Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
लोकमानस

तरी मी मतदान करणारच!

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पुढाऱ्यांच्या भाषणातून कळले की, भाजप व मित्रपक्ष सत्तेवर येण्यास लायक नाहीत. त्याचप्रमाणे भाजप व मित्रपक्षांच्या पुढाऱ्यांच्या भाषणातून कळले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हेही राज्य करायला लायक नाहीत. तरीही मी मतदान करणार! असं म्हणतात की, लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांनी, लोकांसाठी चालवलेली व्यवस्था अशी व्याख्या आहे. मात्र प्रत्यक्षात ती लोकप्रतिनिधींची, लोकप्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींसाठी चालवलेली व्यवस्था असावी की, काय असा संशय येतो. उदा. लोकसभेत खासदारांचे भत्ते वाढविण्याविषयीचे विधेयक काही मिनिटांत बिनविरोध पारित होते तर लोकहिताचे विधेयक वर्षांनुवर्षे रेंगाळत पडते. या देशात स्त्रियांची संख्या जवळजवळ निम्मी असली तरी त्यांना ३३ टक्के आरक्षण देण्यास प्रचंड विरोध केला जातो. निवडणुका जवळ आल्या की याच ‘मतदात्यां’ची नेत्यांना आठवण होते! अशी निराशाजनक अवस्था असूनही मी मतदान करणार.
आपल्या महान लोकशाहीत एखादा उमेदवार निवडणुकीत हरला तरी त्याला मागच्या दाराने नियुक्त करून मोठे पद दिले जाते. एखाद्या मुख्यमंत्र्याला घोटाळ्यात अडकल्याने राजीनामा द्यावा लागला असला तरी तो बायकोला मुख्यमंत्री करून राज्य करू शकतो. यात मतदारांचा नुसता अवमानच नाही तर लोकशाहीची क्रूर विटंबना होते. असे असले तरीही मी मतदान करणारच!
आपल्या देशात पुरावा न ठेवता गुन्हा केलेले गुन्हेगार हे निर्दोषच असतात. आपल्या महान लोकशाहीत लोकप्रतिनिधी, भ्रष्टाचारात किंवा गुन्ह्यात सापडला तर राजीनामा देऊन मोकळा होतो. त्याला शिक्षा नाही. यात कधीकाळी सुधारणा होईल, बहुसंख्य मतदारांना चांगलं-वाईट यातला फरक कळेल या आशेवर मी वेळ काढून, मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणारच. कारण मतदानाचा हक्क हा घटनेनं आपल्याला दिलेला पवित्र अधिकार आहे. आपल्या ‘मता’पेक्षाही ‘दाना’ला जास्त महत्त्व आहे. दान केल्यावर त्याचं पुढे काय होतं याचा आपण कधी विचार करतो का?
रत्नाकर महाजन, विलेपार्ले, मुंबई

दानात दान मतदान

लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. जवळजवळ ५० टक्के मतदार मतदान करत नाहीत, असा अनुभव आहे. हल्लीच्या परिस्थितीत केंद्र सरकार मजबूत असणे जरुरीचे आहे. मतदानाच्या दिवशी रजा देऊनसुद्धा मतदार (खासकरून पांढरपेशे) मतदान करत नाहीत. मतदानाचा नुसता ‘हक्क’ असून उपयोग नाही, ‘दानात दान मतदान’ असा नारा दिला पाहिजे. शिवाय प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. मतपत्रिकेची दोन इंचाची परफोरेटेड तळातली पट्टी ‘पोचपावती’ म्हणून मतदाराला द्यावी. त्या पावतीचा उपयोग, पुढील पाच वर्षांकरिता सरकारी सवलत-लाभ मिळवण्याकरिता अतिरिक्त प्राधान्य म्हणून उपयोगी पडेल, असे जाहीर केल्यास मतदार उत्सुकतेने हक्क बजावतील.
श्रीनिवास डोंगरे, दादर, मुंबई

