Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वस्त्रोद्योगमंत्री अनीस अहमद यांच्याविरुद्ध गुन्हा
नागपूर, १८ मार्च/ प्रतिनिधी

पोलीस शिपायांना मारहाण करणाऱ्या समर्थकांवर कारवाई न करण्यासाठी तहसील पोलीस

 

ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दूरध्वनीवरून शिविगाळ व धमकी दिल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अनीस अहमद यांच्या विरोधात आज तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अहमद यांच्या विरोधात भादंविच्या २९४, ३४ आणि ५०६ (ब) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
मोतीबाग पुलाजवळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या कोराडी पोलिसांना धक्काबुक्की करणे व त्यांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या शेख अल्लाउद्दीन, अमानुल्ला अन्सारी, जमील अन्सारी, मोहम्मद समीरुल्ला, मोहम्मद सुलेमान मोहम्मद इस्माइल व जुम्मनलाल मोहम्मद ठेकेदार यांच्यासह इतर ८-१० जणांना तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येऊ नये, यासाठी रविवारी सकाळी ११.५५ वाजता अनीस अहमद यांनी तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.एस. देशमुख यांना दूरध्वनीवरून धमकावले होते व शिविगाळही केली होती. देशमुख यांनी या सर्व बाबींची नोंद स्टेशन डायरीत केली होती व त्याची सूचना आयुक्तांना दिली होती. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू असल्याने गृहखात्यानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत या संपूर्ण घटनाक्रमांचा अहवाल तात्काळ मागवला होता. गृहखात्याच्या आदेशान्वयेच आज दुपारी सव्वा तीन वाजता अहमद यांच्याविरुद्ध तहसील ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हे प्रकरण घडल्याने काँग्रेसच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. अनीस अहमद यांनी यापूर्वी विद्यमान गृह राज्यमंत्री नितीन राऊत यांच्या स्वीय सहाय्यकालाही शिविगाळ केल्याचे प्रकरण गाजले होते.