Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘आयआयटीयन्स’ आता उभारताहेत लोकशाहीचा लढा!
आशिष पेंडसे, पुणे, १८ मार्च

प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर पायाभूत साधन-सुविधांची उभारणी करणाऱ्या

 

‘आयआयटीयन्स’ने भारत पुनर्निमाण दलाद्वारे लोकशाहीचा लढा पुकारला आहे. देशभरातील सुमारे ५० मतदारसंघांसह महाराष्ट्रामधील नागपूर व चंद्रपूरसाठी उमेदवारनिश्चिती झाली आहे. मुंबई-पुणे, नाशिकसारख्या सुशिक्षित मतदारसंघांसाठीही योग्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजेच ‘आयआयटी’मधून उच्चशिक्षण घेतलेल्या तंत्रज्ञांनी एकत्र येऊन सुमारे अडीच वर्षांपूर्वी भारत पुनर्निमाण दल ही संघटना स्थापन केली. उच्चशिक्षितांनी उभारलेल्या या राजकीय चळवळीविषयी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रवी ब्रrो यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘भ्रष्टाचार-गुंडगिरीने बरबटलेल्या आणि विकासात्मक भूमिकेपासून दूर चाललेल्या सध्याच्या राजकारणाबाबत सुशिक्षित, पांढरपेशाच नव्हे, तर ग्रामीण नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे. केवळ कोणताही सक्षम पर्याय नसल्याने ते प्रचलित राजकीय व्यवस्थेच्या दावणीला बांधले जात आहेत. म्हणूनच उच्चशिक्षितांनी केवळ राजकारणाच्या घसरत्या दर्जाबाबत दूषणे देण्यापेक्षा त्यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान स्वीकारावे, या भूमिकेतून या दलाची स्थापना करण्यात आली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत पुनर्निमाण दलाचे कार्य प्रामुख्याने दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये असले, तरी आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय पाया तयार करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या दलाने दिल्ली व उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या उमेदवाराने चांगला प्रतिसाद मिळवून पहिल्याच प्रयत्नामध्ये दीड ते दोन टक्क्य़ांपर्यंत मतेही मिळविली होती. आता लोकसभेच्या देशभर ५० जागा लढविण्याचे दलाने निश्चित केले आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ४० उमेदवार, महाराष्ट्र-दिल्ली, आंध्र प्रदेश, ओरिसा आदी राज्यांमधून दोन-तीन उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, चंद्रपूरमधील उमेदवारांची निश्चिती करण्यात येत असून लवकरच त्यांची नावे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिकसारख्या उच्चशिक्षित भागांमध्ये उमेदवार उभा करण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या उंबरठय़ापर्यंत येऊन ठेपलेला दहशतवाद, शिक्षणाची दुरवस्था, रोजगारक्षम कौशल्य-प्रशिक्षण सुविधांचा अभाव, पर्यायाने नोकरी-रोजगाराच्या संधींची वानवा अशा कळीच्या मुद्दय़ांच्या आधारे दलातर्फे निवडणुकीदरम्यान प्रचार करण्यात येईल. त्याचप्रमाणे स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह राजकीय व्यवस्थेसाठी दलाकडून आग्रही भूमिका घेण्यात येणार आहे.
‘लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ‘आयआयटीयन्स’चा हा राजकीय लढा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यभर उमेदवार उभे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पिंजून काढण्याचे नियोजन दलातर्फे करण्यात येत आहे,’ असेही ब्रrो यांनी स्पष्ट केले.