Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

पाण्यासाठी यातायात.. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. नेवासे तालुक्यातील सलाबतपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळेच्या मधल्या सुटीत भरउन्हात पाण्यासाठी आटापिटा. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या हातपंपावर पाण्यासाठी सध्या अशी गर्दी होते.

गटनेत्यावरून युतीत मतभेद
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

महापालिका आयुक्तांच्या ‘३३जणांच्या एकत्रित गटाचा गटनेता कोण?’ या पत्रानंतर शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीत मतभेद निर्माण झाले असल्याचे समजते. आम्हाला विश्वासात घेऊनच नाव निश्चित करावे, असे भाजपचे म्हणणे असून सेनानेत्यांची त्याला तयारी नाही. लवकरच आम्ही एकत्र बसून यावर निर्णय घेऊ, असे याबाबत बोलताना सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले. सेनेचेच माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी, ‘आमदार अनिल राठोड सध्या मुंबईत आहेत.

राजळेंच्या विरोधात गांधींची मुंबईत ‘फिल्डिंग’
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेसचे पाथर्डीतील आमदार राजीव राजळे यांच्या भाजपतर्फे लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीने नगरमधील पक्षाचे प्रबळ दावेदार माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी सावध झाले असून, त्यांनी मुंबईत राजळेंच्या विरोधात जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. मतदारसंघातील पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची ते मुंबईत पक्षश्रेष्ठींशी भेट घडवून आणत आहेत. राजळेंना फक्त उमेदवारीच नाही, तर त्यांना पक्षात घेणेच कसे तोटय़ाचे आहे हे या शिष्टमंडळांकडून पक्षश्रेष्ठींना पटवून दिले जात आहे.

वहनक्षमता घटली, दुरुस्तीही रखडली!
महेश जोशी, कोपरगाव, १८ मार्च

सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन गोदावरी डावा-उजवा कालवे त्यावरील बांधकामे जीर्ण झाल्याने वारंवार फुटतात. या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४० कोटींची गरज असून, दोन्ही कालव्यांच्या रुपाने लाभार्थी शेतकरी सरकारला दर वर्षी सुमारे ४० ते ४५ कोटींचे उत्पन्न देतात. कालव्यांची वहनक्षमता घटल्याने पुरेसे पाणी मिळू शकत नाही, अशी स्थिती आहे. नाशिक जिल्ह्य़ातील निफाड व सिन्नर, तर नगर जिल्ह्य़ातील राहाता, कोपरगाव आदी तालुक्यांतील सुमारे सव्वा लाख एकर शेतीचे भवितव्य या कालव्यांवर अवलंबून आहे. कालव्यांमध्ये झाडे, वेडय़ाबाभळी, बेशरमाची झाडे-झुडपे मोठय़ा प्रमाणावर वाढली.

मिरजगाव उपकेंद्रांतर्गत
सिंगल फेजने १२ तास वीज!

मिरजगाव, १८ मार्च/वार्ताहर

वीज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे येथील उपकेंद्रांतर्गत गावांना केवळ ८ तासच वीज मिळत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होताच खडबडून जागे होत कनिष्ठ अभियंत्यांनी कोंभळी फीडरअंतर्गत सिंगल फेज लाईनने बारा तास वीजपुरवठा सुरू केला! त्यामुळे संबंधित गावांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अ‍ॅक्शन रीप्ले
‘अ‍ॅक्शन रीप्ले’ म्हटलं की बहुतांश लोकांना अलीकडे तुफान लोकप्रिय होऊन घराघरात शिरलेले ट्वेन्टी-२० आणि वनडेतील या ना त्या कारणास्तव दाखवलले अ‍ॅक्शन रीप्ले आठवतील. अ‍ॅक्शन प्ले म्हटलं की बॅकहॅण्डचा सुरेख फटका मारणारी सानिया, प्रतिस्पध्र्याला चकवत दोन्ही पायावर फुटबॉल नाचवत थेट गोल करणारा मॅरादोना, विजेच्या चपळाईने प्रतिस्पध्र्याला ठोसे लगावणारा विजेंदर, तर कधी साक्षात फेडररलाच हरवून ऑस्ट्रेलियन ओपनचं जगज्जेतेपद आपल्या नावे करणारा नदाल डोळ्यापुढे येतात. तसे इतरही अनेक क्रीडा क्षेत्रातली, पण तरीही क्रिकेटचं केवळ वेडंच नाही तर झपाटलेपणही अंगी बाळगणाऱ्या आम्हा भारतीयांना अ‍ॅक्शन रीप्ले म्हणताना दिसतो श्रीलंकेत पंचाच्या चुकीच्या निर्णयानं नाहक बाद ठरवलेला आमचा सचिन, वर्ल्डकपमध्ये आख्खी ओव्हरच झंझावती षटकारमय करणारा युवी आणि कुणाची खास विकेट काढल्यावर नखशिखांत रिअ‍ॅक्ट होणारा भज्जी..

