Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

नांदेड शहराचे सांडपाणी गोदावरीच्या पात्रात सोडले जात असल्याने किनाऱ्यावर नव्याने सुशोभित केलेल्या घाटावरील पाण्यात शेवाळे साचल्याने सर्वत्र दरुगधी पसरत आहे.

जागल
काही काही झाडं माणसागत कायमची लक्षात राहातात. तसंच गुराढोरांचंही असतं. कुत्री-मांजरंही लळा लावून जातात. काही घटना, काही प्रसंग त्या त्या निमित्ताने मनात कायमचे घर करून बसतात. काही झाडं बांधावरची असतात. काही आपसूक उगवलेली असतात. फिरस्ती कुत्र्याचं पिल्लू आसऱ्याला म्हणून यावं अन् कायमचं घरा-रानाचंच व्हावं, हा अनुभव गावापेक्षा रानात जागलीवर राहाणाऱ्यांना अधिक येतो. रानात एकटय़ाला सोबत करणाऱ्यात या झाडा-झुडपांचा अन् गुराढोरांचा, कुत्र्या-वासरांचा फार मोठा आधार वाटत असतो. त्यांच्या अस्तित्वाची ‘सोबत’ फार धीराची, आपलेपणाची वाटत असते. ही ओळखीची झाडं, रात्री अंधारात गूढ-गंभीर पण आपली वाटतात.

राकेश धावडेच्या नार्को चाचणीला स्थगिती
नांदेड-जालना बॉम्बस्फोट

औरंगाबाद, १८ मार्च/खास प्रतिनिधी

नांदेड, जालना बॉम्बस्फोटातील सहआरोपी आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राकेश धावडेच्या नार्को चाचणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. व्ही. दाभोळकर व न्या. श्रीहरी डावरे यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. राकेश धावडेच्या नार्को चाचणीला जालना आणि नांदेड न्यायालयाने हिरवा कंदील दिला होता.

उस्मानाबादचा तिढा सुटला; डॉ. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार
उस्मानाबाद, १८ मार्च/वार्ताहर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारा तिढा आज सुटला. डॉ. पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी मिळाल्याचे वृत्त शहरात कळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. तथापि उमेदवारीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नावाची चर्चा होती. त्यांचे समर्थक बस्वराज पाटील तर चाकूरकर यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचा दावा करत होते.

बीड जिल्हा शिक्षण क्षेत्रात राज्यातील पहिल्या दहामध्ये
बीड, १८ मार्च/वार्ताहर

अंगणवाडी ते पाचवीपर्यंतची मुले पैशांचा हिशेब करण्यात तरबेज असून सोपा परिच्छेद वाचनात मात्र मागे आहेत. तर पहिली ते दुसरीची मुले अक्षर व शब्द ओळखीमध्ये आठव्या क्रमांकावर असले तरी जिल्हा शिक्षणात राज्यात पहिल्या दहामध्ये असल्याचे ‘प्रथम’ संस्थेच्या तपासणीत आढळून आले आहे. बीड जिल्हा अविकसित व दळणवळणाच्या अपुऱ्या साधनामुळे नेहमीच शिक्षण व इतर क्षेत्रात मागे असल्याचे दिसून येते.

एटीएसच्या छाप्यात ७५ हजारांचे चरस जप्त
औरंगाबाद, १८ मार्च/प्रतिनिधी

औरंगाबाद शहरात आता चौका-चौकांत गांजाप्रमाणेच चरसही उपलब्ध होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतरही पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शेवटी दहशतवाद विरोधी पथकानेच (एटीएस) याप्रकरणी लक्ष घातले. आज दुपारी हडको कॉर्नर येथील एका हॉटेलावर छापा घालून चरस विकण्याच्या तयारीत असलेल्या चारजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७५० ग्रॅम चरस जप्त करण्यात आली आहे. याची किमत ७५ हजार रुपयांच्या आसपास आहे. नरेश गोविंद राखेवार (२९, रा. रविनगर, हडको), सुनील उर्फ गिरीश अरुण चापलवार (२६, एन-९), तुषार श्यामलाल पाटील (२९, एन-९) आणि राजकमल धर्मेंद्र पांडे (२४, मूळ राहणार उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम भिवंडी, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक एटीएसचे प्रमुख पोलीस निरीक्षक राजकुमार सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हडको कॉर्नर भागात चरस विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पथकाने तेथे छापा घातला. उत्तर प्रदेशमधून हे चरस आणण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे.

