Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

मुंबई उपनगरात गच्चीतील बागेत पामच्या पानावर हे सुकलेले पान(?) बसले होते. पण रसिक नजरेने त्याचे ‘रंग किती वर निळे जांभळे’ बरोबर टिपले. हे आहे पश्चिम घाट परिसरात आढळणारे साउथ इंडियन ब्लू ओक लीफ (शास्त्रीय नाव कलिमा हॉर्सफिल्डी- Kallima horsfieldi) फुलपाखरू. स्मिता भाटवडेकर यांनी टिपून ‘वृत्तान्त’कडे पाठविलेले हे छायाचित्र.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांस,
शिवाजी पार्क येथील पालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावाचे नूतनीकरण सुरुवातीपासूनच वादच्या भोवऱ्यात सापडले आहे. यासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेने हे काम सुरू करण्यासाठी घाई केली असून कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी या कामाचे उद्घाटनही केले आहे. मुळात हा तलाव चांगल्या स्थितीत असल्याने नूतनीकरणाची गरज नाही, असे अनेक सदस्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वीच तलावाची गळती थांबविण्यासाठी तो काही महिने बंद ठेवण्यात आला होता आणि त्यासाठी काही लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

गोरेगावचा ‘स्कायवॉक’ वादाच्या भोवऱ्यात
बंधुराज लोणे

गोरेगाव पश्चिमेला आकार घेत असलेला ‘स्कायवॉक’ वादाच्या
भोवऱ्यात सापडला असून या ‘स्कायवॉक’ची जागा बदलण्यात आल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. परंतु लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच या ‘स्कायवॉक’ची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘एमएमआरडीए’चे म्हणणे आहे. गोरेगाव स्थानक ते एस. व्ही. रोडपर्यंत हा ‘स्कायवॉक’ बांधण्यात येत आहे.

सचिन ट्रॅव्हल्सचा ब्रँड अँबेसेडर अवधूत गुप्ते
व्यापार प्रतिनिधी

आघाडीची पर्यटन कंपनी सचिन ट्रॅव्हल्सने ब्रँड अँबेसेडर म्हणून संगीतकार व ‘सारेगमप’ या गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोतील परिक्षक अवधूत गुप्ते यांची नियुक्ती केली आहे. अशा प्रकारे एखाद्या पर्यटन कंपनीने ब्रँड अँबेसेडर नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ असून सध्या मंदीच्या वातावरणात ही नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सचिन ट्रॅव्हल्सचे कार्यकारी संचालक सचिन जकातदार यांनी याबाबतची घोषणा केल्यावर सांगितले की, ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्त झाल्यावर अवधूत गुप्ते यांची पहिली सहल २० ते २६ मे दरम्यान मॉरिशस येथे आयोजित करण्यात आली आहे.

मराठी दिग्दर्शकाचा आगळावेगळा बहुमान
‘स्लमडॉग’च्या डीव्हीडी पॅकमध्ये राही अनिल बर्वे यांचा ‘मांजा’ पोहोचणार जगभरात

प्रतिनिधी

ऑस्करविजेत्या ‘स्लमडॉग मिलिऑनअर’चे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी राही अनिल बर्वे यांचा ‘मांजा’ हा मराठी लघुपट पाहिला आणि तो त्यांना इतका आवडला की त्यांनी आता ‘स्लमडॉग..’च्या ब्लू रे डीव्हीडीसोबत ‘मांजा’ची डीव्हीडीसुद्धा देण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारे आगळावेगळा बहुमान प्रथमच मराठी दिग्दर्शकाला मिळणार असून त्यायोगे ‘मांजा’ हा लघुपट जगभरातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. हा ब्ल्यू रे डीव्हीडी ३१ मार्च रोजी जगभरात सर्वत्र प्रदर्शित केली जाणार आहे. यासंदर्भात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ४१ मिनिटांचा ‘मांजा’ हा आपला पहिलाच लघुपट असून केवळ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण हा त्याचा विषय नाही.

ऑनलाईन लर्निग लायसन्स : बदलाची नांदी
गेल्या वर्षीची गोष्ट. माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा. बारावीची परीक्षा संपताच लर्निग लायसन्स काढण्यासाठी ताडदेव आरटीओ कार्यालयात गेला. तेथे एका एजंटला गाठले. त्याला पाचशे रुपये देऊन दोन लर्निग लायसन्स (टू आणि फोर व्हिलर) काढली. साठ रुपयांच्या लायसन्ससाठी पाचशे रुपये का मोजले? असे विचारले असता, आरटीओत पैसे दिल्याशिवाय काम होत नाही.