१३ दिवसांत २४ कोटी वसुलीचे आव्हान थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा तोडण्याची मोहीम
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

महावितरणतर्फे सध्या वीजबिल वसुली युद्धपातळीवर सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत थकबाकी भरा; अन्यथा वीजजोड तोडू असा पवित्रा वीज कर्मचाऱ्यांनी घेतल्याने थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक हजार रुपयांवर थकबाकी असणाऱ्या घरगुती, व्यावसायिक थकबाकीदारांचे या मोहिमेमुळे धाबे दणाणले आहे.

दर्जा कायम न राखल्यास निर्मलग्राम पुरस्कार काढून घेणार
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती दर्जा टिकवून ठेवण्यात कमी पडल्यास त्यांचा पुरस्कार सरकार काढून घेणार आहे. ही कारवाई जाहीररित्या केली जाईल. शिवाय पुरस्काराची निम्मी (वितरित न केलेली, दुसऱ्या हप्त्याची) रक्कम जप्त करून पहिल्या हप्त्याची रक्कमही वसूल केली जाणार आहे. जिल्ह्य़ात सध्या निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींची संख्या ३११ आहे. पुरस्कारासाठी यंदा आणखी ५०० ग्रामपंचायती प्रस्तावित आहेत. जिल्हा ७० टक्के हागणदारीमुक्त झाल्याशिवाय केंद्र सरकार पुरस्कारासाठी तपासणी करणार नाही, असे बंधन टाकण्यात आले आहे.

बीडहून पुण्याकडे जाणाऱ्या ५ मालमोटारींना ७० हजार दंड
मर्यादेपेक्षा जास्त वाळूवाहतूक
श्रीगोंदे, १८ मार्च/वार्ताहर
बीड जिल्ह्य़ातून पुण्याकडे मर्यादेपेक्षा जास्त वाळू घेऊन जाणाऱ्या ५ मालमोटारी पोलिसांनी पकडल्या. न्यायालयाने या मालमोटारचालकांना प्रत्येकी १४ हजार रुपये दंड ठोठावला. तालुक्यातील वाळू वाहतुकीवर पोलीस करडी नजर ठेवणार असल्याचे निरीक्षक महादेव चव्हाण यांनी सांगितले.

बारावीचे परीक्षार्थी वाढल्याने नियंत्रणात ढिलाई
उपकेंद्रे लांब असल्याने गैरप्रकार बोकाळले
मोहनीराज लहाडे, नगर, १८ मार्च
परीक्षार्थीच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण केलेल्या उपकेंद्रांच्या परीक्षा हॉलच्या इमारती मूळ केंद्रापासून लांब अंतरावर असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने नियंत्रणात ढिलाई राहते व त्यातून कॉपी व इतर गैरप्रकारांच्या उपद्रवात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्य़ात बारावीच्या परीक्षेची ५३ केंद्रे आहेत. त्यातील १० केंद्रांवर १ हजारपेक्षा अधिक, तर ५ केंद्रांत दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

‘मंदिराजवळील हॉटेल बंद न केल्यास आंदोलन’
नगर, १८ मार्च/वार्ताहर

इमामपूर घाटातील हनुमान मंदिराजवळील अवैध धंदे करणारे हॉटेल बंद करावे; अन्यथा भाविकांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महंत भोलागिरीमहाराजांनी दिला आहे.
इमामपूर हद्दीतील या हनुमान मंदिराजवळ हे हॉटेल आहे. सरकारी जागेतील गट क्रमांक ३३३मध्ये अतिक्रमण करून हे हॉटेल बांधले आहे. अतिक्रमण केलेली जागा मंदिरालगत असून तेथे चालणाऱ्या अवैध धंद्याबाबत मंदिरातील भाविकांच्या तक्रारी आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अवैध धंद्याला विरोध केल्यामुळेच भाविकांना, तसेच भोलागिरीमहाराजांना जबर मारहाण करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालून हॉटेल बंद करावे; अन्यथा भक्तगण पूर्वसूचना न देता नगर-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.

राहुरी तालुका भाजपच्या उपाध्यक्षपदी शिरसाट
राहुरी, १८ मार्च/वार्ताहर

देसवंडी सेवा संस्थेचे संचालक बाबासाहेब चंद्रभान शिरसाट यांची राहुरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष विक्रम तांबे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर उपाध्ये यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी आमदार चंद्रशेखर कदम, आसाराम ढूस, सरचिटणीस उदय ठोंबरे, शहाजी कदम, रघुनाथ म्हसे, भगवान तोडमल उपस्थित होते. तालुक्यात पक्षाचे कार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार असून, लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारास मताधिक्य देऊ. या वेळी त्यांचा श्री. कदम यांनी सत्कार केला. माजी सरपंच रामचंद्र पवार, मधुकर कोकाटे, रामदास शिरसाट, अकबर आतार यांनी श्री. शिरसाट यांचे अभिनंदन केले.

