Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ कार्यक्रमात भारनियमनाच्या मुद्यावरून भडका
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ कार्यक्रमात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार केंद्रीय मंत्री विलास

 

मुत्तेमवार आणि भाजपचे बनवारीलाल पुरोहित आमने-सामने येताच भारनियमनाच्या मुद्यावरून गोंधळ झाला. विधानभवन परिसरातून या कार्यक्रमाचे बुधवारी थेट प्रक्षेपण सुरू असताना गोंधळ झाल्याने कार्यक्रम गुंडाळावा लागला.
अँकर किशोर अजवाणी यांनी श्रोत्यांमधील एका बालिकेला विजेबाबत प्रश्न करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर उभय नेत्यांचा परिचय करून दिला. या प्रश्नावरून हे व्दंद रंगणार, असे स्पष्ट झाले. विदर्भात वीज मुबलक आहे पण, ती राज्याच्या इतर भागात वितरित करण्यात येते. अकराव्या पंचवार्षिक योजनेत येत्या तीन वर्षांत १ लाख मेगाव्ॉट वीज उपलब्ध होईल, असे विलास मुत्तेमवार यांनी सांगितले. यावर भाजप समर्थक श्रोत्यांनी वीज केव्हा मिळेल व भारनियमनातून कधी मुक्ती मिळेल, असे सवाल केले.
यानंतर बनवारीलाल पुरोहित यांनी मुत्तेमवार यांच्यावरच तोफ डागली. सर्वात अकार्यक्षम मंत्री असल्याचा ठपका संसदेच्या स्थायी समितीने मुत्तेमवारांवर ठेवला असल्याचा आरोप त्यांनी केला. अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची तरतूद ६३२ कोटी रुपयांवरून ४८९ कोटी रुपये आली, असे अहवालात नमूद असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उभयतांमधील युक्तिवाद रंगत असतानाच गोंधळास सुरुवात झाली.
काँग्रेस आणि भाजपचे समर्थक आमने-सामने आले. ‘विलास मुत्तेमवार आगे बढो’ तर, दुसऱ्या बाजूने ‘बनवारीलाल पुरोहित आगे बढो’, अशी घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मागे हटण्यास तयार नव्हते. सायंकाळी ६ वाजेनंतर शहरात भारनियमन होते का, असा सवाल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थिनीला भारनियमनाबाबत प्रश्न विचारल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. हा गोंधळ सुरू असतानाच सवाल जवाब झाले. यावरून पुन्हा घोषणायुद्ध रंगले. खुच्र्यांची फेकाफेक झाली. वादावादी करणारे कार्यकर्ते मागे हटण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होताच या गोंधळातच कार्यक्रम अखेर गुंडाळावा लागला. स्टारचे कार्यकारी संपादक डॉ. अनिल सिंग आणि विदर्भाच्या ब्युरो चीफ सरिता कौशिक यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची समजूत घातली.
ही घटना निंदनीय आहे. नागपूरची अशी संस्कृती नाही. मंत्र्यांनी स्थायी समितीच्या अहवालावर उत्तर देण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुंडागर्दीचा मार्ग अनुसरला, अशी प्रतिक्रिया बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केली.
पुरोहित यांनी दाखला दिलेल्या अहवालावर बोलण्याची संधीच मिळाली नाही. गेल्या दोन वर्षांत अपारंपरिक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाली आहे. भाजपच्या नेत्यांना त्यांनी कसे लक्ष्य केले होते, हे जनता विसरलेली नाही, असे विलास मुत्तेमवार म्हणाले.