Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आपल्या नाशिक या बालेकिल्ल्यात येत्या शनिवारी जाहीर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. ज्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) दोन आठवडय़ांपूर्वी राष्ट्रवादीने आपले राज्यस्तरीय अधिवेशन भरवून प्रचाराचे रणशिंग फुंकले त्याच मैदानावर येत्या शनिवारी सायंकाळी राज यांची सभा होत आहे. साहजिकच व्यासपीठाच्या सज्जतेपासून संभाव्य गर्दीपर्यंत कुठे काही कसूर राहू नये, यासाठी मनसेचे नेते-कार्यकर्ते काळजी घेत आहेत. गेल्या तीन वर्षांत नाशिक व परिसरात पक्ष बांधणीसाठी मेहनत घेणारे पक्षाचे सरचिटणीस वसंत गीते, अतुल चांडक व त्यांचे सहकारी आता ही मेहनत फळाला यावी म्हणून युद्धसज्जतेच्या उद्देशाने व्यासपीठाच्या बांधणीवरही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असल्याचे दिसून येते.

गटागटाची काटाकाटी!
भाऊसाहेब :
निवडनुकीचं वारं जोरात असलं तरी आपली नेतेमंडळी कुटं दिसत न्हाईत त्ये, भावराव..
भाऊराव : हो, प्रमुख पक्षांची उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे अजून कुणी पुढं येत नसावं.
भाऊसाहेब : सारेच उमदेवार हायेत व्हय रे, पक्षात काय इतर नेतेमंडळी, कार्यकर्त्यांना तोटा लागून चालला?
भाऊराव : तसा तोटा नाही, पण आजकाल राजकारण म्हटल्यावर जो तो आपल्या फायद्या-तोटय़ाचा विचार जरूर करू लागलाय. त्यामुळे उमेदवार आपल्या गटाचा, आपल्या सोयीचा असेल तरच कार्यकर्ते, नेते घराबाहेर पडतात. नाहीतर सगळेजण आपापल्या घरात. हाच सर्व पक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांचा हिशेब आहे.

‘गेल्या घरी तू ‘शांत’ रहा’
लोकसत्ता मधील ‘माझी अपेक्षा’ हे सदर मी अगत्याने वाचतो. त्यात मतदार आपापल्या परीने सूचना करतात. लोकप्रतिनिधींनी सतत संपर्कात रहावे, अडीअडचणी समजून घ्याव्यात, त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, आपल्या वाटेला आलेला निधी योग्य प्रकारे कारणी लावावा, वगैरे, वगैरे! जणू काही उमेदवाराला या गोष्टी माहितीच नाहीत. उमेदवार बारा गावचे पाणी प्यायलेला असतो आणि मुख्य म्हणजे तो मतदाराचे बारसे जेवलेला असतो. खरी गोष्ट ही की, काही सन्माननीय अपवाद सोडले तर बहुतेक उमेदवारांना हे काही करायचेच नसते, निवडून येण्यामागे त्यांचे अंतस्थ हेतू निराळेच असतात.

रेल्वे टर्मिनसबाबतची अनास्था दुर्दैवी
प्रश्न जिव्हाळ्याचे

प्रतिनिधी / नाशिक

शहर विकासाला खऱ्या अर्थाने वेग देण्याची क्षमता असलेल्या नाशिकरोड रेल्वे टर्मिनसचा प्रश्न रेल्वे बोर्डाने व्यवहार्य नसल्याचे कारण दाखवून नाकारला असला तरी स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था त्यास कारणीभूत ठरली आहे. रेल परिषदेच्या पाठपुराव्यामुळे टर्मिनसला आवश्यक असणारी सुमारे ५० एकर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दाखविली होती. तथापि, रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विपरित अहवालामुळे नाशिककरांसाठी रेल्वे टर्मिनसचा विषय दिवास्वप्न ठरते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या इतिवृत्तास मंजुरीनंतर महासभा तहकूब
प्रतिनिधी / नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन सभा तहकूब करण्यात आली. आचारसंहितेमुळे कोणत्याही नवीन विकासकामांना मंजुरी मिळणार नसल्याने अनेक सदस्यांनाही कामकाजात फारसा रस नसल्याचे दिसून आले.

