Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मालवणी तडको
दिल्ली भारतीय विद्यालय ही जगात नावाजलेली शाळा. फोडलेल्या नारळासारखी अर्धगोलाकार

 

असलेली त्येंची इमारत जगात प्रसिद्ध. या शाळेतून अनेक हुशार विद्यार्थी इले आणि अभ्यास करून गेले. आता या शाळेचा अजूनय नाव टिकून असला तरी पूर्वीसारखो स्टँडर्ड रवक नाय. पूर्वी हयसर प्रवेश मिळवणा सोप्या नव्हता. खरो मेरिटवालोच विद्यार्थी या शाळेत पोची. परंतु काळानुसार सगळाच बदलल्यानी.. हिकडेसुद्धा पैसो आणि घराणेशाहीच्या बळावर प्रवेश मिळूक लागलो. याची सगळ्यांक खंत वाटता, पण करतलोव काय, अशी स्थिती आसा.. आज शाळेत मोठी लगबग होती. धाहवीच्या नवीन बॅचचो प्रवेश सुरू झाल्यानी. यंदाची ही शाळेची १५ वी बॅच. आता आपला शालेय जीवन सोपतला. म्हणून यंदाच्या धाहवीच्या बॅचचो मॉनिटर होवच्यासाठी पोरांत एकच स्पर्धा लागलली. दिल्ली विश्वविद्यालयाच्या धहावीच्या बॅचचो मॉनिटर होणा म्हणजे एक मोठी प्रतिष्ठा होती. यासाठीच पोरांची ‘गटबाजी’ सुरू होती. शाळेत पोरांचो म्हणजे टारगट पोरांचो एक गट होतो. ही पोरा खिशात नेहमीच तिरंगी रुमाल ठेवत. वैशिष्टय़ म्हणजे या टारगट मुलांक वेसण घालणारी तेंची पुढारी पोरगी होती. बरा ह्य़ा पोरीचो आई-बाप फॉरेनर. सुरुवातीक तेका हिंदी येय नाय म्हणून बऱ्याच पोरांनी टवाळकी केली. पण या चेडवान आपल्या गटातल्या पोरांर ताबो मिळवलोच. आता तर ह्य़ा चेडवान जरा ‘हात’वर उगारलो तरी पोरा चड्डीत मुततत अशी स्थिती आसा. दुसरो जरा मोठो एक पोरांचो गट आसा, ही पोरा नेहमीच भगवो रुमाल गळ्यात बांधतत. एकेकाळी ही पोरा खूप शिस्तीत होती. पण एकदा त्येंचो मॉनिटर झालो आणि ही पोरा बिघडली. ह्य़ा पोरातून तीन-चार जणांनी यंदा मॉनिटर होवचेसाठी गळ टाकून ठेवलेसत. पोरांचो आणखी एक गट आसा, ती पोरा नेहमीच लाल टी शर्ट घालतत. बंद, संप, टाळेबंदी करण्यात ह्य़ा पोरांचो कोण हाथ धरुचो नाय. ही पोरा काळ बदलूनय अजून तरी शिस्त पाळतसत. हेका एकदा मॉनिटर जावचो चान्स आयललो पण तेंनी ‘तत्व’ म्हणून तो धुडकावून लायलो. या वर्गात मराठी आळीतल्या पोरांची एक छोटोसो गट आसा. या गटप्रमुखान मध्यंतरी मराठी मॉनिटर यंदा जावकच होयो, अशी आरोळी ठोकल्यानी. तितक्यात शाळेच्या परिसरातल्या असलेल्या बागेतल्या एका ‘वाघान’ सहजच डरकोळी फोडल्यांनी. या गटप्रमुखाक वाटला, त्या वाघानं आपल्या मागणीक पाठिंबो दिलो. पण तसा कायच नव्हता. मॉनिटर जावच्यासाठी आणखी एक चेडू इच्छूक आसा. ह्य़ा चेडवान आपलो दरारो टिकण्यासाठी शाळेत हत्तीवरून येवक सुरुवात केलीसा. यंदा मॉनिटर कोण जातलो, याची पोरांत दबक्या आवाजात चर्चा सुरू असतानाच ‘प्रतिमा’ नसलेली प्रिन्सिपॉल प्रतिभा टिचर वर्गात इली. पोरांनी गुड मॉर्निग टिचर म्हटल्यांनी. टिचरान आपला भाषण सुरू केल्यांनी, ‘यंदाचा तुमचा धहावीचा वर्ष आसा. आता तुम्ही मॅच्युअर झाल्यासात. जबाबदारीन वागा. आता वर्षांचा पहिला काम मॉनिटर निवडीचा, ता मी सुरू करतय. तुमी आता अभ्यासात लक्ष दिवक होया. त्यामुळे यंदा मॉनिटर निवडीत जास्त वेळ न काढता तुमीच समजुतीत कोण तो जाहीर करा.’ त्याबरोबर वर्गातली सुमारे साडेपाचशे सर्वच्या सर्व पोरा उभी रवली आणि माका मॉनिटर करा असो एकच गलको सुरू केल्यानी. पहिल्याच बेंचवरून आवाज इलो, ‘टिचर तुमी मराठी, मी पण मराठी, म्हणून माका मॉनिटर करा आणि मराठी आळीत आजवर झाल्ललो अन्यायाचो बॅकलॉग भरून काढा.’ पोरांची बोंबाबोब वाढत गेली, तशी थंड चेहऱ्याच्या प्रतिभा टिचरचो चेहरो लालेलाल झालो. आणि त्येंनी घोषणा केल्यानी— ‘सगळे आदी गप्प बसा. मॉनिटरसाठी निवडणूक जायत. त्यानंतरच मी कोण मॉनिटर जायत ता ठरवीन.’ टिचरच्या घोषणेन मॉनिटरपदाचे उमेदवार नाराज झाले, पण लगेचच उत्साहात निवडणुकीच्या कामाक लागले.
तुकलो आचारी