क्रेडिट कार्डचा असाही धोका

एटीएम बूथच्या रखवालदाराने ग्राहकाच्या कार्डची अदलाबदल करून परस्पर पैसे काढल्याची बातमी वाचून केवळ एटीएम कार्ड असुरक्षित आहेत, असा समज कोणी करून घेणे चुकीचे आहे. बँकांनी दिलेली व्हिसा कार्ड किंवा मास्टर कार्ड वापरून खरेदी हा तितका नाविन्याचा विषय राहिलेला नाही. जवळजवळ सर्व बँकांकडून मोफत कार्डविषयी इतका आक्रमक प्रचार केला जातो की क्रेडिट कार्ड बहुतेकांकडे आले आहे. सर्वच मुख्य विक्रेते कार्ड स्वीकारू लागल्याने अनावश्यक खरेदी नकळत होते.
क्रेडिट कार्ड वापरून विमान किंवा रेल्वे प्रवासाचे आरक्षण घरबसल्या कॉम्प्युटरवर करता येत असल्याने वेळ व श्रम वाचतात हे खरे असले तरी क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करताना थोडय़ाशा नजरचुकीने खूप नुकसानही होऊ शकते. दर्शनी भागावर उठावदार सोळा आकडे (कार्ड क्रमांक), कार्डधारकाचे नाव, कार्डाची वैधता संपण्याची तारीख, मागील बाजूवर धारकाची स्वाक्षरी व सी.व्ही.व्ही. क्रमांक असे मास्टर किंवा व्हिसा कार्डचे सर्वसाधारण स्वरूप असते. कॉम्प्युटरवर रेल्वेच्या किंवा विमान कंपनीच्या संकेतस्थळावर प्रवासाचे आरक्षण करताना तेव्हा शेवटच्या टप्प्यात कार्डवरील १६ आकडी क्रमांक प्रथम टाइप करावे लागतात. त्यानंतर लगेच खालच्या चौकटीत सी.व्ही.व्ही. क्रमांकसुद्धा टाइप करणे आवश्यक असते. पुढच्या टप्प्यात आरक्षण तिकीट काही क्षणात दिसू लागून व्यवहार पूर्ण होतो. हे सर्व नंबर आपल्याला कार्ड पाहून किंवा क्रमांक आठवून टाइप करता येत असल्याने यावेळी कार्ड प्रत्यक्ष हातात असण्याची आवश्यकता नसते. नेमक्या याच पायरीवर मोठा धोका संभवतो.
आपण क्रेडिट कार्ड वापरून जेव्हा खरेदी करतो तेव्हा स्वाइप करण्याकरता कार्ड विक्रेत्याकडे ते द्यावे लागते. काही ठिकाणी ते आपल्यासमोरच स्वाइप केले जाते तर काही ठिकाणी तसे करण्याच्या निमित्ताने ते कार्ड काही वेळ आपल्या नजरेआडही होते. आपल्यादेखत स्वाइप करताना उठावदार आकडे दोन-तीन स्लीप्सवर नावांसह छापले जातात. त्यामुळे मागील भागावरील सी.व्ही.व्ही. नंबरची नोंद क्षणात कोणीही करू शकतो. आणि वर सांगितल्याप्रमाणे केवळ हेच आकडे विमान किंवा रेल्वे प्रवास कॉम्प्युटरद्वारे आरक्षण करताना विचारले जातात.! याचाच अर्थ असा की ते क्रमांक माहीत असलेली कोणतीही व्यक्ती रेल्वे किंवा विमान प्रवासाचे आरक्षण परस्पर करू शकते! बँकेचे मोफत कार्ड देण्याच्या निमित्ताने कार्डाची झेरॉक्स काढून आणणारा अनोळखी एजंटही असे करू शकतो. त्यामुळे ज्या व्यक्तीस एखाद्या विशिष्ट कार्डवरचे वरील नंबर ठाऊक होतात ती व्यक्ती कार्डाशिवाय कोणाच्याही खात्यातून ऑनलाइन पैसे भरून प्रवास आरक्षणाचे व्यवहार सहजपणे करू शकते.
डॉ. श्रीकांत परळकर, दादर, मुंबई

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?

आनंद यादव यांना राजीनामा देऊन झुकायला लावल्याचा आनंद सदानंद मोरे व वारकरी संप्रदायाला व्हावा. यादव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले म्हणून त्यांची सुमार (?) कादंबरी चर्चेत तरी आली. वयपरत्वे यादवांनीही या मंडळींशी ‘पंगा’ न घेता सपशेल लोटांगणच घालायचे ठरविले असावे. हे यादवांचे आपल्याच निर्मितीवरचं प्रेम! खरे तर मोरे आणि कंपनीने खुद्द तुकोबांचेच काही आक्षेपार्ह (?) अभंग व थोर कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळविलेले ‘सेज तुका’ हे चोपडे वाचावे. तुकोबाही आपल्या रचनांमागे ठाम उभे ठाकले होते. तशीच वेळ आली तर चित्रे आपल्या साहित्याबाबत ठाम राहतील काय? ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ म्हणजे काय, ते यातूनच कळेल.
सुरेश चांदवणकर, नेव्ही नगर, मुंबई