Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वरुणवर यापुढे निवडणूक आयोगाची नजर; भाषणावर भाजपची नापसंती
नवी दिल्ली, १८ मार्च/खास प्रतिनिधी

पिलीभीत लोकसभा मतदारसंघात धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

 

आज भाजप उमेदवार वरुण गांधी यांनी फेटाळून लावला. आपली प्रतिमा मलिन करण्याचे राजकीय षडयंत्र रचण्यात आले असून आपल्या भाषणाची चित्रफित बनावट असल्याचा दावा वरुणनी केला आहे. यापुढे वरुण गांधी उपस्थित राहतील त्या सर्व सभा व समारंभांचे व्हिडिओ चित्रांकन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून त्यांच्यासोबत एक अधिकारी पूर्णवेळ तैनात करण्यात येणार आहे.
वरुण गांधी यांच्या बेजबाबदार विधानांनंतर त्यांची पिलीभीत मतदारसंघातील उमेदवारी रद्द करण्यात यावी, या मागणीचे रालोआतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्षांकडून भाजपवर दडपण वाढले आहे. वरुण गांधी यांच्या भाषणातील विधाने अनुचित असून त्यापासून भाजप स्वतला दूर ठेवत असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांना जाहीर करावे लागले. चिथावणीखोर भाषण दिल्याबद्दल वरुण गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी गुन्हा दाखल केला असून नोटीस बजावली आहे. वरुण गांधींना या नोटीसचे २० मार्चपर्यंत उत्तर द्यायचे आहे. याबाबत कोणती कारवाई करायची हे निवडणूक आयोगाला ठरवायचे आहे, असे सांगून प्रसाद यांनी वरुणवर अनुशासनात्मक कारवाई करण्याचा विचार नसल्याचे सांगितले. आयोगाने भाजपला नोटीस पाठवली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पण भाषणाच्या व्हिडिओ सीडीमध्ये जे दाखविण्यात आले ते आपले शब्दच नाहीत. तसे आपण बोललेलोच नाही आणि त्या सीडीतील आवाजही आपला नाही, असा दावा वरुण गांधी यांनी आज दिल्लीत एक लेखी निवेदन वाचून दाखविताना केला. भारतीय, हिंदूू आणि गांधी असण्याचा आपल्याला अभिमान आहे, असेही वरुण म्हणाले.
भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांप्रमाणेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही वरुणच्या प्रक्षोभक भाषणामुळे संतप्त झाले आहेत. वरुण दोषी असल्याचे आढळल्यास भाजप त्यांच्यावर कारवाई करेल, अशी विश्वास नितीशकुमार यांनी व्यक्त केला. वरुणच्या भाषणाचा निषेध करताना माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. वरुणवर भाजपने कारवाई केली नाही तर त्यांच्यासोबत भाजपही या द्वेषमूलक भाषणाच्या षडयंत्रात सहभागी आहे, असा अर्थ होईल, असे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाने या भाषणाची दखल घेऊन गुन्हा दाखल केल्यानंतर आपण निर्दोष आहो, असे वरुण गांधींनी म्हणण्याला अर्थच उरत नाही, असेही ते म्हणाले.