Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

एक स्टेप.. चुकलेली!
१९७७ पासून इंदिरा गांधी यांच्या विरोधात तयार झालेले वातावरण दीड वर्षांतच खरे तर बदलत होते; तथापि महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांना त्याचा

 

अंदाज आला नाही. इंदिराजींबरोबर जाण्यात फायदा नाही; महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांचाच प्रभाव आहे आणि पुढेही राहील असे समजणाऱ्यांमध्ये मधुकरराव चौधरी यांच्यासारखे लोकही होते. वसंतराव नाईक वगैरे मंडळी इंदिराजींबरोबर राहिली; तसे मधुकरराव राहिले असते तर १९८० च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (आय)चा जळगाव मतदारसंघातील उमेदवार म्हणून ते Hobson's Choicel ठरले असते; परंतु ते चव्हाण-रेड्डी काँग्रेसकडे गेल्याने लोकसभेत जाण्याची त्यांची संधी हुकली.
१९८० च्या लोकसभा निवडणुकीत मधुकरराव चौधरी काँग्रेस (यू)चे उमेदवार म्हणून उभे राहिले. २० वर्षांहून अधिक काळ मंत्री म्हणून प्रभावीपणे कार्य केलेल्या चौधरींनी शिक्षण, अर्थ, महसूल यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी लीलया पेलली होती. वध्र्याच्या महात्मा गांधी विश्व हिंदी विद्यापीठाचे ते संस्थापक होते. त्यांचे कार्य आणि प्रतिमा पाहता ते या निवडणुकीत निश्चित विजयी होतील असे वाटत होते. जळगावचे त्या वेळचे खासदार वाय. एम. बोरोले (जनता पक्ष) आणि काँग्रेस (आय)चे उमेदवार वाय. एस. महाजन यांच्याशी मधुकररावांचा सामना होता. काँग्रेस (आय) केंद्रात सत्तेवर येईल असे कोणालाच वाटले नव्हते. जळगावमध्येसुद्धा मधुकरराव जिंकतील आणि वाय. एस. महाजन तिसऱ्या क्रमांकावर राहतील असाच बहुतेकांचा होरा होता.
मतमोजणी सुरू झाली तेव्हा वाय. एस. महाजन प्रथमपासूनच आघाडीवर होते; तथापि मध्ये काहीतरी गडबड झाली आणि मधुकरराव चौधरी यांनी मोठी आघाडी घेतल्याचे वृत्त मुंबई आकाशवाणीवरून दुपारी देण्यात आले; परंतु प्रत्यक्षात तसे नव्हते. काही वेळानंतर ती माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जात, समाजाच्या मुद्दय़ावर मतदानाचा कौल जाण्याचा प्रश्नच नव्हता. कारण वाय. एस. महाजन, मधुकरराव चौधरी आणि वाय. एम. बोरोले हे तिन्ही प्रमुख उमेदवार एकाच समाजाचे होते.
काँग्रेस (आय)चे वाय. एस. महाजन १ लाख ९६ हजार ५५० मते मिळवून विजयी झाले. जनता पक्षाचे अ‍ॅड. बोरोले हे १ लाख १९२ मते मिळवून दुसऱ्या स्थानावर होते. मधुकररावांना फक्त ८३,९५९ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. ही निवडणूक हरल्यास आपण आमदारकीचाही राजीनामा देऊ, असे त्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले असल्याने निकालानंतर त्यांच्याकडे प्रचंड गर्दी होती. ‘‘आता पुढे काय करणार?’’ सगळे विचारत असताना मधुकरराव शांत होते. त्यानंतरचा इतिहास सर्वाना माहिती आहे. पुढे बऱ्याच काळानंतर त्यांचे GANDHI MARG - A HOPE FOR HUMANITY हे पुस्तक वाचनात आले तेव्हा त्यांचे मौन आणि कृती यांचा अर्थ कळला..!
अनिल पं. कुळकर्णी