Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

शस्त्र प्रदर्शन - अंबाझरी दारुगोळा कारखान्यात आयोजित शस्त्र प्रदर्शनात ठेवण्यात आलेली पिनाक क्षेपणास्त्राची प्रतिकृती.

व्हीसीए प्रकाशात
वैदर्भीय क्रिकेट रसिकांना मिळणार आता विद्युत झोतातील लढतींचा आनंद

नागपूर, १८ मार्च / क्रीडा प्रतिनिधी

विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा येथील नवे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय नकाशावर कायमस्वरूपी प्रकाशझोतात राहणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याने जगप्रसिद्ध झालेले हे स्टेडियम आता आगामी पंधरा दिवसात पूर्णत: आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी आवश्यक असलेल्या फ्लड-लाईट्सचे काम आगामी सात दिवसात पूर्ण होणार असून वैदर्भीय क्रिकेट रसिकांना येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या अनुषंगाने प्रथमच विद्युत झोतात क्रिकेटचा आनंद लुटण्याची पर्वणी लाभणार आहे.

स्टार न्यूजचा ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ कार्यक्रम गोंधळातच गुंडाळला
मुत्तेमवार व पुरोहित आमने-सामने, भारनियमनाच्या मुद्यावरून भडका

नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

स्टार न्यूजच्या ‘कौन बनेगा प्रधानमंत्री’ कार्यक्रमात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि भाजपचे बनवारीलाल पुरोहित आमने-सामने येताच भारनियमनाच्या मुद्यावरून गोंधळ झाला. विधानभवन परिसरातून या कार्यक्रमाचे बुधवारी थेट प्रक्षेपण सुरू असताना गोंधळ झाल्याने कार्यक्रम गुंडाळावा लागला. अँकर किशोर अजवाणी यांनी श्रोत्यांमधील एका बालिकेला विजेबाबत प्रश्न करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

रस्त्यावरील शीतपेय आरोग्यासाठी किती योग्य?
नागपूर १८ मार्च / प्रतिनिधी

उन्हाचा तडाखा वाढत असताना तो ‘कॅश’ करण्यासाठी शहरातील अनेक भागात, फुटपाथवर शीतपेयाची दुकाने थाटली आहेत. उन्हात उसाचा रस, ताक, लस्सी व परंपरागत शीतपेयांचा नागरिक मोठय़ा प्रमाणात आस्वाद घेतात. त्यामुळे अशा हातगाडय़ांवरील गर्दीत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. अशी दुकाने मुख्यता: सीताबर्डी, महाल, धरमपेठ, सक्करदरा, गोकुळपेठ तसेच शहरातील विविध चित्रपटगृहाच्या शेजारी दिसून येतात. या दुकानातील स्वच्छता पडताळूनच ग्राहकांनी या शीतपेयाची चव घ्यावी.

आत्महत्या अधिक असणाऱ्या सहा जिल्ह्य़ात विशेष प्रकल्प
नागपूर, १८ मार्च/ प्रतिनिधी
आयएफएडीची मदत घेणार
पणन महामंडळ नोडल एजन्सी
प्राथमिक खर्चासाठी २५ लाख मंजूर

इंटरनॅशनल फंड फॉर अग्रीकल्चर डेव्हलपमेन्ट (आयएफएडी)च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक असलेल्या विदर्भातील सहा जिल्ह्य़ात कृषी विकासावर आधारित प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठी २५ लाख रुपये ईएफएडीने मंजूर केले आहे.

बिंदूनामावलीबाबत विद्यापीठ प्रशासनातच मतभेद
विधिसभेत मुद्दा गाजणार
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

आगामी विधिसभेत बिंदूनामावलीचा (रोस्टर) मुद्दा गाजणार असल्याचे संकेत आजच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मिळाले आहेत. २१ व २२ मार्चला होऊ घातलेल्या विधिसभेतील प्रश्नांच्या उत्तरासंदर्भात आजची व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीत बिंदूनामावलीच्या मुद्यावरून विद्यापीठ प्रशासनामध्ये एकमत नसल्याचे दिसून आले. बिंदूनामावलीसंदर्भात, शासनाचा १९९७ की २००३ चा अध्यादेश ग्राह्य़ मानायचा यावर उपकुलसचिव बी.सी. राठोड आणि उपकुलसचिव पूरण मेश्राम यांची भिन्न मते पडली. त्यावरून हा वाद रंगला. बिंदूनामावली न लावता विद्यापीठातील नियुक्तयांच्या जाहिराती देण्यात आल्या का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. बैठकीत ७० एकर जागेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. विद्यापीठाची नेमकी जागा किती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विद्यापीठाच्या ७० एकर जागेवर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ठाम भूमिका घेऊन कुलगुरूंनी यासंदर्भात खुलासा करण्याची मागणी केली. मात्र ७० एकरचा प्रश्न न्यायालयाच्या आधीन असल्याचे कुलगुरूंनी लक्षात आणून दिले.

