Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
प्रादेशिक

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलास लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली.

‘हवे तेवढे पोलीस घ्या, वीज-पाणी तोडा आणि येऊरचे सर्व बंगले पाडा’
मुंबई, १८ मार्च/प्रतिनिधी

ठाणे महापालिकेने सरकारकडून हवा तेवढा पोलीसांचा फौजफाटा मागून घ्यावा. प्रसंगी राखीव पोलीस दलाचीही मदत घ्यावी आणि येऊर गावात आदिवासींच्या जमिनींवर बांधलेले सर्व बेकायदा बंगले पाडण्याची हाती घेतलेली कारवाई यापुढेही नेटाने सुरुच ठेवावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.

अनामी रॉय प्रदीर्घ रजेवर जाणार!
मुंबई, १८ मार्च / प्रतिनिधी

केंद्रात सध्या प्रतिनियुक्तीवर योग्य ते पद उपलब्ध नसल्यामुळे तसेच नजीकच्या काळात तसे पोस्िंटग उपलब्ध होण्याची शक्यता नसल्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले राज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय यांना आता प्रदीर्घ काळ रजेवर जावे लागणार आहे. सध्या त्यांनी आपल्या रजेचा अर्ज गृहखात्याला सादर करून त्यास मुदतवाढ मागितली असली तरी केंद्रात आणखी कुठल्या पदावर प्रतिनियुक्तीवर जाता येईल का, याची चाचपणी सुरू असल्याचे त्यांच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले.

सर्वव्यापी असहिष्णू प्रवृत्तींना विरोध करा - प्रज्ञा दया पवार
मुंबई, १८ मार्च / प्रतिनिधी

सर्वव्यापी असहिष्णू प्रवृत्तींना विरोध करणे हे साहित्यिक -कलावंतांचे उत्तरदायित्व आहे. मात्र सध्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात ज्या मूल्यहीन आणि भूमिकाविहीन प्रवृत्ती दिसत आहेत, त्याचाच एक अपरिहार्य परिणाम म्हणजे ८२व्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा आनंद यादव यांनी दिलेला राजीनामा होय, असे परखड मत कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले आहे.
वारकऱ्यांचे तालिबानीकरण ज्या वातावरणात घडते, त्याच वातावरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयांच्याविरुध्दचे हिंसक आंदोलन, श्रीराम सेनेचे पबमधील स्त्रियांवर हल्ला चढवणे आणि एम. एफ. हुसेन यांच्या चित्रकृती नष्ट करणे हे सर्व घडत आहे.

रेल्वेच्या निष्काळजीपणाने अपंग झालेल्या महिलेस १० लाख भरपाई
मुंबई, १८ मार्च/प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी उपनगरी स्टेशनवरील पादचारी पूल अचानक कोसळून १६ वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या व औषधोपचारांवर लाखो रुपये खर्च करूनही उर्वरित आयुष्य ६० टक्के कायमचे अपंगत्व घेऊन जगणे नशिबी आलेल्या विनया विलास सावंत या महिला प्रवाशास रेल्वे प्रशासनाने १० लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. आयोगाचे पीठासीन न्यायिक सदस्य पी. एन. कशाळकर व सदस्या श्रीमती एस. पी. लाळे यांच्या न्यायपीठाने श्रीमती सावंत यांच्या अपिलावर हा निकाल दिला.

शिववडापावला न्याय आणि वृत्तपत्र विक्रेत्यांवर अन्याय!
मुंबई महापालिकेची अजब तऱ्हा

मुंबई, १८ मार्च / प्रतिनिधी

‘शिव वडापाव’ योजनेसाठी पालिका प्रशासनाला वेठीस धरणारे पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वृत्तपत्र विक्रेत्यांना मुंबईत हक्काची जागा मिळावी म्हणून काय करीत आहेत, असा सवाल वृत्तपत्र विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या नागरिकांना वर्तमानपत्रासारखी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांनाही स्टॉलसाठी हक्काच्या अधिकृत जागा मिळायला हव्यात, अशी आग्रहाची मागणी वृत्तपत्र विक्रेता महासंघाने केली आहे.

पश्चिम रेल्वे विस्कळीत
मुंबई, १८ मार्च / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेची उपनगरी वाहतूक आज सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली. गोरेगाव येथे ‘क्रॉसिंग पॉंईट’मध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाड त्यासाठी निमित्त ठरले होते. त्यामुळे सुमारे अर्धा तास धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प राहिल्याने, पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याबद्दल बेहाल रेल्वे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
गोरेगाव येथे धीम्या मार्गावरील १०१ क्रमांकाच्या क्रॉसिंग पॉइंटमध्ये दुपारी १.१५ वाजता हा बिघाड झाला होता. डाऊन धीम्या मार्गाला अप धीम्या मार्गाशी जोडणाऱ्या या पॉइंटमधील हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तब्बल अध्र्या तासाचा अवधी गेला. तोपर्यंत धीम्या मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. मात्र त्याने पश्चिम रेल्वेचे उपनगरी वेळापत्रक पूर्णत: कोलमडले. या प्रकारामुळे संध्याकाळी गर्दीची वेळ सुरू होईपर्यंत पश्चिम रेल्वेच्या लोकल १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. भर दुपारची वेळ आणि लोकलमधील गर्दी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक प्रवाशांनी रेल्वेमार्गातून धडपडत पुढील स्थानक गाठले. काल मंगळवारीसुद्धा जोगेश्वरी येथे एमयूटीपीची एक लोकल बंद पडल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते.