Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
नवनीत

अनेक श्रुती, स्मृती, पुराणे, धर्मग्रंथ, ऐतिहासिक दाखले, शिलालेख यातून चोवीस र्तीथकर आणि कुलकरांची नावे वाचायला मिळतात. कुलकरांनी कुलाची, कुटुंबाची रचना केली. मानवजातीची संगतवार, क्रमबद्ध समाजरचना केली. कसं जगावं, काय खावं, प्रकाश-अग्नी कसा मिळवावा, भांडी कशी बनवावी, हिंस्र पशूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी दगडाची, लाकडाची हत्यारं कशी बनवावी, पशुपालन, पशूंचा वाहन म्हणून उपयोग, गावाच्या-जागेच्या सीमा, घरांची रचना, आकाशातील चंद्र, तारे, सूर्य, ऋतू यांची माहिती; वादळ, ऊन, पाऊस यांच्यापासून रक्षण, बाळ जन्मल्यावर त्याच्या अंगावरची प्रसा (वार) कशी दूर करायची, नाभीपासून नाळ कशी सोडवायची याची माहिती दिली.
प्रथम र्तीथकरांनी- ऋषभदेवांनी यापुढे जाऊन जगण्यासाठी सहा आवश्यक गोष्टींचे ज्ञान दिले :
१) असि- युद्ध, २) मसि- लेखन, लिपी, ३) कृषी- शेती, ४) वाणिज्य- व्यापार, ५) विद्या- नृत्य, गायन, शास्त्र, ६) शिल्प- हस्तकला, चित्रकला, शिल्पकला.
त्यांना योगविद्येचे प्रणेतेही म्हणतात. उत्खननात त्यांच्या खङ्गायनातल्या, कायोत्सर्गातल्या अनेक मूर्ती सापडतात. संयम, तप, त्याग, ध्यानाची एकाग्रता यामुळे मानसिक शक्तीचा, अलौकिक शक्तीचा कसा विकास होतो; राग, द्वेष, लोभ, मोह यामुळे कर्मबंध होतो; संयम, व्रताचरण, कषायाचा त्याग यामुळे कर्मदहन होऊन मुक्तिमार्ग कसा खुला होतो हेही त्यांनी सांगितलं. ब्राह्मी लिपीचे ते जनक समजले जातात. यातूनच अनेक भाषा जन्मल्या. अहिंसेचा उद्घोष त्यांनी केला. यानंतरच्या सर्व र्तीथकरांनी ऋषभनाथांनी परिवर्तित केलेलं धर्मचक्र गतिमान केलं.
मनुष्य हा माकडाचं उत्क्रांत रूप आहे, असं डार्विन म्हणाला. र्तीथकरांनी मनुष्य हा मुळात मनुष्यच होता. त्याच्या विकासाची सुसंगत, क्रमबद्ध कथा त्यांनी सांगितली.
लीला शहा

सूर्यावर घडणाऱ्या घटनांचे पृथ्वीवर तात्कालिक परिणाम काय होतात?
सूर्याच्या पृष्ठभागावर घडणारे अल्पसे बदलही पृथ्वीवर परिणाम घडवून आणण्यास पुरेसे ठरतात. सूर्यावर जेव्हा सौरज्वाला उफाळतात तेव्हा सूर्याकडून उत्सर्जित होणाऱ्या विद्युत्भरित कणांचे प्रमाण वाढलेले असते. सेकंदाला शेकडो किलोमीटर वेगाने बाहेर पडणाऱ्या या विद्युत्भारित सौरकणांपैकी काही कण दोन-तीन दिवसांनी सौरवाऱ्यांच्या स्वरूपात पृथ्वीवर येऊन थडकतात. हे सौरकण पृथ्वीभोवतालच्या चुंबकीय क्षेत्रात वादळ घडवून आणतात. या चुंबकीय वादळाचे परिणाम भीषण असू शकतात. या वादळांमुळे रेडिओ यंत्रणेत अडथळा येऊन संपर्क व्यवस्था बंद पडू शकते. पृथ्वीभोवती फिरत असलेले कृत्रिम उपग्रह निकामी होऊशकतात. इतकंच नव्हे तर पृथ्वीभोवतालचे वातावरण प्रसरण पावते. कमी उंचीवरून फिरणाऱ्या उपग्रहांच्या कक्षेवर याचा परिणाम होतो व ते खाली कोसळूही शकतात. (अमेरिकेचे स्कायलॅब हे अंतराळस्थानक याच कारणामुळे अपेक्षित काळाच्या दोन वर्षे अगोदर कोसळून नष्ट झाले.)
