Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वर्धेतून मेघेंचा पत्ता कापण्यासाठी पवारांना गळ?
वर्धा, १८ मार्च / प्रतिनिधी

वर्धेतून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळण्यास प्रयत्नशील असणारे दत्ता मेघे यांना प्रत्यक्ष निवडणुकीत

 

नामोहरण करणे शक्य नसल्याने उमेदवारी जवळपास पक्की झालेल्या मेघेंचा पत्ता आता पवारांनीच कापावा, अशी गळ राकाँ नेत्यांनी घातल्याची माहिती पुढे आली आहे.
वर्धेतून दत्ता मेघे, चारूलता टोकस व प्रमोद शेंडे यांनी दावेदारी केली आहे. याच संदर्भात मंगळवारी रात्री घडलेल्या घडामोडीत दत्ता मेघेंना पक्षातर्फे भक्कम कवच मिळाल्याची माहिती मिळाली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मेघेंना विरोध करण्याचा सूर मवाळ झाल्याचे समजले. वर्धा क्षेत्रातील धामणगाव-चांदूरचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनीच सौ. चारूलता टोकस यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. उर्वरित आमदारांनी ‘मेघेंचा विरोध कशाला’ असा प्रश्नच केला. मोर्शीचे आमदार हर्षवर्धन देशमुख यांनी मेघे विरोधात उघड भूमिका घेण्याचे टाळून ‘आपण नाही तर नरेश ठाकरे मेघेंना मदत करतील, मग मीच विरोध कशाला घेऊ’, असा सूर आळविला.
मेघेंना पक्षात प्रवेश देतेवेळीच वर्धेतून काँग्रेसचे तिकिट देण्याची खात्री देण्यात आली होती. आता नाकारण्याचे कारण काय, असा सवाल मेघेंची भक्कम पाठराखण करणारे विलासराव देशमुख यांनी केला. प्रमोद शेंडेंच्या नावावरही चर्चा झाली. दोन आमदार तेली समाजाचे असल्याने एक ज्येष्ठ व निष्ठावंत काँग्रेस नेता म्हणून प्रमोद शेंडेंच्या नावावर विचार करण्याची गळ घालण्यात आली. सरतेशेवटी काँग्रेसचा उमेदवार ठरवतांना वर्धा क्षेत्रातील प्रत्येक आमदाराचे मत विचारात घ्यावे, असा सूर उमटला. मात्र आता दिल्लीतच येत्या दोन दिवसात निर्णय लागणार असल्याचे सांगून आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी मेघेंविरोधी सूर थंड केला.