Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

एनडीए निमंत्रक जॉर्ज फर्नाडिस यांचेच तिकीट नितीश यांनी कापले
समर खडस, मुंबई, १८ मार्च

एनडीएच्या निर्मितीपासून त्याचे निमंत्रक असलेले साथी जॉर्ज फर्नाडिस यांचे मुजफ्फरपूर

 

मतदारसंघातून तिकीट कापून ते राष्ट्रीय जनता दलातून फूटून काँग्रेसचे दरवाजे ठोठावून जनता दल (यु)मध्ये डेरेदाखल झालेल्या कॅप्टन जयकुमार निषाद यांना देण्याचे नक्की झाले आहे. याबाबत पक्षाचे नेते शिवानंद तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोकसत्ताला सांगितले की, अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जॉर्जसाहेबांचे वय आणि प्रकृती पाहता त्यांच्यावर आता अधिक जबाबदारी देणे योग्य होणार नाही, या प्रांजळ मतापोटीच नितीशकुमार यांनी त्यांना निवडणुकीला उभे राहू नये, असे सुचविले आहे.
मुंबईतील कामगार चळवळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांनी मुंबईचे तत्कालीन अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना धूळ चारून जायंटकिलर म्हणून लोकसभेत पहिल्यांदा प्रवेश केला होता. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत ते पहिल्यांदा बिहारमधील मुजफ्फरपूर येथून निवडणूक लढले. त्यावेळीही ते तुरुंगात होते. त्यांचे पोस्टर्सवर दंडाबेडी घालून काढलेले छायाचित्र तेव्हा देशभरात प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर १९८४ सालीही जॉर्ज मुजफ्फरपूरहून निवडून आले. त्यानंतर दोन वेळा फर्नाडिस नालंदा मतदारसंघातून निवडून आले होते. पुन्हा गेल्या लोकसभा निवडणुकीत ते मुजफ्फरपूरहून निवडून आले होते. या निवडणुकीतही फर्नाडिस यांना लढण्याची प्रचंड इच्छा होती. स्वतला व त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय जया जेटली ही दोन तिकीटे सोडविण्यासाठी फर्नाडिस यांनी जीवाचा आटापीटा केला होता. मात्र ज्या लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात त्यांनी नितीश कुमार यांचे नेतृत्व उदयास आणले त्या त्यांच्या शिष्यानेच अखेर त्यांचे तिकीट कापले आहे.
फर्नाडिस यांच्या बरोबरच नितीश यांनी फर्नाडिस यांचे पक्षातील कट्टर समर्थक व माजी केंद्रीय विदेश राज्यमंत्री दिग्विजय सिंग यांचेही बांका लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापले आहे. दिग्विजय सिंग सध्या राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांना तिकीट देण्यात येणार नसल्याचे नितीश यांनी पक्षाच्या बैठकीत आज स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. शरद यादव यांनाही संपविण्याची नितीश यांची इच्छा आहे. मात्र एकाचवेळी सगळ्यांना अंगावर घेण्याने नवे त्रास सुरू होऊ शकतात त्यामुळे नितीश यांनी शरद यादव यांना मधेपुरा आणि बदायु या दोन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान जॉर्ज फर्नाडिस यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्याप्रमाणे फर्नाडिस यांचे तिकीट कापले हे आम्हाला मान्य नाही. फर्नाडिस यांना जर तिकीट मिळाले नाही तर पक्षात उभी फूट पडेल व फर्नाडिस अपक्ष लढले तरी मुजफ्फरपूर मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून येतील.