या चुंबकीय वादळांच्या वीजवाहक तारांवर होणाऱ्या परिणामामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. इ.स. १९८९ सालच्या अतितीव्र चुंबकीय वादळात कॅनडामधील क्विबेक प्रांत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सुमारे नऊतासांहून अधिक काळ अंधारात होता. सौरकणांच्या तीव्र माऱ्यामुळे गंजण्याच्या क्रियेला चालना मिळून धातूच्या तेलवाहिन्या वा जलवाहिन्या फुटूही शकतात. सौरकणांचा मारा हा किरणोत्सर्गासारखा प्रकार असल्यामुळे अंतराळवीरांनाही या माऱ्यापासून धोका संभवतो. जेव्हा सौरडागांची संख्या वाढलेली असते, तेव्हा सूर्यावर निर्माण होणाऱ्या सौरज्वाळांचे प्रमाण आणि परिणामी सौरवाऱ्यांची तीव्रताही वाढलेली असते. सूर्य हा या काळात जागृत अवस्थेत असल्याचे मानले जाते. या काळात पृथ्वीवरील ध्रुव प्रदेशाजवळील रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या रंगीबेरंगी ‘ध्रुवीय प्रकाशा’चे प्रमाणही वाढलेले असते. या कारणास्तव ‘ध्रुवीय प्रकाशा’चे वाढते प्रमाण हे सूर्याच्या जागृतावस्थेचे द्योतक मानले जाते.
श्रीनिवास औंधकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

एकोणिसाव्या शतकात अंधारात असलेल्या आफ्रिकेला प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे काम स्कॉटिश धर्मप्रसारक डेव्हिड लिव्हिंगस्टन याने केले. ग्लास्गोजवळील ब्लॅरिअर येथे १९ मार्च १८१३ रोजी डेव्हिड लिव्हिंगस्टनचा जन्म झाला. ग्लास्गो विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचा अभ्यास केल्यावर लंडन मिशनरी सोसायटीतर्फे १८४१ च्या सुमारास तो आफ्रिकेला गेला. कोलोबेंग नदीच्या खोऱ्यातील लोकांना आधुनिक पद्धतीची शेती शिकवून ‘नामी’ सरोवर त्याने शोधून काढले. १८५२ च्या शोधमोहिमेमुळे त्याचे नाव जगभर झाले. या शोधमोहिमेवर त्याने लोआंडा हे लक्ष्य ठरवून किओके प्रदेशात प्रवेश केला. अखेरीस १८५४ च्या सुमारास तो लोआंडात पोहोचला. परतीच्या प्रवासात त्याने व्हिक्टोरिया धबधब्याचा शोध लावला. या संपूर्ण प्रवासात तो कंदमुळे आणि मध खाऊन जगला. १८५६ साली जेव्हा तो इंग्लंडला आला तेव्हा एखाद्या विजयी सम्राटाप्रमाणे त्याचे स्वागत झाले. व्हिक्टोरिया पदकासह ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठांनी त्याला मानद पदव्या बहाल केल्या. १८५८ ची त्याची झांबेझीची मोहीम मात्र अपयशी ठरली. साथीदारांनी पुकारलेला असहकार, स्थानिकांचे असहकार्य यामुळे मोहीम गुंडाळून हिंदूी महासागराला वळसा घालून तो मुंबईत आला व तेथून इंग्लंडला गेला. त्याची दोन स्वप्नं होती. एक म्हणजे नाईल नदीचे उगमस्थान स्थान शोधणे आणि दुसरे आफ्रिकेतील गुलामगिरी संपवणे. अखेर बारा हजार मैलांपेक्षा अधिक प्रवास करून बांग्वेलू सरोवर व लांबा नदीचा शोध लावून ही स्वारी नाईलच्या उगमस्थानी पोहोचली. या प्रवासात त्याचे शरीर केवळ हाडांचा एक सांगाडा होऊन बसले होते. अखेर या दलदलीच्या प्रदेशाच्या प्रवासाची दगदग असहय़ होऊन त्याची प्रकृती खालावली आणि १ मे १८७३ रोजी त्याचं निधन झालं.