राजकीय हेतूच्या कर्ज प्रकरणांमुळे कारखाने गोत्यात
शेतकरी सुखी तर देश सुखी असे म्हटले जाते. गाव, तालुका, तथा जिल्ह्य़ाला जोडणारा विकासाचा केंद्रबिंदू समजून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी साखर कारखान्यातील कारभार व गैरकारभाराबाबत गोडबोले समिती त्यानंतर कॅग अहवालातही गंभीर ताशेरे ओढले असून साखर सम्राटांच्या मनमानीस लगाम बसावा,

मनमाडमध्ये फुटबॉल स्पर्धा
मनमाड / वार्ताहर

मनमाड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ऑल इंडिया एस. सी. एस. टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे १ ते ७ एप्रिल या कालावधीत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड, नाशिकरोड, देवळाली, औरंगाबाद, भुसावळ, येवला, अहमदनगर येथील संघ या स्पर्धेत सहभागी होतील. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा रेल्वे मैदानाच्या डॉ. आंबेडकर क्रीडांगणावर होतील. अधिकाधिक संघांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष रत्नदीप पगारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रदीप गायकवाड यांच्याशी ९९२१६१९२२६, ९२२६५२८८८९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष पूर्णपात्रे
चाळीसगाव / वार्ताहर

येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष पूर्णपात्रे तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ अग्रवाल यांची अविरोध निवड झाली आहे. आ. बं. हायस्कूलमध्ये झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. सोसायटीच्या निवडणुकीत प्रगती पॅनलला आठ तर परिवर्तन पॅनलला सात जागा मिळाल्या होत्या. मंगळवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नेताजी सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रगती पॅनलचे प्रमुख नारायणदास अग्रवाल सभेस गैरहजर होते. दोन्ही पॅनलचे समसमान सदस्य उपस्थित असल्याने दोन्ही गटात एकमत होऊन अध्यक्षपदी परिवर्तनचे डॉ. पूर्णपात्रे तर उपाध्यक्षपदी प्रगतीचे जगन्नाथ अग्रवाल यांची अविरोध निवड झाली. पूर्णपात्रे यांच्या नावाची सूचना मंगेश पाटील यांनी केली तर अनुमोदन नितीन पाटील यांनी दिले. अग्रवाल यांच्या नावाची सूचना चंद्रकांत पाखले यांनी केली तर सुरेश चौधरी यांनी अनुमोदन दिले. अडीच वर्षांनंतर प्रगती पॅनलचे ज. मो. अग्रवाल हे अध्यक्ष राहतील, त्यामुळे उपाध्यक्षपद परिवर्तनाला दिली जाईल असे यावेळी ठरविण्यात आले.

पंचवटी महाविद्यालयातील असुविधा दूर करण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

विद्यार्थिनींची बाहेरील समाजकंटकांकडून होणारी छेडछाड, पिण्याच्या पाण्याची असुविधा, वाचन कक्षाची वानवा अशा विविध समस्यांमुळे पंचवटी महाविद्यालयातील विद्यार्थी त्रस्त असून या समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी विद्यार्थी कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. काही महिन्यांपूर्वी वादावादीतून बाहेरील समाजकंटकांकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती. गुंड प्रवृत्तीचे विद्यार्थी व समाजकंटकांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणीही समितीने केली आहे. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, वाचन कक्षाची निर्मिती करण्यात यावी, एका वर्गात ठराविक संख्येपुढे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशा मागण्याही समितीतर्फे करण्यात आल्या आहेत.