शिक्षणाधिकाऱ्याकडे खंडणी मागणारा सहशिक्षक नन्नवरे निलंबित
उस्मानाबाद, १८ मार्च/वार्ताहर

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील एका सहशिक्षकास संस्थेने निलंबित केले. मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नावे शिक्षणाधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाने ही कारवाई केली आहे. उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी शिवदास नलावडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सहशिक्षक पी. एस. नन्नवरे याच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हाही नोंदविला होता. उस्मानाबादेतील भीमनगरात संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आहे. संस्थेने पी. एम. नन्नवरे यांना सहशिक्षकाची जबाबदारी सोपविली होती. दरम्यानच्या काळात सोलापूर येथील मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. मात्र पी. एस. नन्नवरे यांनी एका शिक्षक मित्राच्या नियुक्तीसाठी शिक्षणाधिकारी शिवदास नलावडे यांना जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यालयातच शिविगाळ करून मारहाण केली. तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदविण्याची धमकी देऊन १३ जानेवारी २००९ रोजी खंडणी मागितली होती.

मनोज आळसपुरे खून खटल्याचा आज अंतिम युक्तिवाद
वसमत, १८ मार्च/वार्ताहर

येथील आळसपुरे खून खटल्याचा अंतिम युक्तिवाद उद्या गुरुवारी (१९ मार्च) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. धोडखांडे यांच्यासमोर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्य़ाचे लक्ष या खून खटल्याकडे लागले आहे. मनोज आळसपुरे यास येथील श्रीमंत व प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या १५ आरोपींनी मनोज टन्न्ो यांच्या घरी बोलावून १५ मार्च २००२ रोजी जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर मनोज आळसपुरे याचा नांदेडला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या वेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन एक दिवस वसमत बंद होते. गर्भश्रीमंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवायचा नाही असा निर्णय त्याच्या घरच्यांनी घेतला. पोलिसांच्या आश्वासनानंतर मनोजवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तब्बल सात वर्षांनंतर या खटल्याचा अंतिम युक्तिवाद गुरुवारी (१९ मार्च) येथील जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. या खटल्यात शहरातील प्रतिष्ठित व श्रीमंत आरोपी आहे. त्यामध्ये मनोज टन्न्ो, माजी नगराध्यक्ष वसंत चेपूरवार, व्यापारी महासंघाचे सचिव राजेंद्र लालपोतू, नितीन लालपोतू, नगराध्यक्षांचे भाऊ गणेश काळे, डॉ. किशोर गुंडेवार, दीपक कार्ले, अनिकेत कार्ले, बालाजी काळे, दीपक कुल्थे, राजेश कुरडे, बाळकृष्ण जाधव, उदय राखोंडे, पारस वैजवाडे, रवि ऊर्फ विश्वनाथ फुलारी यांचा समावेश आहे.

लाचखोर लिपिकास चार वर्षे सश्रम कारावास
उस्मानाबाद, १८ मार्च/वार्ताहर

नुकसानभरपाईचा धनादेश देण्यासाठी दीड हजाराची लाच घेणाऱ्या कळंब तहसील कार्यालयातील लिपिकास उस्मानाबादच्या न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त विशेष न्यायाधीश पी. आर. भरड यांनी हा निर्णय दिला. विजय यादव या शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना बाबू रणदिवे या लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. हासेगाव (ता. कळंब) येथील यादव यांच्या शेतवस्तीत २४ फेब्रुवारी २००६ मध्ये आग लागली होती. या आगीत गोठय़ातील शेळ्या मृत्युमुखी पडल्या होत्या. शासनाने त्या संदर्भात नुकसानभरपाई मंजूर केली होती. मात्र नुकसानभरपाईचा धनादेश देण्यासाठी कळंब तहसील कार्यालयातील लिपिक बाबू रणदिवेने दीड हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही लाचेची रक्कम स्वीकारताना लिपिकास रंगेहात कार्यालयातच पकडले.

दौलताबाद किल्ला परिसरात आग
औरंगाबाद, १८ मार्च/प्रतिनिधी

ऐतिहासिक दौलताबाद किल्ला परिसरात आज (बुधवारी) रात्री भीषण आग लागली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आगीचे लोट दिसत होते. आगीचे कारण समजले नाही. दौलताबाद किल्ल्यावर जाऊन आग विझविणे शक्य नसल्याने अग्निशामक दलाचे पथक तिकडे गेले नाही. विशेष म्हणजे त्यांना कळविण्यातही आले नव्हते. भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. आग नेमकी केव्हा लागली हे कोणालाही माहिती नाही. अंधार पडल्यानंतर आगीचे लोट दिसू लागले. स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांनी याची माहिती पोलिसांना दिली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चौकीत पोलीस नव्हते. त्यामुळे छावणी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. आग किल्ल्यावर लागलेली आहे. तेथे अग्निशामक दलाची वाहने आणि अन्य साधने पोहोचणे शक्य नाही. शिवाय अधिकृतपणे आम्हाला कळविण्यात आलेले नाही. ही आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टर्सचाच वापर करता येतो, आमचा उपयोग नाही, असे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले.

संतांसारखा पेहराव केल्याने संत होत नाही - गुरुबाबा महाराज
लातूर, १८ मार्च/वार्ताहर

संतांसारखा पेहराव केल्याने कोणी संत होऊ शकत नाही, खरा संत कोण हे ओळखायचे असेल तर संतच व्हावे लागेल, असे प्रतिपादन सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले. श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात सुरू असलेल्या २१२ व्या श्री नाथषष्ठी महोत्सवात आयोजित किर्तनात ते बोलत होते. गुरुबाबा औसेकर म्हणाले, काहीजण संतांचा पेहराव करतात. लोकांनी आपल्याला संत म्हणावे आणि पायावर मस्तक ठेवावे अशी त्यांची अपेक्षा असते. संत आपल्याजवळच असतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही किंवा सान्निध्यात असूनही जवळ जाऊ शकत नाही. जे समाजासाठी चांगले काम करतात त्यांनाच मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. मागे ओढले म्हणून चांगले कार्य करणे सोडून देऊ नका. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली, आदींचा दुर्जनांनी खूप छळ केला. पण ते आपल्या विचाराला चिकटून राहिले म्हणून ते महान संत होऊ शकले. माणसाच्या शरीरात नऊ सद्गुण आहेत परंतु त्यांच्यात असलेला एक दुर्गुण चांगल्या सद्गुणांवर मात करतो. संतमहात्म्यातही दोष असतात, पण ते या दोषांना परमात्म्याकडे वळवतात. त्यामुळे त्यांच्यातील दोष संपतात.

लीलादेवी अग्रवाल ट्रस्टचा शनिवारी पुरस्कार वितरण समारंभ
सिल्लोड, १८ मार्च/वार्ताहर

सौ. लीलादेवी सीताराम अग्रवाल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा राज्य पातळीवरील उत्कृष्ट वाचनालय पुरस्कार, ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार आणि हुशार होतकरूंसाठी तालुकास्तरावर अभ्यासवृत्ती (शिष्यवृत्ती) वितरणाचा कार्यक्रम शनिवारी (२१ मार्च) होणार आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम साहित्यिक प्राचार्य प्रकाशसिंह गौर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक पंडित हे राहणार आहेत. सौ. लीलादेवी सीताराम अग्रवाल वाचनालय शिक्षक कॉलनी येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मार्च महिन्यातच आचारसंहिता लागल्याने सरकारी अधिकारी, नेत्यांचा हिरमोड
बीड, १८ मार्च/वार्ताहर

आर्थिक वर्षांच्या महिन्याअखेर शिल्लक राहिलेला निधी खर्च करण्याचे आणि अर्धवट योजना पूर्ण करण्याची घाई सर्वच शासकीय कार्यालयात असते. मार्च महिना म्हणजे सरकारी कामकाजाची वार्षिक लगीनघाईच मानली जाते. मात्र या वर्षी महिन्याच्या सुरुवातीलाच सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने सरकारी कार्यालयांमध्ये पूर्णपणे शांतता आहे. बीड जिल्ह्य़ात लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. या पाश्र्वभूमीवर २ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदार आकर्षित होईल. अशा प्रकारचे कोणतेही काम व धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत असा नियम आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर झाल्याच्या क्षणापासून बहुतांशी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. कोणते काम आचारसंहितेत बसते आणि कोणते बसत नाही यावर खल केला जातो तर कधी थांबा दोन महिने असा सल्ला दिला जातो. आर्थिक वर्षांचा मार्च हा अखेरचा महिना. विविध योजनांखाली केंद्र व राज्य सरकारकडून आलेला निधी या महिन्यात खर्च करावा लागतो अन्यथा निधी परत जातो यामुळे या महिन्याभरात सर्व शासकीय कार्यालयात योजना पूर्ण करण्याची घाई असते. रात्री उशिरापर्यंत अधिकारी, कर्मचारी काम करत असतात. मात्र या वर्षी ऐन मार्च एंड सुरू होताच आचारसंहितेला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचारी, पुढारी, नेते व कार्यकर्ते यांचा हिरमोड झाला आहे.

मातापित्यांना वाऱ्यावर सोडू नका - विठ्ठल महाराज
लातूर, १८ मार्च/वार्ताहर

ज्यांनी जन्म दिला त्या माता-पित्यांना वाऱ्यावर सोडू नका, असे मत विठ्ठलमहाराज यांनी व्यक्त केले. व्यंकटेश बालाजी मंदिरात सुरू असलेल्या २१२ व्या श्री नाथषष्ठी महोत्सवात विठ्ठलमहाराज कीर्तनातून बोलत होते. ते पुढे म्हणाले, माता-पिता जसे तुमचे जन्मदाते आहेत तसेच ते तुमचे गुरू आहेत. गुरूला गुरुदक्षिणेची गरज नसते. देहाला विसरून संतांचे नामस्मरण करत करत समाजासाठी सेवा देतो तोच मानवधर्म होय. प्रपंचाने त्रस्त झालेल्यांना धनाची गरज असते. परंतु सार्वत्रिक ठिकाणी पडलेल्या धनाला जो स्पर्शही करत नाही अशी व्यक्ती संत होय. समाजात शांतता नांदावी, सर्वजण गुण्यागोविंदाने नांदावेत, असे संतांना वाटते म्हणून संतांचे विचार प्रत्येकाने कृतीत आणले तर हा समाज संघर्षमुक्त बनेल आणि आज खरी गरज याचीच आहे, असे ते म्हणाले.

हकीम समितीच्या शिफारसींच्या निषेधार्थ मराठवाडा शिक्षक संघाचा २१ रोजी मोर्चा
लातूर, १८ मार्च/वार्ताहर

हकीम समितीच्या निषेधार्थ मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शनिवार, २१ मार्चला दुपारी २ वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी केंद्रीय निवृत्त सनदी अधिकारी पी.एम.ए. हकीम यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधारणा समिती महाराष्ट्र शासनाने गठीत केली होती. या समितीच्या शिफारशींच्या आधारे राज्य शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना सुधारित वेतनश्रेणीसंबंधी निर्णय जाहीर केले आहे. केंद्र शासनाने शिक्षकांसाठी उच्च वेतनश्रेणी दिलेली आहे. मात्र हकीम समितीने शिक्षकांची कर्मचाऱ्यांतील एकूण संख्या ३० टक्के असल्याचे कारण सांगून महाराष्ट्रातील शिक्षकांना उच्च वेतनश्रेणी नाकारली आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या निर्णयानुसार मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने २१ मार्चला दुपारी दोन वाजता टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

उमरगा तहसिलदाराकडून लाभार्थीना न्याय देण्याची मागणी
उमरगा, १८ मार्च/वार्ताहर

राष्ट्रीय सामाजिक कुटुंब अर्थसाह्य़, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ अनुदान आदी योजनांसाठी दाखल अर्जातील त्रुटींची पूर्तता करूनही प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न तहसीलदारांकडून होत असून लाभार्थीना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध योजनांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून एक वर्ष होत आहे. तहसीलदार डॉ. मोहन नळदकर यांना भेटून माहिती देण्यात आली आहे. तहसीलदारांनी त्रुटींची पूर्तता करण्याचे सूचित केले. त्रुटींची पूर्तता करूनही अर्ज मंजूर केले जात नाहीत. अशी शंभर प्रकरणे प्रलंबित आहेत. त्रुटी नसताना ही २० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

जनता विकास परिषदेचे मे अखेर अधिवेशन
औरंगाबाद, १८ मार्च/प्रतिनिधी

मराठवाडा जनता विकास परिषदेचे औरंगाबाद शहराचे अधिवेशन मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्याचा निर्णय परिषदेच्या बैठकीत झाला. स्वामी रामानंद तीर्थ स्मृती केंद्राच्या सभागृहात राम भोगले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत अ‍ॅड. भगवानराव देशपांडे, प्राचार्य शरद अदवंत, प्रा. दिनकर कोरान्न्ो, व्ही. आर. सराफ, मधुकरराव मुळे आदी उपस्थित होते. या अधिवेशनापूर्वी परिषदेचे किमान ५० नवे सदस्य नोंदविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

समाजसेवा शिबिराचा समारोप
औरंगाबाद, १८ मार्च/प्रतिनिधी

माणूस म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली तर त्यातूनच आपोआप समाजसेवा होते असे उद्गार एम.जी.एम.चे विश्वस्त डॉ. पी. एम. जाधव यांनी काढले. त्यांच्या उपस्थितीत एम.जी.एम. अध्यापक विद्यालयाच्या समाजसेवा शिबिराचा समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. जाधव पुढे म्हणाले, जो माणूस दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यांचा विचार करतो तो महापुरुष ठरतो. त्यांनी महात्मा गांधी आणि संत गाडगे महाराज यांच्या जीवनातील घटनाप्रसंग सांगितले. या कार्यक्रमाला सरस्वती पूजनाने प्रारंभ झाला. प्राचार्या सुवर्णा भोईर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक नितेश राणे २१ रोजी बीड दौऱ्यावर
बीड, १८ मार्च/वार्ताहर

स्वाभिमान या सामाजिक संघटनेचे संस्थापक नितेश राणे हे २१ रोजी प्रथमच बीड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते युवकांची भेट घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील युवा पिढीला संघटीत करून त्यांना योग्य दिशा देऊन राष्ट्रीय प्रवाहात स्वाभिमानाने सक्रिय करण्यासाठी स्वाभिमान या सामाजिक संघटनेची त्यांनी स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील लाखो युवक या सामाजिक संघटनेत सामील होऊन समाज व राष्ट्र उपयोगी कार्यक्रम करत आहेत. युवकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन उबाळे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय भजन स्पर्धेत ज्ञानराज मंडळ प्रथम
औरंगाबाद, १८ मार्च/खास प्रतिनिधी

महाश्री कला व क्रीडा मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये गल्लेबोरगावच्या ज्ञानराज भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. सोलापूरच्या स्वरूप भजनी मंडळ व देवगिरीच्या नाथ भजनी मंडळ यांना दुसरे स्थान विभागून देण्यात आले आहे. येथील तापडिया नाटय़मंदिरात दोन दिवस झालेल्या या स्पर्धेमध्ये एकूण ५२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत योगीराज स्वामी भजनी मंडळ (श्रीमनगाव) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहे. उत्कृष्ट गायक म्हणून संतोष यांची तर मृदंग वादक म्हणून शिवशाहीर भजनी मंडळाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत परीक्षकाचे काम अच्युत कुलकर्णी, गणेश सोनवणे, अन्वर खान आणि शीतल रुद्रवार यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एकनाथ संशोधन मंदिराचे अध्यक्ष अ‍ॅड. गंगाधर महाराज घुगे, अंबादास दानवे, डॉ. संजय पाटील देवळाणकर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी सतीश म्हस्के, मुकुंद गोलटगावकर, संजीव सोनार, विकास रायमाने, श्रीनिवास राव आणि संदीप सोनार आदी उपस्थित होते.