आदिवासी विकास विभागाच्या २९ मार्चला लेखी परीक्षा
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनेवरील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षण सेवक, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, गृहपाल अधीक्षक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादी पदांसाठीच्या लेखी परीक्षा रविवार, २९ मार्चला अमरावतीतील विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी/ इंग्रजी), कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या लेखी परीक्षा दुपारी ३.०० ते ५.०० या दरम्यान आणि अन्य पदांच्या लेखी परीक्षा सकाळी १० ते १२ या वेळेत घेण्यात येतील. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पाठवण्यात आलेले आहे. २५ मार्चपर्यंत लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पोस्टाने प्राप्त न झाल्यास अशा उमेदवारांनी अपर आयुक्त, आदिवासी विकास, तिवसा जीन कंपाऊंड, कॉटन मार्केट रोड, अमरावती येथे २६ मार्चला उपस्थित राहून दुय्यम प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावीत, २६ तारखेनंतर येणाऱ्या उमेदवारांना दुय्यम प्रवेशपत्र दिले जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे अपर आयुक्त, जी.पी. गरड, यांनी कळवले आहे.

औद्योगिक घडामोडींची दखल घेण्याची गरज -गौतम दोशी
नागपूर, १८ मार्च/प्रतिनिधी

औद्योगिक सल्लागार होण्यासाठी सनदी लेखापालाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष गौतम दोशी यांनी केले. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टट्स ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. औद्योगिक कामकाज सांभाळताना सनदी लेखपालाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या क्षेत्रात कार्य करताना चार्टर्ड अकाऊन्टट्सनी औद्योगिक कामकाजाबद्दल आवश्यक ज्ञान ठेवणे तसेच औद्योगिक क्षेत्रातील घडामोडींबद्दल अधिक सजग राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे दोशी यांनी यावेळी सांगितले. सीएंनी जास्तीत जास्त संख्येने औद्योगिक क्षेत्रात सहभागी व्हावे यासाठी इन्स्टिटय़ूटनेही उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागपूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद पटेल यांनी चार्टर्ड अकाऊन्टट्सच्या औद्योगिक सल्लागार बनण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. चर्चासत्रात इन्स्टिटय़ुटच्या उपाध्यक्ष कविता लोया, कोषाध्यक्ष अभिजित केळकर, सचिव सतीश सारडा, केंद्रीय परिषद सदस्य भावना दोशी, अशोक चांडक, अनिल पारेख, राजेश लोया, जुल्फेश शहा, समीर बाकरे, शारदा सुरेश, स्वप्निल अग्रवाल यांच्यासह इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

कलासागर महाविद्यालयात शिवाजी महाराजांची जयंती
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

सेन्ट्रल एव्हेन्यूवरील कलासागर चित्रकला महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कला शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बारई उपस्थित होते. कलासागरचे चमन प्रजापती यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्थेचे अध्यक्ष गोपाल आर. पट्टनम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य मिलिंद आकरे यांनी केले. संस्थेच्या सचिव आनंदी पट्टम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नसीम अहमद, वसीम शेख, अरविंद आवारी, राजकुमार कावळे, शेखर वानसकर, शरद मस्के, आदिती दिवान, शुभांगी जांगडे, प्रवीण ढेंगे आदी उपस्थित होते.

सामाजिक शक्ती निर्माण केली तरच न्याय -अ‍ॅड. नंदा पराते
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

आदिवासींनी न्यायासाठी सामाजिक शक्ती निर्माण केली तरच त्यांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते यांनी केले. सीताबर्डीवरील शासकीय बचत भवनात आयोजित ऑल इंडिया आदिम एम्प्लॉईज असोसिएशनच्यावतीने आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. हलबा, माना, गोवारी, आदिवासी ऑल इंडिया आदिम एम्प्लॉईज असोसिएशनच्या पिवळय़ा झेंडय़ाखाली राजकीय शक्ती निर्माण करून स्वत:चे आमदार निवडून आणल्याशिवाय संविधानाच्या सवलती मिळणार नाहीत. तहसील कार्यालयामध्ये अर्ज केल्यानंतर २४ तासात मागासवर्गीयांना जातीचा दाखला संविधानाप्रमाणे मिळत असेल तरच मतदान करण्याची तयारी आहे. राजकीय पक्ष न्याय देणार नसतील तर, लोकसभा निवडणुकीवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची भूमिका मागासवर्गीय समाजाने घेतली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत सामाजिक शक्ती निर्माण झाली तरच कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोकरी सुरक्षित राहील. म्हणून, संविधानाच्या सन्मानासाठी जागृत व एकजूट होण्याची गरज आहे, असे मत अ‍ॅड. नंदा पराते यांनी यावेळी मांडले.

