रेन ट्री पाहायला मिळतो. मुंबईमध्ये हा वृक्ष आता रस्त्याच्या कडेला मोठय़ा संख्येने दिसतो. समानिया समान हे त्याचे शास्त्रीय नाव. त्याला इंग्लिश शिरिष असेही म्हणतात. मूळचा हा दक्षिण अमेरिकेतील वृक्ष. त्याच्यावर विशिष्ट प्रकारचे कीडे असतात. त्यांची विष्ठा सतत अंगावर पडते. त्यांच्या शेंगांमध्ये एक गोड चीक येतो. शिवाय त्याला गोडूस वासही येतो. या शेंगा हे वटवाघळांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे राणीच्या बागेत या मोठय़ा पर्जन्यवृक्षाला मोठय़ा संख्येने वटवाघळे लटकलेली दिसतात. हाच अनुभव नेव्ही नगरमध्येही घेता येतो. मुंबईतील प्रत्येक मोठय़ा रस्त्यावर आपल्याला हा वृक्ष पाहायाल मिळतो. त्यामुळेच त्याला मुंबईची छत्रछाया म्हणायलाही हरकत नाही.
पुढे असतो तामण. तामण हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. त्याचे शास्त्रीय नाव लॅगेस्ट्रोमिया स्पेसिओसा. जांभळा आणि गुलाबी अशा दोन रंगांमध्ये तामणीची फुले पाहायला मिळतात. खरेतर हा कोकणात मोठय़ा प्रमाणावर सापडतो. क्रेप कागदासारखा फील त्याच्या पाकळ्यांना असतो. त्यामुळे त्याला क्रेप फ्लॉवर असेही म्हणतात.
तसेच क्विन्स फ्लॉवर म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. या वृक्षाची कधीही पूर्ण पानगळ होत नाही. फेब्रुवारी- एप्रिल महिन्यात त्याच्या मंजिऱ्या दिसू लागतात आणि पाण्याची मुबलकता असेल तर या महिन्यांबरोबरच जुलै- ऑगस्ट महिन्यातही त्याचा फुलोरा पाहाता येतो.
इथेच काही अंतरावर आपल्याला लाल-गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा असे दोन्ही चाफे पाहायला मिळतात. त्याचे पान तोडल्यास त्यातून चीक बाहेर येतो. पांढऱ्या रंगाच्या या चीकामुळे त्याला क्षीरचंपा आणि त्यानंतर अपभ्रंश होऊन खूरचाफा असे नाव मिळाले. प्लुमेरिया रुब्रा हे लाल चाफ्याचे शास्त्रीय नाव. काही झाडांवर याच्या मोठय़ा शेंगाही पाहायला मिळतात. काही ठिकाणी झाडाच्या बुंध्यावर जटांसारखी मुळेही पाहायला मिळतात. हवेतील आर्द्रता शोषण्यासाठीही ही खास सोय आहे..
नेच्यासारखी पाने असलेला फर्न ट्री समोरच दिसतो. हा सदाहरीत वृक्ष आहे. या फेरफटक्याचे वैशिष्टय़ म्हणजे झाडांची माहिती सांगताना डॉ. लट्टू आणि डॉ. देसाई आपल्याला झाडांच्या विस्ताराची नेमकी माहिती देतात. त्यामुळे आपल्याला कोणती झाडे कुठे लावावीत आणि कुठे लावू नयेत, याचेही नेमके ज्ञान मिळते. त्यामुळे मोठय़ा रस्तावर लावतांना कोणतीही झाडे लावायची आणि लहान गल्ल्यांमध्ये कोणती लावायची याचा प्रश्न आपसूकच सुटतो..
मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या वृक्षसौंदर्याचा रसास्वाद या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क (सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत) ६५६९२७६१, ६५२९६९६१.
(क्रमश)