भारताचा इतिहास, वर्तमान व भविष्यकाळाचे नववर्ष स्वागत यात्रेत घडणार दर्शन
प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने २७ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गिरगावातील फडके श्री गणेश मंदिरापासून सकाळी ८ वाजता या यात्रेला प्रारंभ होणार आहे. समर्थ रामदासी वैष्णव संप्रदायाचे वरिष्ठ आचार्य पंचखंडपीठाधीश्वर धर्मेद्र महाराज यांच्या हस्ते या गुढीपूजनाने ही यात्रा सुरू होईल. २६ नोव्हेंबरच्या पाश्र्वभूमीवर ‘शक्ती’ ही यंदाच्या यात्रेची संकल्पना असून भारतातील विविध महानुभवांचे देशाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विकासामध्ये असलेले योगदान आणि राष्ट्राच्या शक्तीस्थानांच्या आधारे भारताचा शक्तिशाली इतिहास, वर्तमान व भविष्यकाळ सांगण्याचा प्रयत्न सुमारे ६५ तरूण युवक मंडळे विविध चित्ररथाच्या माध्यमातून करणार आहेत. सुप्रसिद्ध मूर्तीकार प्रदीप मादुस्कर यांनी साकारलेली वैभवसंपन्न गणेशाची मूर्ती यात्रेच्या अग्रभागी असेल. २० फूट उंच श्री शंकराची मूर्ती, कला दिग्दर्शक नितीन देसाईकृत प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील डॉ. अमोल कोल्हे आणि नितीन देसाई, २२ फूटी ‘शक्ती’ क्षेपणास्र, १५ फुटी कालीमाता हे या यात्रेतील खास आकर्षण ठरणार आहे. दुचाकीवर स्वार पारंपरिक वेशातील युवतींचे आदीशक्ती पथक व दुचाकीवर स्वार झालेल्या भगवे फेटे धारण केलेल्या श्वेतवस्त्रधारी युवकांचे युवाशक्ती पथक या यात्रेचे वैशिष्टय़ ठरणार आहेत. यात्रेच्या मार्गात सुमारे २०० युवती नयनरम्य संस्कारभारती रांगोळ्या काढणार आहे. तसेच विविध चौक सार्वजनिक गुढय़ांनी सजविण्यात येणार आहेत. पारंपरिक वेशातील २०० तरुण-तरुणींचे भगवा ध्वज पथक, तरुण-तरुणींचे खड्ग प्रात्यक्षिक सादर करणारे शौर्य पथक, झांज पथक, कोळी नृत्य, गरबा, गोंधळ, भारूड, नमन, वासुदेव आदींचा यात्रेत समावेश आहे. यात्रेचा समारोप दुपारी १२.३० वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास आयोजित श्री सिद्धिविनायकाच्या दर्शन सोहळ्याने व महाआरतीने शामलदास गांधी मार्ग, धोबीतलाव येथे होईल. दरम्यान, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानदिन असल्याने या दिवशी रात्री ८ वाजता गिरगावातील प्रमुख चौकांमध्ये संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून महाराजांचे पुण्यस्मरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात तसेच नववर्ष स्वागत यात्रेत मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित बेडेकर, सचिव रोहित शिंदे आणि यात्राप्रमुख चैताली जाधव यांनी केले आहे.

‘संतांच्या मौल्यवान शिकवणुकीचा विसर’
प्रतिनिधी

संतांनी कधीही स्वत:चा विचार केला नाही, शेवटपर्यंत ते समाजाच्या हितासाठी जगले. मात्र, सद्यस्थितीत संतांच्या मौल्यवान शिकवणुकीचा विसर पडला आहे, अशी खंत ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केली. विश्वकल्याण मानव सेवा संस्थेच्या वतीने समाजातील उपेक्षित वर्गासाठी काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचा गौरव संगोराम यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. िपपरीतील आचार्य अत्रे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. आनंद शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एस. माने उपस्थित होते. यावेळी कराडच्या वैशाली िशदे यांना संत कान्होपात्रा पुरस्कार, उस्मानाबादच्या डॉ. राजलक्ष्मी गायकवाड व डॉ. रविराज गायकवाड यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार आणि बेळगावचे बाळकृष्ण मनगुत्ते यांना संत चोखामेळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर विश्वकल्याण मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष दुशासन क्षीरसागर, देवीदास महाराज, माजी नगरसेवक सुरेश नढे, सचिन औटे, संभाजी नढे, जयराम सांगोलकर, अशोक म्हस्के, सुभाष काटे आदी उपस्थित होते. संगोराम म्हणाले की, जग बदलते आहे, समाज बदलतो आहे. कुटुंबव्यवस्था लयाला चालली आहे. माणसा-माणसांमधील संबंध कमी होत आहेत. अशा परिस्थितीत समाजासाठी वाहून घेणाऱ्या या सत्कारमूर्तीचे कार्य म्हणजे वाळवंटातील हिरवळीसारखे आहे. गौरवमूर्तीनी स्वअनुभवाला कर्तृत्वाची जोड दिल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामीण विभागात काम करणे गरजेचे आहे. यावेळी वैशाली िशदे, डॉ. रविराज गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दुशासन क्षीरसागर यांनी केले. आशा केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन औटे यांनी आभार मानले. विशेष म्हणजे ११ नोव्हेंबरच्या दै ‘लोकसत्ता’ (चतुरंग - मिशन पॉसिबल)मधील सदरात ‘तामलवाडी भूषण’ हा लेख डॉ. गायकवाड दाम्पत्याच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती सांगणारा लेख प्रसिद्ध झाला होता. याच लेखाचा संदर्भ घेऊन विश्वकल्याण मानव सेवा संस्थेचे अ‍ॅड. आनंद शिंदे यांनी त्यांच्या कामाची पाहणी केली. या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी दै. ‘लोकसत्ता’ची मोठी मदत झाली, असे अ‍ॅड. आनंद शिंदे यांनी सांगितले.

दिवाळी अंक पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी

मराठी दिवाळी अंकांच्या शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्य सरकारच्या वतीने उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. या पुरस्काराचे नुकतेच पुण्यात वितरण करण्यात आले. ‘दीपावली’ आणि ‘शब्द दिपोत्सव’ या अंकांना ५१हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार विभागून देण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते अशोक कोठावळे आणि येशु पाटील यांनी हे पुरस्कार स्वीकारले. द्वितीय पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेच्या अंकाला तर स्पर्श ज्ञान या ब्रेल लिपीतील अंकाला विभागून देण्यात आला. हा पुरस्कार ३१ हजाराचा होता. साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकाला कलात्मक मांडणीसाठी ११ हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार तर ऋतुरंग या अंकातील चित्रांसाठी बाळ ठाकूर यांनाही पुरस्कार देण्यात आला. अशोक कोठवळे यांनी पुरस्कारविजेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.