Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

तोलामोलाचा उमेदवार शोधण्याचे महामंडळापुढे आव्हान
पुणे, १८ मार्च/विशेष प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही तासांवर आले असताना साहित्य महामंडळ

 

संमेलनाच्या अध्यक्षांचा शोध घेऊ लागले असून यंदाच्या अध्यक्षपदाबाबत निर्माण झालेला वाद मिटविण्यात त्यांनी अनाकलनीय उशीर केल्याचेच स्पष्ट झाले आहे. अगदी नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा दिल्यावरही तब्बल दोन दिवसांनी महामंडळाची बैठक घेण्यामागील कारणही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, पराभूत उमेदवार शंकर सारडा यांनी अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली असली तरी अध्यक्षपदासाठी तोलामोलाचा उमेदवार शोधण्याचे आव्हान महामंडळापुढे उभे आहे.
महाबळेश्वर येथे येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी राजीनामा दिल्याने संमेलन सुरू होण्याच्या आदल्या रात्रीच नव्या अध्यक्षाची निवड करण्याचे अवघड काम मराठी साहित्य महामंडळाला करावे लागणार आहे. त्यासाठी महामंडळाचे सदस्य महाबळेश्वरला येण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. उद्या दुपारपर्यंत बहुतेक सर्व सदस्य महाबळेश्वरला पोहोचतील आणि त्यानंतर बैठक होईल, असे सांगण्यात आले.
यादव यांनी संत तुकाराम यांच्याबाबत ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीतील लेखनाबाबत वाद निर्माण झाला आणि तो पंधरा दिवस चालू होता. त्या काळात महामंडळाने हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी काहीही केले नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. या काळात महामंडळाने वारकरी आणि काही जाणकार साहित्यिक यांना एकत्र आणून हा वाद मिटविणे शक्य होते, परंतु केवळ बघ्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे अखेरीस आता नवा अध्यक्ष शोधण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. तसेच यादव यांनी काल सायंकाळी राजीनामा दिल्यावर महामंडळाची बैठक तातडीने आज रात्रीपर्यंत घेता आली असती, परंतु तीही एक दिवस पुढे ढकलण्यात आली. त्यामागील कारणही समजू शकलेले नाही. एका दिवसात महामंडळाचे सर्व सदस्य महाबळेश्वरला पोहोचू शकत नसल्याचा खुलासा महामंडळाकडून करण्यात येतो आहे. तोही न पटणारा असून बहुसंख्य जण दिवसभरात महाबळेश्वरला येऊ शकतात. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रतिनिधी आज दुपारपर्यंत तेथे पोहोचलेही. तेथे पोहोचू न शकणाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधता आला असता, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया आवश्यक असताना महामंडळाने निर्णय केल्यास तो निर्णयही टीकेस पात्र होईल. त्यामुळे महामंडळ नेमका कोणता निर्णय करते, याकडे सर्व साहित्यविश्वाचे आणि साहित्यप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामंडळासमोर काही साहित्यिकांची नावे असून त्यांच्या नावांबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होईल.

पाडगावकरांचा नकार
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संध्याकाळपर्यंत महामंडळाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. जर कोणी संपर्क साधला तरी मला प्रकृतीअस्वास्थ्यामुळे संमेलनाला जाणे आणि प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या विनंतीला माझा विनम्र नकार असेल, असेही त्यांनी सांगितले.

‘हातकणंगलेकर यांनाच यंदाचेही अध्यक्षपद द्या’
म. द. हातकणंगलेकर हे गेल्या वर्षी निवडून आलेले होते. त्यामुळे यंदाच्या संमेलनात त्यांनी कोणाकडे सूत्रे न देता ते स्वत: अध्यक्षपदी राहणेच योग्य ठरेल. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया न करता अध्यक्ष निवडल्याने होणाऱ्या वादापासून दूरही राहता येईल, असे मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर पानतावणे यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. आपण संमेलनास येणार का, असे विचारले असता त्यांनी योग्य निर्णय झाला तर आपण निश्चितच संमेलनास येऊ, असेही ते म्हणाले.