Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

महाबळेश्वर येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जंगी मंडप उभारला असून बुधवारी जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याल यांनी व्यवस्थेची पाहणी केली.

कर्नाटकाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर छापे
कोल्हापूर, १८ मार्च / विशेष प्रतिनिधी

कर्नाटक शासनाच्या सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या बेळगाव, कोल्हापूर व मुंबई येथील निवासस्थानावर बुधवारी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये त्यांच्या विहीत मालमत्तेपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याची माहिती पुढे आली आहे. कर्नाटक लोकायुक्तांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली.

आचारसंहितेमुळे आता प्रशासनाचा मनमानी कारभार
सांगली, १८ मार्च / गणेश जोशी

पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.. अन् जिल्हा व नागरी प्रशासनाने मनमानी कारभाराला सुरूवात केली. आचारसंहितेच्या नावाखाली नागरी समस्यांची दखल घेण्यासही काही अधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात आहे, तर काही अधिकारी हे ठेकेदार व सर्वसामान्यांकडून थेट हप्त्यासाठी बळजबरी करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे एकूणच जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणेची अवस्था ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी झाली आहे.

‘मौका है, बदल डालो!’
सोलापूर, १८ मार्च/प्रतिनिधी

सोलापूरकरांनी भरभरून प्रेम करूनही गेल्या गेल्या ३५ वर्षांत सुशीलकुमार शिंदे यांनी त्या मोबदल्यात काहीही दिले नाही. त्यांच्या रूपाने कणाहीन नेतृत्व मिळाल्यानेच सोलापूरची वाताहात झाली, अशा कठोर शब्दात प्रहार करीत सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी ‘मौका है, बदल डालो’ असा नारा दिला आणि प्रचाराचे रणशिंग फुंकले. पक्षाने उमेदवारी घोषित केल्यानंतर अ‍ॅड. बनसोडे यांचे मुंबईहून बुधवारी सकाळी मोटारीने शहरात आगमन झाले.

५०-१० चा फॉम्र्युला
सध्या आघाडय़ा-युतींचे दिवस आहेत. त्यामुळेच की काय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच राजकीय पक्षांची एकच धावपळ सुरू आहे. ‘एकला चलो रे’चा नारा देतानाच मित्रपक्षावर दबाव टाकून कडबोळ्याचे राजकारण करण्यास भाग पाडले जात आहे. त्यासाठी २६-२२, २४-२४ अशा फॉम्र्युलांची शर्यत सुरू आहे. दुसरीकडे पक्षांतर्गत फॉम्र्युलेही काही कमी नाहीत.

शरद पवार ३१ मार्चला माढय़ातून अर्ज भरणार
माळशिरस, १८ मार्च / वार्ताहर

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी येत्या ३१ मार्च रोजी सोलापुरात उमेदवारीअर्ज दाखल करण्याचे निश्चित झाले असून त्याच दिवशी सायंकाळी ४ वा. अकलूजला प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. त्या दृष्टीने सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रचारसूत्रांकडून देण्यात आली.

नाल्यावरील अतिक्रमण हटविल्याने वादावादी
सांगली, १८ मार्च / प्रतिनिधी

सांगली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कोल्हापूर रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यावर केलेले अतिक्रमण बुधवारी काढून टाकले. या वेळी भूखंडधारक व महापालिका अधिकाऱ्यांत वादावादीही झाली. तसेच शहरातील दोन खोकीही या पथकाने जप्त केली. कोल्हापूर रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यावर गुंठेवारी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत माजी नगरसेवक आनंद परांजपे यांनी आयुक्त दत्तात्रय मेतके यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. अखेर बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे नगर अभियंता एस. डी. कमलेकर, शाखा अभियंता परमेश्वर हलकुडे व उपअभियंता साजणे यांच्या पथकाने हा भराव तात्काळ काढून घेण्याची सूचना केली. त्यासाठी भूखंडधारकाला एक तासाचा अवधीही देण्यात आला.

किरकोळ कारणावरून युवकाचा खून
कराड, १८ मार्च / वार्ताहर

क्रिकेट ग्राऊंड उकरण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत कोळेवाडी (ता. कराड) येथील प्रभाकर भाऊसाहेब साळुंखे (वय २८) या युवकाचा तलवारीने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कराड ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की कोळेवाडी येथील स्मशानभूमीलगतचे क्रिकेट ग्राऊंड याच गावातील चंद्रहार राजाराम काळे याने तीन दिवसांपूर्वी जेसीबीने उकरले. ग्राऊंड उकरल्याने वैतागलेल्या प्रभाकर साळुंखे याने तीन मित्रांसह याचा जाब विचारला. त्यानंतर ढेबेवाडी फाटा येथे चंद्रहार व प्रभाकर यांच्यात भांडण झाले. या भांडणाचा राग चंद्रहारच्या मनात होता. यावर चंद्रहार काळे, त्याचा भाऊ संतोष व आई शारदा यांनी संगनमताने तलवार, धारदार सुरा व दगडाच्या साहाय्याने प्रभाकर साळंखे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यात प्रभाकरच्या छातीवर, पोटावर चंद्रहार व संतोषने तलवार व सुऱ्याने वार केले. तर शारदा काळेने हाताने मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रभाकर साळुंखे यास उपचारास दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी प्रभाकर साळुंखे याचा मित्र अमोल वसंतराव भोसले याने कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय घोगरे हे करीत आहेत.

