Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राज ठाकरे नाशिकमध्ये शनिवारी फोडणार प्रचाराचा नारळ
नाशिक, १८ मार्च / प्रतिनिधी

पक्ष स्थापनेनंतर प्रथमच लोकसभेसारख्या सर्वव्यापी निवडणुकीला सामोरे जाताना राज ठाकरे यांनी

 

आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा नारळ नाशकात फोडण्याचा निर्णय घेतल्याच्या परिणामी येत्या शनिवारी येथे होत असलेल्या त्यांच्या प्रचारसभेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ज्या ठिकाणी पंधरवडय़ापूर्वी राष्ट्रवादीचे अधिवेशन झाले त्याच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित सभेच्या निमित्ताने मनसे शक्तीप्रदर्शन करणार असून या सभेत मनसेच्या काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांना नाशिक व परिसरात मोठा पाठींबा मिळाला आहे. त्यामुळेच नाशिककडे मनसेचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. त्यादृष्टीने राज यांच्या सभेसाठी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी स्थानिक नेतेमंडळींनी चालविली असून यावेळी उत्तर महाराष्ट्रातून किमान दीड ते दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सरचिटणीस वसंत गीते व अतुल चांडक यांनी पत्रकारांना दिली. मनसेने मराठी अजेंडा स्वीकारल्यावर त्याची सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया नाशिकमध्येच उमटली होती. त्यानंतर राज यांना झालेल्या अटकेचेही येथे हिंसक पडसाद उमटले होते. अलीकडेच प्रजासत्ताकदिनी भोजपुरी गीतांचा कार्यक्रम उधळून लावल्याचे मनसेच्या स्थानिक नेत्या-कार्यकर्त्यांचे प्रकरणही राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते. या पाश्र्वभूमीवर, निवडणूक प्रचारसभेच्या निमित्ताने येथे येत असलेले राज ठाकरे काय बोलतात त्याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. मराठीच्या आपल्या मुद्दय़ालाच राज निवडणुकीच्या तोंडावर फोडणी देतात की आणखी काही नवाच मुद्दा पुढे करतात, त्याविषयी तर्क-वितर्क सुरू आहेत.