नंदुरबारमध्ये उष्म्याचा कडाका
नंदुरबार / वार्ताहर

मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच नंदुरबारमध्ये प्रचंड उकाडा जाणवण्यास सुरूवात झाली असून वाढत्या तापमानाचा परिणाम बाजारपेठेवरही जाणवू लागला आहे. जीवाची होणारी काहिली शांत करण्यासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून दुपारी रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण अत्यंत कमी होते. उकाडय़ाने बेजार झालेले नागरिक घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळत असले तरी आवश्यक कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ आल्यास डोक्यावर टोपी व रूमालाने कान, चेहरा पूर्णपणे झाकून घेतात. वाढत्या उन्हाचा फायदा घेण्यासाठी थंडपेय विक्री करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून उसाच्या रसासह, विविध थंड पेय, आइस्क्रिमच्या गाडय़ांसह छोटी छोटी दुकानेही सुरू झाली आहेत. आताच ही परिस्थिती तर पुढे काय होईल, याची चिंता नागरिकांना आहे. दिवसभर रोजीरोटीसाठी रस्त्याच्या कडेला बसणारे विविध वस्तुसह फळांचे विक्री करणारेही वाढत्या उन्हाने हैराण झाले आहेत.

आदिवासी व्यक्तिमत्त्व कार्यशाळा
नवापूर / वार्ताहर

आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे नवापूर तालुक्यातील नवागाव, आमलाण, गडद, बिलमांजरे, नागझरी, भरडू, खडकी व बिलवारा या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन नुकतेच झाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने स्वास्थ्य, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा या उद्देशाने ध्यान, योग प्राकृतिक चिकित्सा व शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल वाघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करीत आहेत. कार्यशाळेतील प्रतिभावान विद्यार्थ्यांची आणखी एक प्रेरणात्मक कार्यशाळा सु. हि. नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात २० मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेमध्ये सकाळी सात ते दहापर्यंत ध्यान, योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके डॉ. अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येतील. दुपारी अकरा ते दोन दरम्यान व्यक्तीमत्व विकास व बौध्दिक विषयासंदर्भात प्रा. संजय जाधव, नंदकिशोर माहेश्वरी व डॉ. रजिक अली शाह हे मार्गदर्शन करतील. सायंकाळी पाच ते साडेआठ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य, संगीत व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक,
मानसिक व सांस्कृतिक विकास घडून यावा व त्यांच्यामधील सुप्त शक्तीला ओळखून स्वतचे जीवनमान उंचाविण्याकरिता त्यांना तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वतरावर कार्य करण्याची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने अभियान राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ओळखपत्रांमधील चुकांमुळे मतदार हैराण
धुळे / वार्ताहर

मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांमध्ये त्रुटी आढळून येत असल्याने अशा सदोष ओळखपत्रांचा उपयोग काय, असा सवाल मतदारांकडून केला जात आहे. जिल्ह्य़ात सर्वच मतदारांना ओळखपत्र देण्याची घाईगर्दी सुरू आहे. ज्यांच्याकडे ओळख पत्रे नव्हती किंवा ती सदोष होती त्यांनी प्रशासनातर्फे वितरित झालेल्या नमुना अर्जामध्ये माहिती भरून ती संबंधित यंत्रणेच्या स्वाधीन केली. या अर्जामधले स्वत:ची माहिती, जन्मतारीख, लिंग, पत्ता, वडिलांचे नाव मतदारसंघ याचा अचूक उल्लेख करूनही नवीन ओळखपत्रांमध्ये चुका कायम आहेत. यामुळे एका भागातील व्यक्ती एखाद्या दूरवरच्या वसाहतीत तर या विधानसभा मतदारसंघातील व्यक्ती अन्य विधानसभा मतदार संघात आणि १९७० मध्ये जन्मलेली व्यक्ती १९७४ मध्ये जन्मल्याचा तर पुल्लींगी व्यक्तीला स्त्रीलिंगी करण्याचे प्रताप झाले आहेत. एवढेच नाही तर स्वत:च्या नावाचा पूर्ण उल्लेख असताना वडीलांचे नाव म्हणून त्या मतदाराचेच नाव छापण्याचेही प्रकार घडल्याच्या तक्रारी होवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्यांनी ओळखपत्र घेतलेच नव्हते त्यांच्यासाठी आणि ज्यांनी ओळखपत्र घेतले पण त्यात चुका झाल्या असतील त्यांच्यासाठी अशा वेगवेगळ्या कामांसाठीचे स्वतंत्र नमुना कर्ज वितरित करण्यात आले होते. ही ओळखपत्रे किती, कुठे आणि का आवश्यक आहेत त्यातील मजकूर (माहिती) अचूक का भरावी अशी कारणे अधिकाऱ्यांनी या अधिच स्पष्ट केली होती. त्यामुळे सर्वानीच हे जबाबदारीचे काम मुदतीच्या आत पूर्ण करून यंत्रणेकडे सोपविले होते. परंतु या उपरही प्रशासनाने वितरित केलेल्या अशा ओळखपत्रांमध्ये अक्षम्य चुका झाल्याचे उघड झाले आहे. ज्यांना वयाचा दाखला किंवा पत्ता अचूक सांगायचा असेल आणि पारपत्र किंवा अन्य महत्त्वपूर्ण कामासाठीची माहिती द्यायची असेल त्याला हे ओळखपत्र कोणत्याही अधिकाऱ्याला दाखविणे शक्य होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाने आरोग्य शास्त्रांचा अधिक विकास शक्य- डॉ. मुजुमदार
नाशिक, १८ मार्च / प्रतिनिधी