खंडणी उकळल्याप्रकरणी बाबा मोरेस पोलीस कोठडी
कराड, १८ मार्च/वार्ताहर

महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी बाबा मोरे यास खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दि. २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कराडमधील व्यापारी बाबू पटेल यांच्याकडून ४५ हजार रुपयांची खंडणी उकळण्याप्रकरणी सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या, सागर परमार, हमीद शेख व बाबा मोरे याच्यासह अन्य दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसेंबर २००८ मध्ये पटेल यांना उंब्रज येथे नेऊन खंडणी उकळण्यात आली होती. संगनमत करून सल्या चेप्या, सागर परमार, हमीद शेख, बाबा मोरे यांनी आर्थिक लाभासाठी दहशत माजवण्याप्रकरणी त्यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये पैलवान संजय पाटील यांचे हत्याप्रकरण, खंडणीप्रकरण व उंडाळे येथील गोळीबार प्रकरण यांचा समावेश आहे.

वारकरी सांप्रदायाचा हट्ट केवळ दुर्दैवी- कांबळे
कागल, १८ मार्च / वार्ताहर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.आनंद यादव यांनी ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी मागे घेऊन वारकरी सांप्रदायाची माफी मागितली असतानाही त्यांच्या राजीनाम्याचा वारकरी सांप्रदायाने केलेला हट्ट दुर्दैवी असल्याचे मत नगराध्यक्ष अजित कांबळे यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत वारकरी सांप्रदायाने हट्टाग्रही भूमिका सोडावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. डॉ. यादव यांनी वादग्रस्त कादंबरी मागे घेतली आहे. एवढेच नव्हे तर देहू येथे जाऊन संत तुकाराम यांच्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली आहे. यादव यांनी दिलेला साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा ही मराठी साहित्याच्या दृष्टीने खेदजनक घटना असल्याची प्रतिक्रिया या बैठकीत अनेकांनी व्यक्त केली. उपनगराध्यक्ष सुनिल माळी तसेच संजय चितारे, नवल बोते, प्रकाश मुजूमदार, प्रकाश नाळे, सुधाकर सोनुले आदी या बैठकीला उपस्थित होते.

सोलापुरात १९२ शिक्षणसेवक सहशिक्षकपदी नेमण्याचा आदेश
सोलापूर, १८ मार्च/प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने डिसेंबर व जानेवारीमध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या १९२ शिक्षणसेवकांना सहशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश काढल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षणसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या सर्वज्ञ पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागास याबाबतचे आदेश पाठविण्यात आले आहेत. यासंदर्भात शिक्षणसेवक संघटनेने सतत पाठपुरावा केला होता. तसेच या प्रश्नावर आंदोलनेही केली होती. या आदेशानुसार सहशिक्षक नियुक्तीचे आदेश देताना त्यांच्या फरकाची रक्कमही त्वरित द्यावी, अशी मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाने जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. या शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात देशमुख यांच्यासह अभिजित ननवरे, प्रमोद कुसेकर, प्रशांत मोरे, दिगंबर तोडकरी, विजयसिंह कोहाळे, काशिनाथ विजापुरे आदींचा समावेश होता.

वारणा कारखाना निवडणुकीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा
पेठवडगाव, १८ मार्च / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीची तसेच वारणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आचारसंहिता असताना जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व वैयक्तिक बदनामी करणारा मजकूर एका साप्ताहिकाव्दारे प्रसिध्द करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील शरद बाबूराव पाटील याच्यावर कोडोली पोलिसांनी भा.द.वि. लोकप्रतिनिधी कायदा १२५, १२३(३), १७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राचे अपारंपरिक ऊर्जा व फलोत्पादन मंत्री विनय कोरे यांची जनमानसातील प्रतिमा मलीन व्हावी आणि स्वतची लोकप्रियता वाढावी या उद्देशातून प्राजक्त या साप्ताहिकामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याप्रकरणी शिवाजीराव उर्फ बाळासाहेब जाधव (बहिरेवाडी) यांनी तक्रार दिली असून कोडोली पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक शहाजी शिंदे अधिक तपास करीत आहेत.

इचलकरंजीतील पाण्याची तपासणी
इचलकरंजी, १८ मार्च / वार्ताहर

नगराध्यक्षांच्या प्रभागात जळू असणाऱ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त प्रसिध्द होताच पालिकेच्या पाणी पुरवठा खात्याने तातडीने या कामात लक्ष घातले आहे. नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या प्रभागामध्ये चार दिवस झालेल्या पाणी पुरवठय़ापासून जळू व अळ्य़ा आढळून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाणी पुरवठा सभापती तानाजी पोवार यांनी खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले. पथकाने नळ जोडणीची तपासणी, खराब जोडणी दुरूस्त करणे, गटारी जवळून गेलेल्या जोडणी बाजूने वळविणे आदी कामांना तातडीने सुरूवात केली आहे. शिवाय नागरिकांकडून तक्रारीचे स्वरूप समजावून घेण्याबरोबरच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, असे तानाजी पोवार यांनी सांगितले.