Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

न्यूझीलंडच्या जेम्स फ्रँकलीनला भोपळाही फोडू न देता इशांत शर्माने महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केल्यावर टीम इंडियाने असा आनंद साजरा केला. न्यूझीलंडने बुधवारी पहिल्या दिवसाच्या खेळात ६ बाद ६० अशा पडझडीनंतर २७९ धावा उभारल्या त्या डॅनियल व्हेटोरी आणि जेसी रायडर यांच्या शतकांच्या बळावर. यानंतर भारताने उर्वरित खेळात बिनबाद २९ अशी मजल मारली.

साहित्य संमेलनाध्यक्षपद
पाडगावकर यांचा नकार तर सारडा सरसावले

मुंबई, १८ मार्च / प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या राजीननाम्यामुळे नव्या अध्यक्षपदासाठी जी काही नावे चर्चेत आहेत, त्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आणि समीक्षक शंकर सारडा यांचा समावेश आहे. मात्र प्रकृतीअस्वाथ्यामुळे संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्यास पाडगावकर यांनी नकार दिला आहे तर सारडा मात्र इच्छुक आहेत. ८२ व्या महाबळेश्वर संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सारडा हे यादव यांचे प्रतिस्पर्धी होते. मात्र ते पराभूत झाले. निवडणुकीत दोनच उमेदवार रिंगणात होते. त्यातील एकाने राजीनामा दिला असल्याने माझ्या नावाचा विचार करण्यास हरकत नाही.

साहित्य संमेलनाला वादाचीच परंपरा
सुनील माळी, पुणे, १८ मार्च

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध विषयांवरून वाद होण्याचे अनेक प्रसंग गेल्या ८१ संमेलनांमध्ये घडले असून या वादांमुळेही संमेलनांमध्ये रंगत आल्याचे दिसून येते. डॉ. आनंद यादव यांच्या लेखनावरून यंदा वाद झाला आणि तो संमेलनाआधीच मिटल्याचे आतातरी वाटते आहे, मात्र आतापर्यंतच्या संमेलनांमध्ये अनेक विषयांवर वाद झाले आहेत. या संमेलनांपैकी किमान साठ संमेलनांना उपस्थित राहून साक्षेपाने त्यांची निरीक्षणे नोंदवलेल्या ८६ वर्षांच्या म. श्री. दीक्षित यांच्या या संमेलनांबाबतच्या आठवणी अगदी ताज्या आहेत.

एनडीए निमंत्रक जॉर्ज फर्नाडिस यांचेच तिकीट नितीश यांनी कापले
समर खडस, मुंबई, १८ मार्च

एनडीएच्या निर्मितीपासून त्याचे निमंत्रक असलेले साथी जॉर्ज फर्नाडिस यांचे मुजफ्फरपूर मतदारसंघातून तिकीट कापून ते राष्ट्रीय जनता दलातून फूटून काँग्रेसचे दरवाजे ठोठावून जनता दल (यु)मध्ये डेरेदाखल झालेल्या कॅप्टन जयकुमार निषाद यांना देण्याचे नक्की झाले आहे. याबाबत पक्षाचे नेते शिवानंद तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसत्ताला सांगितले की, अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जॉर्जसाहेबांचे वय आणि प्रकृती पाहता त्यांच्यावर आता अधिक जबाबदारी देणे योग्य होणार नाही, या प्रांजळ मतापोटीच नितीशकुमार यांनी त्यांना निवडणुकीला उभे राहू नये, असे सुचविले आहे.

वरुण गांधी यांची उमेदवारी रद्द करा; भाजपवर मित्रपक्षांचा दबाब
नवी दिल्ली, १८ मार्च/खास प्रतिनिधी
पिलीभीत लोकसभा मतदारसंघात धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आज भाजप उमेदवार वरुण गांधी यांनी फेटाळून लावला. आपली प्रतिमा मलिन करण्याचे राजकीय षडयंत्र रचण्यात आले असून आपल्या भाषणाची चित्रफित बनावट असल्याचा दावा वरुणनी केला आहे. यापुढे वरुण गांधी उपस्थित राहतील त्या सर्व सभा व समारंभांचे व्हिडिओ चित्रांकन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून त्यांच्यासोबत एक अधिकारी पूर्णवेळ तैनात करण्यात येणार आहे.

तोलामोलाचा उमेदवार शोधण्याचे महामंडळापुढे आव्हान
पुणे, १८ मार्च/विशेष प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही तासांवर आले असताना साहित्य महामंडळ संमेलनाच्या अध्यक्षांचा शोध घेऊ लागले असून यंदाच्या अध्यक्षपदाबाबत निर्माण झालेला वाद मिटविण्यात त्यांनी अनाकलनीय उशीर केल्याचेच स्पष्ट झाले आहे. अगदी नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा दिल्यावरही तब्बल दोन दिवसांनी महामंडळाची बैठक घेण्यामागील कारणही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, पराभूत उमेदवार शंकर सारडा यांनी अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली असली तरी अध्यक्षपदासाठी तोलामोलाचा उमेदवार शोधण्याचे आव्हान महामंडळापुढे उभे आहे.

वस्त्रोद्योगमंत्री अनीस अहमद यांच्याविरुद्ध गुन्हा
नागपूर, १८ मार्च/ प्रतिनिधी

पोलीस शिपायांना मारहाण करणाऱ्या समर्थकांवर कारवाई न करण्यासाठी तहसील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दूरध्वनीवरून शिविगाळ व धमकी दिल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अनीस अहमद यांच्या विरोधात आज तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अहमद यांच्या विरोधात भादंविच्या २९४, ३४ आणि ५०६ (ब) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. मोतीबाग पुलाजवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या कोराडी पोलिसांना धक्काबुक्की करणे व त्यांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या शेख अल्लाउद्दीन, अमानुल्ला अन्सारी, जमील अन्सारी, मोहम्मद समीरुल्ला, मोहम्मद सुलेमान मोहम्मद इस्माइल व जुम्मनलाल मोहम्मद ठेकेदार यांच्यासह इतर ८-१० जणांना तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

‘आयआयटीयन्स’ आता उभारताहेत लोकशाहीचा लढा!
आशिष पेंडसे, पुणे, १८ मार्च

प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर पायाभूत साधन-सुविधांची उभारणी करणाऱ्या ‘आयआयटीयन्स’ने भारत पुनर्निमाण दलाद्वारे लोकशाहीचा लढा पुकारला आहे. देशभरातील सुमारे ५० मतदारसंघांसह महाराष्ट्रामधील नागपूर व चंद्रपूरसाठी उमेदवारनिश्चिती झाली आहे. मुंबई-पुणे, नाशिकसारख्या सुशिक्षित मतदारसंघांसाठीही योग्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजेच ‘आयआयटी’मधून उच्चशिक्षण घेतलेल्या तंत्रज्ञांनी एकत्र येऊन सुमारे अडीच वर्षांपूर्वी भारत पुनर्निमाण दल ही संघटना स्थापन केली. उच्चशिक्षितांनी उभारलेल्या या राजकीय चळवळीविषयी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रवी ब्रrो यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘भ्रष्टाचार-गुंडगिरीने बरबटलेल्या आणि विकासात्मक भूमिकेपासून दूर चाललेल्या सध्याच्या राजकारणाबाबत सुशिक्षित, पांढरपेशाच नव्हे, तर ग्रामीण नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे. केवळ कोणताही सक्षम पर्याय नसल्याने ते प्रचलित राजकीय व्यवस्थेच्या दावणीला बांधले जात आहेत. म्हणूनच उच्चशिक्षितांनी केवळ राजकारणाच्या घसरत्या दर्जाबाबत दूषणे देण्यापेक्षा त्यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान स्वीकारावे, या भूमिकेतून या दलाची स्थापना करण्यात आली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा घोळ सुटेना
नवी दिल्ली, १८ मार्च/खास प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाच्या घोळ आजही कायम राहिला. जागावाटपाचा समझोता पूर्ण झाला असल्याचा दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असून येत्या एक-दोन दिवसात या समझोत्याची घोषणा होण्याची शक्यता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. आज रात्री मुंबईहून दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी, संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्यासोबत आज रात्री १०, जनपथ येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीला सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेलही उपस्थित होते. राष्ट्रवादीशी करावयाच्या जागावाटपाच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीशी दोन-तीन मुद्यांवर चर्चा अपूर्ण राहिली असून त्यावर प्रफुल्ल पटेल यांच्याशी काँग्रेसचे नेते बोलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उभय पक्षांदरम्यान २६-२२ असा समझोता झाल्याची चर्चा आज दिवसभर सुरु होती. पण त्यावर चव्हाण यांनी कोणतेही भाष्य केले नाही. विधिमंडळ अधिवेशनामुळे चर्चा लांबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जागावाटपाची घोषणा कधी होईल, हेही सांगण्याचे त्यांनी टाळले. दरम्यान, एक-दोन दिवसात जागावाटपावर समाधानकारक तोडगा निघेल आणि तशी घोषणाही होईल, अशी आशा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकांच्या प्रक्रियेला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, १८ मार्च/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याच्या औपचारिकतेला आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. येत्या १६ एप्रिलपासून १३ मेदरम्यान पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी २३ व २८ मार्च तसेच २, ७ आणि १७ एप्रिल रोजी औपचारिकपणे अधिसूचना जारी करण्यात येतील, असे चिदंबरम यांनी सांगितले. १६, २३ व ३० एप्रिल तसेच ७ व १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओरिसामध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रपतींकडून अधिसूचना काढण्याची औपचारिकता पूर्ण करावी लागते.

 


प्रत्येक शुक्रवारी