Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राज्यातून किमान १२ खासदार निवडून आणण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट
अंतुले व मुकुल वासनिक यांना उमेदवारी
मुंबई, १८ मार्च / खास प्रतिनिधी

शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळावे म्हणून राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर

 

राष्ट्रवादीचा भर असताना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातून किमान १२ खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्यातील नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे अपेक्षेप्रमाणे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच रामटेकमधून मुकूल वासनिक यांना उभे राहण्याची सूचना पक्षाने केली आहे.
गेल्या वेळी राज्यातून काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले होते. या वेळीही राज्यातील नेत्यांनी १३ किंवा त्यापेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अ. भा. काँग्रेसने किमान १२ खासदार निवडून यावेत, असे लक्ष्य ठरवून दिल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. गेल्या वेळी मुंबईतून पाच खासदार निवडून आले होते. या वेळी तीन खासदार निवडून येतील, अशी शक्यता आहे. मराठवाडय़ात गेल्या वेळी पाटी कोरी होती. नांदेड व लातूर या दोन जागा निश्चित निवडून येतील, अशी काँग्रेस नेत्यांना अपेक्षा आहे. विदर्भात तीन किंवा चार जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. नंदुरबार व धुळे हे दोन मतदारसंघ कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. पुणे, सोलापूर व सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर अनुकूल मत असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीचे राज्यातून १२ ते १३ खासदार निवडून येऊ शकतात, असे पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या आढाव्यात आढळून आले आहे. मात्र १५ खासदार निवडून आणण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होऊ न शकल्यास १९९९ च्या निकालांची पुनरावृत्ती होईल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. तेव्हा काँग्रेसचे १० तर राष्ट्रवादीचे सहा खासदार निवडून आले होते.
बॅ. ए. आर. अंतुले यांचे निवडणूक लढविण्याबाबत तळ्यात-मळ्यात सुरू होते. मात्र त्यांनी रायगडमधून निवडणूक लढविण्यास अनुकूलता दर्शविली आहे. रामटेकमधून मुकूल वासनिक निवडणूक लढविण्यास सुरुवातीला फारसे उत्सूक नव्हते. आता पक्षानेच त्यांना निवडणूक लढविण्याची सूचना केली आहे. ईशान्य मुंबई हा मतदारसंघ अवघड असल्यामुळे गुरुदास कामत यांचे लक्ष दक्षिण-मध्य मुंबईवर होते. एकनाथ गायकवाड यांनाच पुन्हा तेथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे कामत यांच्या नावाचा उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी विचार सुरू झाला आहे. या मतदारसंघात कृपाशंकर सिंग हे सुद्धा इच्छुक होते. त्यांचे नाव आता मागे पडले आहे. संजय निरुपम, उद्योगपती विजय कलंत्री, चित्रपट अभिनेता संजय खान, अभिनेत्री नगमा आदींचा या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहे.