Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

साहित्य संमेलनाध्यक्षपद
पाडगावकर यांचा नकार तर सारडा सरसावले
मुंबई, १८ मार्च / प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या राजीननाम्यामुळे

 

नव्या अध्यक्षपदासाठी जी काही नावे चर्चेत आहेत, त्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आणि समीक्षक शंकर सारडा यांचा समावेश आहे. मात्र प्रकृतीअस्वाथ्यामुळे संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्यास पाडगावकर यांनी नकार दिला आहे तर सारडा मात्र इच्छुक आहेत.
८२ व्या महाबळेश्वर संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सारडा हे यादव यांचे प्रतिस्पर्धी होते. मात्र ते पराभूत झाले. निवडणुकीत दोनच उमेदवार रिंगणात होते. त्यातील एकाने राजीनामा दिला असल्याने माझ्या नावाचा विचार करण्यास हरकत नाही. अद्यापपर्यंत महामंडळाकडून मला याविषयी विचारणा करण्यात आलेली नाही, मात्र जर विचारणा केली गेली तर त्याला माझा सकारात्मक प्रतिसाद असेल, असे सारडा यांनी सांगितले.
संमेलनासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने नवीन प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा वेळ नाही. याबाबतचा निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे आणि मी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक उमेदवार असल्याने माझ्या नावाचा विचार व्हावा, असे मला वाटत असल्याचेही सारडा म्हणाले.
दरम्यान मंगेश पाडगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, संध्याकाळपर्यंत तरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही. आणि जरी कोणी संपर्क साधला तरी मला प्रकृतीअस्वास्थ्यामुळे जाणे व प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या विनंतीला माझा विनम्र नकार असेल. मला नागीण झाल्यामुळे मी सध्या घरीच आराम करत आहे. लंडन येथील कार्यक्रम खूप अगोदर ठरल्यामुळे आणि माझ्या न जाण्याने आयोजकांचे नुकसान होऊ नये, म्हणून मी तेथे गेलो होतो, असेही पाडगावकर यांनी स्पष्ट केले.