Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आईस्क्रीम, फुगे, पतंग बनलीत पक्षांची निवडणूक चिन्हे
नवी दिल्ली, १८ मार्च/पी.टी.आय.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढणाऱ्या (अपक्ष) उमेदवारांकरीता निवडणूक

 

आयोगाकडून ‘फुगे’, ‘पतंग’, ‘फणी’, ‘ब्रश’, ‘केक’, ‘आयस्क्रिम’ अशा विविध निवडणूक चिन्हांची खैरात केली जात आहे. या चिन्हांमध्ये यंदा प्राणी, खाद्यपदार्थ, फळे आदींचीही वर्णी लागली आहे.
उमेदवाराची ओळख सोपी व्हावी हा निवडणूक चिन्ह देण्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. कोणत्याही व्यक्तीची दृश्यस्मृती ही सर्वाधिक असते. वेगवेगळ्या चिन्हांमुळे मतदारांना उमेदवारांमधील फरक चटकन लक्षात येतो, तसेच मतदान करणे सोपे होते, म्हणून निवडणूक चिन्हे प्रदान केली जातात, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा उमेदवारांकरीता देण्यात आलेल्या निवडणूक चिन्हांमध्ये केळी, केक, गाजर, नारळ, आयस्क्रिम, ब्रेड या खाद्यपदार्थाचा समावेश असून, बास्केट, ब्रश, पंखा, फणी, कढई, सिलेंडर, प्रेशर कुकर आणि स्टोव्ह या दैनंदीन वापरातल्या महत्त्वपूर्ण वस्तूंचाही समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपचे ‘कमळ’, काँग्रेसचा ‘हात’ ही निवडणूक चिन्हेदेखील आयोगाच्या यादीत आहेत. त्याचबरोबर फळा, फलंदाज, पेटी, कॅमेरा, मेणबत्ती, डिझेल पंप, इलेक्ट्रीक पोल, फ्रॉक, बटवा, रेल्वे, चमचा, काठी, शिटी अशा अनेक सहज लक्षात राहणाऱ्या गोष्टींची यादीमध्ये नोंदणी झाली आहे.