Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

झारखंडमध्ये काँग्रेसची राजदवर कुरघोडी
झामुमोशी तडजोड करून लालूंवर दोन जागांची मेहेरबानी
नवी दिल्ली,१८ मार्च/ पी.टी.आय.

बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान जोडगोळीने परस्पर जागावाटपाचा निर्णय जाहीर करून अवघ्या तीन जागांचा जबर झटका दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्व सावरले असून

 

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाशी सन्मानजनक वाटाघाटी करून सात जागा पदरात पाडून घेण्यात काँग्रेसने यश मिळवले आहे. झारखंडमध्ये लालूंवर कुरघोडी करण्याच्या राजकारणात राष्ट्रीय जनता दलासाठी काँग्रेस-झामुमो युतीने फक्त दोनच जागा सोडल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत लालूंचे दोन उमेदवार या जागांवर निवडून आले होते त्यामुळे यापेक्षा जास्त जागा देण्यास काँग्रेसने नकार दिला. झारखंडमध्ये लोकसभेचे १४ मतदारसंघ असून काँग्रेस सात तर झामुमो पाच जागी उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणा झारखंडचे काँग्रेस निरीक्षक के. केशव राव यांनी पत्रकारांना दिली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सहा, झामुमोने चार तर राजदने दोन जागांवर उमेदवार उभे केले होते. बिहारमधील घडामोडी घडण्यापूर्वी काँग्रेस झारखंडमध्ये राजदला तीन जागा देईल, असे संकेत मिळाले होते. परंतु, लालू-पासवान युतीने परस्पर जागावाटप जाहीर केल्याने काँग्रेस नेते संतप्त झाले आहे. त्यामुळे लालूंना शह देण्यासाठी झामुमोशी जागावाटपाची घाई करण्यात आली, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कोडेरामा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राजद या दोन्ही पक्षांना हवा होता. येथून झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.