संजय शा. वझरेकर

सकाळच्या सात-साडेसातचा सुमार होता. गार हवेत सायकलवरून ऋषिकेश आणि वरुण गणिताच्या क्लासला चालले होते. दहावीची परीक्षा द्यायची म्हणजे क्लासला जायला हवे, अधिक अभ्यास होतो, असे वरुणच्या बाबांना वाटायचे. एका वळणावरून ते समोरच्या रस्त्याला लागले.
पाहतात तो सायकलवरून जाणाऱ्या एका दूधवाल्याची दुधाच्या पिशव्या भरलेली पिशवी फाटून खाली पडली होती. आतल्या सुमारे ४०-५० पिशव्या रस्त्यावर इतस्तत: पडल्या होत्या. काही पिशव्या फुटल्या होत्या. रस्त्यावर दुधाचा सडा शिंपडला गेला होता. दुधाचे ओघळ वाहत होते. तशात त्या रस्त्यावर स्कूटर्स, मोटारगाडय़ांचीही बरीच वर्दळ होती. सगळे कशाबशा पिशव्या चुकवत पुढे जात होते. त्यातच एका सँट्रोगाडीच्या टायरमुळे एक पिशवी फुटली. दूधवाल्याची गाडय़ा चुकवत दुधाच्या पिशव्या उचलण्यात अगदी त्रेधातिरपीट उडाली होती. कुणी थांबून त्याला मदत करावी, असे काही कुणाच्या मनात येत नव्हते. ऋषिकेश आणि वरुण सायकलीवरून उतरून, त्या स्टँडला लावून घाईने त्याच्या मदतीला गेले. ऋषिकेशने दोन्ही हात आडवे पसरून येणाऱ्या वाहनांना थांबण्याची विनंती केली. वरुण पिशव्या गोळा करू लागला. ते पाहून आणखी एक स्कूटरवाला थांबला आणि पिशव्या गोळा करायला मदत करायला लागला. एक बाई आपली मारुतीगाडी बाजूला लावून आल्या. पिशव्या उचलत दूधवाल्याला म्हणाल्या,‘‘माझ्या गाडीत बसा. सुटय़ा दुधाच्या पिशव्या कशा नेणार तुम्ही? त्या गाडीत ठेवा. तुमच्या सेंटरवर पोहोचवते मी तुम्हाला.’’ एव्हाना साऱ्या पिशव्या उचलून फाटलेल्या पिशवीतच ठेवल्या गेल्या होत्या. ती पिशवी दोन्ही बाजूंनी धरून बाजूच्या इमारतीमध्ये वॉचमनपाशी ठेवल्या. दूधवाला बाईंना म्हणाला,‘‘मी सायकलवरून सेंटरवर जाऊन दुसरी थैली घेऊन येतो. पण तुम्ही मदत देऊकेलीत फार बरं वाटलं ताई! हा वॉचमन माहितीचा आहे. तो सांभाळेल दुधाच्या पिशव्या.’’ वाहनांची वर्दळ पुन्हा सुरू झाली होती. बाईही गाडी सुरू करून निघून गेल्या. ऋषिकेश वरुणला म्हणाला,‘‘पाच-दहा मिनिटांत तो दूधवाला परत येईल. आपण तोपर्यंत थांबू या इथे वॉचमनच्या मदतीला. त्याला कुणी बिल्डिंगमधल्या लोकांनी बोलावले तर जावं लागेल. मग दुधाच्या पिशव्यांपाशी कोण?’’ दूधवाला मोठी पिशवी घेऊन परतला. त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती आणि ऋषी, वरुणच्या चेहऱ्यावर आनंद. दुसऱ्यासाठी आपल्याला कायकरता येईल, याचा विचार करावा. अडचणीत दुसऱ्याला मदत करता येते. करुणेने वागता येतं, प्रेम दाखवता येतं, कृतज्ञता व्यक्त करता येते. तुमच्या कृतीमुळे समोरच्याचा फायदा होतोच, पण तुम्हाला स्वत:बद्दल कौतुक, अभिमान वाटतो. आनंद होतो. आजचा संकल्प : मी रोज एक तरी सत्कृत्य करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com