बीड येथे आदिवासी समाजाचा २२ रोजी वधू-वर सूचक मेळावा
लोहा, १८ मार्च/वार्ताहर

बीड येथे आदिवासी महादेव कोळी व तत्सम उपजातीचा राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळावा २२ मार्चला मुक्ता मंगल कार्यालय, बार्शी रोड येथे होणार आहे, अशी माहिती संयोजक रामनाथ कांबळे यांनी दिली. राज्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, सूर्यवंशी कोळी, डोर कोळी या तत्सम उपजातीतील आदिवासी समाजाच्या वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्चला मुक्ता मंगल कार्यालय बार्शी रोड, बीड येथे सकाळी अकरा वाजता या मेळाव्यास आरंभ होणार आहे. तेव्हा आदिवासी समाजातील इच्छुकांनी मोठय़ा संख्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक रामनाथ कांबळे, पांडुरंग भुतपल्ले, सुनील बळवंते, हणमंत यलकटवाड, एस. एन. रेकडगेवाड, वैजनाथ मेघमाळे यांनी केले आहे.

संवेदनशील मतदान केंद्रावर निरीक्षक नियुक्त करणार
बीड, १८ मार्च/वार्ताहर

संवेदनशील मतदान केंद्रावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने अशा केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, निरीक्षक हे केंद्र सरकारचे अधिकारी असणार आहेत, हे विशेष. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या उपाययोजना करते. मात्र या वेळी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्य़ातील प्रशासन कामाला लागले आहे. मागील निवडणुकीतील गैरप्रकार झालेल्या केंद्रांची यादी करून या केंद्रांवर या वेळी प्रत्येकी तीन सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. निरीक्षक मतदानाच्या दिवशी केंद्रावर दिवसभर ठाण मांडून बसणार आहेत, तर बोगस मतदान, इतर गैरप्रकार यावर बारकाईने नजर ठेवतील व आपला अहवाल केंद्रीय निवडणूक आयोग व स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करतील. अशा निरीक्षकांमुळे मतदान केंद्रावरील गैरप्रकार निवडणूक आयोगाला तात्काळ कळतील असे मानले जात आहे, तर निरीक्षक हे केंद्र सरकारचे अधिकारी असणार आहेत.

प्रकाश आंबेडकर यांची आज नांदेडमध्ये सभा
लोहा, १८ मार्च/वार्ताहर

भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांची उद्या (गुरुवारी) नांदेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी लोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारिप - बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष श्याम वाघमारे, युवक अध्यक्ष प्रमोद धुतमल, शहराध्यक्ष इमाम लदाफ यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारिप-बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नांदेड येथे होणारी सभा महत्त्वाची मानली जाते. या सभेसाठी या भागातून मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोहा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकाराला सरपंचाची धमकी
औसा, १८ मार्च/वार्ताहर

विरोधात बातमी दिल्याच्या कारणावरून सरपंचाने पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तालुक्यातील कवठा (केज) गाव तंटामुक्त झाले. या निमित्तानेसरकारने एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यानंतर गावात अनेक ठिकाणी हातभट्टय़ा सुरू झाल्या व राजकीय दुफळीने विकास खुंटला. या हातभट्टी दारू विक्रीस गाव पुढाऱ्यांकडून सहकार्य होत असल्याने भादा येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी किशोर जोशी यांनी याबाबत बातमी छापली. विरोधात बातमी छापण्याच्या कारणावरून सरपंच प्रकाश ढवळे यांनी जोशी यांच्याबरोबर बाचाबाची केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा औसा तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.