वैद्यकीय प्रश्नमंजूषेत महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय अव्वल
नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दुसरे
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसतर्फे घेण्यात आलेल्या आंतर वैद्यकीय प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयालाने तर, द्वितीय क्रमांक नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पटकावला. सायंटिफिक सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विदर्भातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या चमू सहभागी झाल्या होत्या. महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयातर्फे शशांक बेहरे, अक्षय फडके, अमिता धवस व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सिद्धार्थ तुरकर, भारती शर्मा व सौरभ झंवर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुश्रृत बाभुळकर यांच्या हस्ते विजेत्या चमूला पारितोषिके देण्यात आली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ, एन.के. पी. साळवे आयुर्विज्ञान संस्था वानाडोंगरी, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला या महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे संचालन डॉ. अनुपमा बेलसरे व डॉ. मोहमंद कुरेशी यांनी केले. डॉ. सुधीर भावे यांनी प्रश्नमंजुषेची माहिती दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. रमेश मुंडले, डॉ. गुप्ते, डॉ. अविनाश देशमुख, प्रशांत जोशी यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. राजन बोरकर यांनी आभार मानले.

गॅस सिलेंडर चोरणारे दोघे अटकेत
आरोपीमध्ये पोलिसाचा भाऊ
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

शहरात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असतानाच सिलेंडरची चोरी करणाऱ्या दोघांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचे ६ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. आरोपीमध्ये एका पोलीस शिपायाच्या भावाचा समावेश असल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. किरण शालिकराम निंबाळकर (२५, रा. पोलीस लाईन टाकळी) व जुबेर मिर्झा शब्बीर मिर्झा (२१, रा. कामगारनगर झोपडपट्टी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यातील किरण पोलीस शिपायाचा लहान भाऊ आहे. आरोपी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या घरातील गॅस सिलेंडर चोरून त्याची अवैधरित्या विक्री करीत होते. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नागरिकांनी तक्रारीही नोंदवल्या. पोलिसांना तीन दिवसांपूर्वी जुबेर मिर्झा हा गॅस सिलेंडर घेऊन जाताना दिसला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने किरण निंबाळकरसोबत घरगुती गॅस सिलेंडरची चोरी करत असल्याचे कबूल केले. पोलिसांनी किरणलाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही गॅस सिलेंडरची चोरी करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांना अटक करून सहा सिलेंडरसह एक मोटारसायकलही जप्त केली. ही कारवाई गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रेड्डीवार यांच्या सूचनेनुसार हे.कॉ. रवींद्र चांदेकर, पो.कॉ. राधेश्याम खापेकर, प्रदीप पवार, सुनील इंगळे, राजेश बिजवे यांनी केली.

‘परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करावी’
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

परवाना धारकांनी त्यांच्याजवळील शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावी, अशी सूचना परिमंडळ-३ चे पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांकडून गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते. याकरिता ही सूचना करण्यात आली आहे. परिमंडळ कं्र-३ अंतर्गत येत असलेल्या कोतवाली, तहसील, गणेशपेठ, कळमना, लकडगंज व यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शस्त्र परवानाधारकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा आम्र्स डिलरकडे उद्या, गुरुवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमा करावी. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मधुकर पांडेय यांनी दिला आहे.

आजी-आजोबा संमेलन
नागपूर, १८ मार्च / प्रतिनिधी

स्थानिक प्रबोधन कॉन्व्हेंटमध्ये नुकतेच आजी-आजोबा संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन भाजपचे नगरसेवक गिरीश व्यास यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. सतीश आढे, दीपक आमले प्रामुख्याने उपस्थित होते. मुलांवर आजी-आजोबाचे संस्कार होणे आवश्यक असल्याने प्रबोधन कॉन्व्हेंटचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी वक्तयांनी व्यक्त केली. वैशाली कावटे यांनी प्रास्ताविक केले. अंताक्षरी, संगीत खुर्ची, गीतगायन स्पर्धा, प्रश्न मंजूषेसह इतरही स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. उत्कृष्ट पालक म्हणून गोविंदराव व कमल देव यांना तर, विविध स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे नलिनी तिळू, मंदा डफाडे, पोकसे, मीरा कडू, मेहतवार, मीनाक्षी दरोडकर, मासूरकर यांना मीनाक्षी पाध्ये यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.