Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तामिळनाडूत युतीसाठी भाजप विजयकांत यांच्यामागे
चेन्नई, १८ मार्च/पीटीआय

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने तामिळनाडूतील द्रमुक

 

पुरस्कृत आघाडीत सामील व्हावे यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच भारतीय जनता पक्षानेही युतीबाबत विजयकांत यांच्याशी चर्चा केली आहे. तामिळनाडूमध्ये भाजपची कोणत्याही पक्षाबरोबर युती झालेली नाही. त्यामुळे भाजपने डीएमडीके पक्षाबरोबर युती होऊ शकेल का याबाबतची चाचपणी सुरू केली आहे. मात्र भाजपचे राज्यप्रमुख गणेशन यांनी या घटनेला फारसे महत्त्व नसल्याचे म्हटले आहे. डीएमडीकेला २००६ च्या विधानसभा निवडणुकीत ८ टक्के मते पडली होती. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
तामिळनाडूतील द्रमुक आणि अण्णा द्रमुक या महत्त्वाच्या पक्षांनी यूपीए आणि तिसऱ्या आघाडीची साथ घेतली आहे. द्रमुक पुरस्कृत आघाडीत डीएमडीके पक्षाने सामील व्हावे, असे जाहीर आवाहन काँग्रेसने केले आहे. पण तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांनी डीएमडीकेला कोणतेही निमंत्रण देणार नसल्याचे स्पष्ट करताना अशा प्रकारच्या वृत्तांना प्रसारमाध्यमे जबाबदार असल्याचे सांगितले आहे. भाजपशी युती करून द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांना विरोध करणारा द्रविडी पक्ष म्हणून डीएमडीके आपली ओळख निर्माण करू शकेल, असे गणेशन यांनी म्हटले आहे.
आर. सरथकुमार यांच्या अखिल भारतीय समथुवा मक्कल कच्छी या पक्षाशीही युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.