Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

साहित्य संमेलनाला वादाचीच परंपरा
सुनील माळी, पुणे, १८ मार्च

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध विषयांवरून वाद होण्याचे अनेक प्रसंग गेल्या

 

८१ संमेलनांमध्ये घडले असून या वादांमुळेही संमेलनांमध्ये रंगत आल्याचे दिसून येते.
डॉ. आनंद यादव यांच्या लेखनावरून यंदा वाद झाला आणि तो संमेलनाआधीच मिटल्याचे आतातरी वाटते आहे, मात्र आतापर्यंतच्या संमेलनांमध्ये अनेक विषयांवर वाद झाले आहेत. या संमेलनांपैकी किमान साठ संमेलनांना उपस्थित राहून साक्षेपाने त्यांची निरीक्षणे नोंदवलेल्या ८६ वर्षांच्या म. श्री. दीक्षित यांच्या या संमेलनांबाबतच्या आठवणी अगदी ताज्या आहेत.
‘‘मडगाव गोवा येथे १९६४ मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते कुसुमाग्रज. त्यात गोमंतकाची भाषा कोकणी करावी, अशी मागणी करणारा मोर्चा गोमंतकवासीयांनी काढला होता. त्याची चर्चा संमेलनभर झाली होती,’’ पंचेचाळीस वर्षांपूर्वीची आठवण दीक्षित सांगतात.
देशात लादलेल्या आणीबाणीच्या पाश्र्वभूमीवर १९७५ मध्ये साहित्य संमेलन झाले. त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या रणरागिणी म्हणून शोभणाऱ्या दुर्गा भागवत. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण. चव्हाण व्यासपीठावर असतानाच दुर्गाबाई कडाडल्या होत्या, ‘‘राजकारण्यांनी साहित्याच्या व्यासपीठावर येऊ नये,’’. अर्थात प्रगल्भ विचाराच्या आणि साहित्याची उत्तम जाण असणाऱ्या यशवंतरावांनी ती टीकाही मोठेपणाने स्वीकारली होती. थोडय़ा वादाने सरळ झुंडशाहीकडे वळण्याचा तो काळ नव्हता. तेव्हा वादही निकोपपणे खेळले जात.
पुण्यात १९७७ मध्ये झालेले साहित्य संमेलन अगदी अखेरच्या दिवशी उधळण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ साहित्यिक पु. भा. भावे. भावे यांनी गंगाधर गाडगीळ, प्रभाकर पाध्ये यांच्यासारख्या दिग्गजांविरुद्ध लढत देऊन अध्यक्षपदाची निवडणूकजिंकली होती. त्या निवडीनंतर भावे यांच्यामागून जाणाऱ्या त्यांच्या काही समर्थकांनी महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे याच्या विजयाच्या घोषणा दिल्या होत्या. या कारणांनी अखेरच्या दिवशी दलित संघटनांनी तसेच भावे निवडून आल्याचे सहन न झालेल्या समाजवाद्यांनी संमेलनात गोंधळ घातला. एकेकाळी भावे यांच्या बरोबर असणारे आणि नंतर त्यांच्यापासून दूर गेलेले हिंदूुत्ववादी संपादक ग. वा. बेहेरे हेही या भावेविरोधी प्रयोगात सामील झाले होते.
चंद्रपूरला वामन चोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले तेव्हा दलित समाजाचाच अध्यक्ष झाला पाहिजे, या मागणीसाठी दलित संघटनांनी मोर्चा काढला होता. १९८० मध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नामांतराच्या मागणीसाठी नामांतरवाद्यांनी संमेलनस्थळी मोर्चा आणला होता. विवेकवादी समीक्षक गं. बा. सरदार तेव्हा संमेलनाचे अध्यक्ष होते. ते मोकळेपणाने त्या मोर्चाला सामोरे गेले आणि त्यांचे मत समजावून घेतले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमा प्रश्न यांचे पडसाद १९४६ मध्ये झालेल्या बेळगाव संमेलनापासूनच उमटायला सुरुवात झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा परमोच्च िबदू गाठला गेला होता तो १९५७ मध्ये त्या वर्षी औरंगाबाद येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते अनंत काणेकर. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष देवीसिंह चौहान यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या बाजूने बोलायला सुरुवात केली असता समोर बसलेल्या साहित्य रसिकांनी आरडाओरडा करून त्यांना गप्प बसवले.
‘‘साहित्यिक म्हणजे निव्वळ बैल आहेत,’’ असे खळबळजनक विधान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्या वर्षी म्हणजे १९९९ मध्ये मुंबईत दादरला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कविवर्य वसंत बापट. त्या संमेलनात शिवसेनाप्रमुखांचे ते विधान खळबळ उडवून गेले होते आणि त्यावर चर्चाही झाली होती.
पुण्यात २००२ मध्ये झालेल्या संमेलनात पहिलीपासून इंग्रजी लागू करण्याच्या मुद्यावरून वादंग झाले. तेव्हाचे अध्यक्ष होते राजेंद्र बनहट्टी. सांगली येथे २००८ मध्ये झालेल्या संमेलनात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यांनी ‘‘यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला नव्हता तर तो कुंकू लावलेला तांब्या होता.’’ असे वक्तव्य केल्याने संमेलनात गोंधळ उडाला. तसेच संमेलनाचे मावळते अध्यक्ष अरुण साधू यांनी ‘‘साहित्य संमेलनाचे व्यासपीठ ही राजकीय नेत्यांची मक्तेदारी ठरत असून, त्यामुळे मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार कार्यक्रम झालेले नाहीत,’’ असे सांगितले आणि ते राष्ट्रपती उपस्थित असतानाही संमेलनातून निघून गेले. मावळत्या अध्यक्षांनी सूत्रे न देता नवे अध्यक्ष त्यामुळे सत्तारूढ झाले.!