Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

पीडित महिलांकरिता नवी मुंबईत हेल्पलाइन
६० संस्था मदतीसाठी सरसावल्या

नवी मुंबई/प्रतिनिधी :

अत्याचारग्रस्त महिलांना वसतिगृह तसेच अडीअडचणींच्या प्रसंगी राहण्याची व्यवस्था व्हावी, या महिलांना कायदेविषयक सहाय्य तसेच आरोग्य यासंबंधीच्या प्रश्नांची उकल शोधता यावी, यासाठी नवी मुंबईतील तब्बल ६० हून अधिक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन तयार केलेल्या नवी मुंबई स्वयंसेवी संस्था समन्वय मंचाच्या माध्यमातून समाजातील पीडित, समस्याग्रस्त महिलांकरिता आजपासून एक अद्ययावत अशी हेल्पलाइन सुरू करण्यात आली. शहरात अशास्वरूपाचा प्रयोग प्रथमच होत असून, दिवसभर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या आठ तासांत ही हेल्पलाइन महिलांकरिता सुरू राहणार आहे. या हेल्पलाइनचे उद्घाटन आज नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नाहटा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

चंद्रकांत हातमोडे यांना श्रध्दांजली
पनवेल/प्रतिनिधी : चंद्रकांत हातमोडे यांच्या निधनामुळे केवळ रायगड जिल्ह्याचेच नव्हे, तर कोकण प्रांताचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री ए.आर. अंतुले यांनी हातमोडे यांना श्रद्धांजली वाहिली. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस हातमोडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त गिरवले गावात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत अंतुले बोलत होते.

उदंड जाहले एसईओ
उरण : उरण परिसरात विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस फुगतच चालली आहे. नुकतीच ३२ एसईओंची यादी जाहीर झाल्याने उरणमधील एसईओंची संख्या १७५ पर्यंत पोहोचली आहे. निवडणुकाजिंकून राजकीय पक्ष सत्तेवर आल्यानंतर पक्षात पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांना एसईओपदी नियुक्ती करण्यासाठी चढाओढ सुरू होते.

पिकांवर खोडकिडय़ाचा प्रादुर्भाव ?
उरण : मागील आठवडय़ात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेती, आंबा व भाजीपाल्याचे नुकसान झाले असून, या अवेळी पावसामुळे पिकांवर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती गटविस्तार अधिकारी (शेती) एम.एम. भालेराव यांनी व्यक्त केली आहे. मागील आठवडय़ात होळी संपताच दोन दिवस बेमोसमी पाऊस पडला. या पावसात मोहोर आलेला आंबा, कैरी, इतर पिकांचे उरण परिसरात नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहोर आणि कैऱ्या गळून पडल्या, तसेच भाजीपाला व इतर पिकांवरही पावसामुळे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी अद्याप तरी विभागाकडे तक्रारी केल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्यांचे डांबरीकरण रखडले
पनवेल : पनवेलमधील परदेशी आळी, नित्यानंद मार्ग, डॉ. आंबेडकर मार्ग व अन्य काही विभागातील रस्त्यांचे डांबरीकरण मध्येच रखडल्याने या मार्गांवरून जाणारे नागरिक, तसेच वाहनचालक नगरपालिकेच्या नावाने बोटे मोडत आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी अनेक दिवसांपासून तेथे खडी व बारीक वाळू टाकण्यात आली आहे, मात्र डांबर न टाकल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पालिकेच्या या मनमानी कारभाराबाबत संबंधित नगरसेवकही मौन बाळगून आहेत, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. गेल्या महिन्याभरात डांबरीकरण करण्यात आलेल्या कामाचा दर्जाही निकृष्ट व असमाधानकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांसाठी हिमालयात साहसी शिबीर
पनवेल : पनवेलमधील अमोल खरे आणि राजन तारे या पर्यटनप्रेमी तरुणांनी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत हिमालयीन साहसी शिबीर आयोजित केले आहे. हे शिबीर २५ मेपासून सुरू होणार असून, त्यात १० वर्षांंवरील सुदृढ विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. हिमाचल प्रदेशात होणाऱ्या या ११ दिवसीय साहस शिबिरात धुंडी-पातालसू हा १२ हजार फूट उंचीवरील ट्रेक आणि रोहतांग पास येथे १५ हजार फुटांवरून स्कीईंग शिबिरार्थींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. याशिवाय या शिबिरात रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, पॅराग्लायडिंग व झोरबिंग या साहसी प्रकाराचा व खेळांचा समावेश आहे. संपर्क- ९८२०२३३३४९/ ९९३०११२२२१.

सिप्लामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन
पनवेल : पाताळगंगा येथील सिप्ला कंपनीमध्ये नुकताच ३८ वा राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. यावेळी भित्तीपत्रक, घोषवाक्य, काव्य, एकपात्री अभिनय, निबंध, वक्तृत्व आदी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या मुलांनी मोठय़ा संख्येने या स्पर्धांमध्ये भाग घेतला. कंपनीमध्ये कार्यरत असताना नेहमी सुरक्षेची योग्य काळजी घेण्यात येईल, अशी शपथ कामगारांना आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली. पाताळगंगा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि नागरिकांनीही या उपक्रमात भाग घेतला. या दरम्यान कामगारांना सुरक्षेच्या आधुनिक उपाययोजनांची माहितीही करून देण्यात आली.