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहकार्याने आरोग्यशास्त्रातील विविध शाखांचा अधिक विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन राजीव गांधी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशनचे सल्लागार डॉ. पी. डी. मुजूमदार यांनी केले. येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास नुकतीच त्यांनी भेट दिली. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात आयोगाचे सल्लागार डॉ. प्रकाश डोळस, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संचालक डॉ. आर. एस. परांजपे, श्रीमती मुजूमदार, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृदुला फडके, व्यस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. कानन येळीकर, प्रभारी कुलसचिव डॉ. सुनिल फुगारे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुजूमदार यांनी विविध विषयांना स्पर्श केला. विज्ञान व तंत्रज्ञानाचा राज्यात अधिक विकास होण्याच्या दृष्टीकोनातून राजीव गांधी सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी कमिशनची स्थापना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. आरोग्यशास्त्र शाखांमधील संशोधनात विज्ञान व तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग करून घेतल्यास प्रगतीचा मोठा टप्पा गाठणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले. डोळस यांनी आयोगाच्या कार्याबद्दल माहिती दिली. परांजपे यांनी विज्ञान शाखेच्या अनुषंगाने आरोग्य शास्त्राचे महत्व सांगितले. डॉ. येळीकर यांनी आरोग्य विद्यापीठ व राजीव गांधी सायन्स कमिशन यांनी संयुक्त प्रकल्प कार्यक्रम हाती घ्यावेत अशी सूचना केली. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले.

जुगाराच्या अड्डय़ावर छापा; ३८ जणांना अटक
सांगली, १८ मार्च / प्रतिनिधी

सांगली शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील कुबेर कॉम्प्लेक्समधील जुगाराचा अड्डा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश व विशेष पथकाने मंगळवारी उद्ध्वस्त केला. या अड्डय़ावर जुगार खेळणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात शहरातील अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. एका माजी नगरसेवकाच्या सहकार्याने हा अड्डा सुरू असल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. अटक केलेल्यांत युसुफ हुसेन पठाण, दत्ता अर्जुन शिंदे, अशोक शेट्टी, किशोर शेट्टी, राजाराम हाक्के, राजाराम संकपाळ, व्यंकटेश गुडीसागर, अभिजित मोरकाने, शशिकांत आवळे, शिवाजी पाटील, संजय पाटील, फिरोज हाकीम, मुरलीधर कोळी, मुसा सनदी, सतीश कोळी यांच्यासह ३८ जणांचा समावेश आहे.

मधुमेही स्वास्थ्य संवर्धन मंडळातर्फे नाशिक येथे आरोग्य शिबीर
प्रतिनिधी / नाशिक

येथील मधुमेही स्वास्थ्य संवर्धन मंडळाच्यावतीने शहरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २९ मार्च व ५ एप्रिल रोजी हा उपक्रम होणार असून मधुमेही स्वास्थ्य संवर्धन मंडळाचे सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी तो खुला आहे. शिबिरासाठी नावनोंदणी सुरू असून अधिक माहितीसाठी एकनाथ कोटकर यांच्याशी ०२५३-२५८०१०८ अथवा ९४२२२९२१५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.