मतदार ओळखपत्र कार्यक्रम ४ एप्रिलपर्यंत
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त मतदारांकडे ओळखपत्र असावीत, या हेतूने जिल्हा निवडणूक शाखेने ओळखपत्राचा कार्यक्रम ४ एप्रिलपर्यंत वाढवला आहे. विशेषत ज्या मतदानकेंद्रातील छायाचित्र ओळखपत्राची टक्केवारी ५० टक्क्य़ांपेक्षा कमी आहे, तेथे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे यांनी ही माहिती दिली. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील छायाचित्र ओळखपत्राची टक्केवारी ५० टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. त्यामुळे पूर्वी जाहीर केलेल्या केंद्रांवर, तसेच तहसील कार्यालयात मतदारांना ४ एप्रिलपर्यंत छायाचित्र ओळखपत्र तयार करून घेता येईल. या निवडणुकीत नसले तरी यापुढील सर्वच निवडणुकांमध्ये मतदार ओळखपत्र सक्तीचे होण्याची शक्यता असल्याने ते तयार करून घ्यावे, असे आवाहन सोनवणे यांनी केले.

‘आनंदऋषी रुग्णालयाची विश्वासार्हता सभासद व कर्मचाऱ्यांनी वाढविली’
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

जैन सोशल फेडरेशनचे सभासद व कर्मचाऱ्यांनी पूर्ण योगदान देऊन आनंदऋषी रुग्णालयाची विश्वासार्हता वाढविली आहे, असे प्रतिपादन उद्योजक रमेश गुगळे (जामखेड) यांनी येथे केले.
राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आनंदऋषी रुग्णालयामध्ये आयोजित मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गुगळे बोलत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बन्सीलाल कोठारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिराचे प्रायोजक गुगळे, जगन्नाथ व सुभाष बायड, डॉ. प्रकाश कांकरिया या वेळी उपस्थित होते. डॉ. प्रदीप जयस्वाल, डॉ. सचिन घुले, डॉ. प्रवीण डुंगरवाल, डॉ. वसंत कटारिया यांनी ९७ रुग्णांची तपासणी केली. दत्तात्रेय वारकड यांनी सूत्रसंचालन केले. संतोष बोथरा यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. आशिष भंडारी, निखिल लोढा, प्रमोद गांधी आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

क्रांतिसेनेचे पदाधिकारी छावा संघटनेत दाखल
श्रीरामपूर, १८ मार्च/प्रतिनिधी

क्रांतिसेनेचे तालुकाध्यक्ष नितिन पटारे यांनी पदाधिकाऱ्यांसह पक्षाचा त्याग क रून छावा संघटनेत प्रवेश केला. तालुकाध्यक्ष नितिन पटारे, कार्याध्यक्ष श्रीकांत पटारे, दादा बडाख, विशाल आदिक, शहराध्यक्ष दीपक बारहाते, शरद बोंबले, सदाशिव बहिरट, किशोर बनकर, सचिन मुरकुटे आदींनी क्रांतिसेनेतून छावा संघटनेत प्रवेश केला. शुक्रवारी (दि. २०) या कार्यकत्र्र्याचा छावाचे राज्य उपाध्यक्ष संजय तायडे यांच्या उपस्थित संघटनेत प्रवेश होणार आहे.

बेकायदा नळ कनेक्शन घेणाऱ्याविरुद्ध गुन्हा
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा नळ कनेक्शन घेऊन पाणी चोरणाऱ्या महाभागावर तोफखाना पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक शर्मा (रा. रौनक अपार्टमेंट, भिस्तबाग चौक, सावेडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या घरासमोरील मुख्य रस्ता खोदून जलवाहिनी फोडून नळ कनेक्शन घेतले होते. त्याचा थांगपत्ता महापालिकेला नव्हता. गेले अनेक दिवस शर्मा चोरून पाणी वापरत होता. शिवाय त्याने रस्त्याचेही नुकसान केले. या प्रकाराची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मनोहर सुभाष पारखे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शर्मा अनधिकृतरित्या पाणी वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पारखे यांच्या फिर्यादीवरून शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक उपनिरीक्षक शेटे तपास करीत आहेत.

जैन परीक्षा बोर्ड चिकित्सालयास मुनोत ट्रस्टतर्फे १६ लाखांची देणगी
नगर, १८ मार्च/प्रतिनिधी

श्रीतिलोक आनंद पारमार्थिक दवाखाना व मानव सेवा समिती संचलित जैन धार्मिक परीक्षा बोर्ड चिकित्सालयास चंदनमल केशरचंद मुनोत मेडिकल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या वतीने डिजिटल एक्स-रे मशिनसाठी १६ लाख २७ हजार ६०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. जैनमुनी महेंद्रऋषी, विशालऋषी यांच्या उपस्थितीत ट्रस्टचे कचरदास, लालचंद आनंदराम व शोभाचंद मुनोत या विश्वस्तांनी धनादेश समितीचे मानद मंत्री गोकुळ गांधी यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी डॉ. विजय भंडारी, रमेश कासवा, खुशालचंद मुनोत, डॉ. विजय पितळे, सतीश डुंगरवाल, विनोद फिरोदिया आदी उपस्थित होते.