Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पंतप्रधानपदासाठी संघाचा आज अडवाणींना, तर उद्या मोदींना पाठिंबा
संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा उद्यापासून
मनोज जोशी, नागपूर, १८ मार्च

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा येत्या २० तारखेपासून रेशीमबाग येथे

 

होत असून, येत्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आज अडवाणी असले, तरी यानंतर या पदासाठी नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देण्याचे संघाने निश्चित केले आहे. या सभेत नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा दरवर्षीच होत असली, तरी दर तीन वर्षांनी नागपूरला होणाऱ्या या बैठकीत आगामी तीन वर्षांसाठी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड केली जाते. यंदा २० मार्चपासून तीन दिवस ही सभा होणार आहे. गेली तीन ‘टर्म’ डॉ. मोहन भागवत हे सरकार्यवाह या अतिशय महत्त्वाच्या पदावर आहेत. ते या पदावरून जाणार अशी अधूनमधून चर्चा होत असली, तरी पुन्हा त्यांचीच सरकार्यवाहपदी निवड होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मोहन भागवत यांनी या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघ परिवारातील गोंधळ थांबवून शिस्त आणली. २००४ ते २००६ या काळात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून संघटनेला अडचणीत आणले होते. हे प्रकार त्यांनी थांबवल्यामुळे अलीकडे सरसंघचालक सुदर्शन यांच्यासह कुणीही अशी वक्तव्ये केलेली नाहीत. संघाचा खरा प्रमुख निवडून आलेला सरकार्यवाह आहे, नियुक्त सरसंघचालक नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले. यामुळेच अडवाणींच्या बाबतीत झालेले किस्से संपून संघाचे आज भाजपवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे वारसदार नरेंद्र मोदी हेच राहणार असल्याची व्यवस्था भागवत यांनीच करून ठेवली आहे.
योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांनी २०११ साली भारताचा अभ्युदय सुरू होणार असल्याचे नमूद केले आहे. आपल्याला त्या सुवर्णक्षणाचा साक्षीदार व्हायचे असल्याचा उल्लेख सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांनी अलीकडच्या भाषणांमध्ये बरेचदा केला आहे. त्यामुळे ते पदत्याग करतील असे अनेकांना वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी पदावर कायम राहण्याचा संकेत या वक्तव्यातून दिल्याचे मानले जात आहे.
नवे सरकार्यवाह जाहीर करणार असलेल्या संघाच्या नव्या कार्यकारिणीत काही किरकोळ फेरबदल अपेक्षित आहेत. सध्या भैयाजी जोशी, मदनदान देवी व सुरेश सोनी हे सहसरकार्यवाह आहेत. काही वर्षे अ.भा. विद्यार्थी परिषदेचे प्रमुखपद सांभाळलेले व सध्याचे सह बौद्धिक प्रमुख दत्तात्रय होसबळे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे. पूर्वीचे सरसंघचालक रज्जूभैया यांचे स्वीय सचिव राहिलेले श्रीश देवपुजारी यांनाही महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
या सभेत देशाच्या विविध प्रांतांमधील संघाचे पदाधिकारी संघाच्या कामकाजाचा अहवाल सादर करतील. संघ परिवारातील इतर संघटनांचे प्रतिनिधीही त्या-त्या संघटनांच्या कामाविषयी माहिती देतील. मात्र योगायोगाने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या सभेत निवडणुकीची चर्चा अपरिहार्य राहणार आहे.
यावेळची निवडणूकही गेल्या वेळाप्रमाणे त्रिशंकू परिस्थितीची राहील आणि दोन वर्षांत पुन्हा निवडणुकीची वेळ येऊ शकेल, अशी संघात चर्चा आहे. त्या अर्थाने ही निवडणूक ‘रंगीत तालीम’ असणार आहे. आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अडवाणी असले, तरी नंतरच्या निवडणुकीत त्यांची जागा नरेंद्र मोदी घेतील हे संघाने निश्चित केले आहे.
संघाने मधल्या काळात अंगिकारलेला राष्ट्रवाद सोडून पुन्हा हिंदुत्वाचीच वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे. रामसेतू व अमरनाथ मुद्यांवर झालेल्या आंदोलनात संघ प्रत्यक्ष सहभागी नव्हता. यापुढे संघ स्वत: कुठलेही आंदोलन करणार नाही; तर हिंदू समाज आंदोलन करेल व संघ त्याला पाठबळ देईल असे निश्चित झाले आहे. अमरनाथ प्रकरणात वापरलेला ‘फॉम्र्युला’ येत्या निवडणुकीत ओरिसामध्ये वापरण्याचे संघाने ठरवले असून हिंदू नेते स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या हा निवडणुकीचा मुद्दा करण्याचा भाजपचा निर्णय त्याचेच निदर्शक मानले जात आहे. याशिवाय साध्वी प्रज्ञासिंग प्रकरण, देशाला भेडसावणारा दहशतवाद, आर्थिक मंदी, बेकारी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही संघाच्या प्रतिनिधी सभेत चर्चा होणे अपेक्षित आहे.