Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

गटागटाची काटाकाटी!
भाऊसाहेब :
निवडनुकीचं वारं जोरात असलं तरी आपली नेतेमंडळी कुटं दिसत न्हाईत त्ये, भावराव..
भाऊराव : हो, प्रमुख पक्षांची उमेदवारी जाहीर झाली नसल्यामुळे अजून कुणी पुढं येत नसावं.
भाऊसाहेब : सारेच उमदेवार हायेत व्हय रे, पक्षात काय इतर नेतेमंडळी, कार्यकर्त्यांना तोटा लागून चालला?
भाऊराव : तसा तोटा नाही, पण आजकाल राजकारण म्हटल्यावर जो तो आपल्या फायद्या-तोटय़ाचा विचार जरूर करू लागलाय. त्यामुळे उमेदवार आपल्या गटाचा, आपल्या सोयीचा असेल तरच कार्यकर्ते, नेते घराबाहेर पडतात. नाहीतर सगळेजण आपापल्या घरात. हाच सर्व पक्षीय नेत्या-

 

कार्यकर्त्यांचा हिशेब आहे.
भाऊसाहेब : राजकारन म्हंजे काय व्यापार-धंदा हाय? हिसाब-किताब, फायदा-तोटा पाहायला..
भाऊराव : आता सगळं तसंच झालंय. विचारा या भावडय़ाला नव्या जमान्याची नवी गणितं. उमेदवाराला त्याच्याच पक्षाचे कार्यकर्ते पहिल्यांदा विचारतात, साहेब, ‘आपलं काय’, आणि सुरू होतो मग फायदा अन् तोटा..
भावडय़ा : आढेवेढे कशाला, सरळ सांगतो ना, ‘फायदा-तोटा अन् त्याहीपेक्षा नोटा’ यावरच सगळं काही अवलंबून असतं.
भाऊसाहेब : आयला, येकदम रोकडा हिसाब म्हनायचा की हा!
भाऊराव : तुमच्या काळात तत्वनिष्ठ मंडळी त्या त्या विषयाचा अभ्यास करून संबंधित मंत्री-अधिकाऱ्यांना रोकडा सवाल करीत विविध मुद्दय़ांवरून त्यांना कोंडीत पकडत. आमच्यावेळची मंडळी अशा सवालांना गोलमाल उत्तरं कशी द्यायची याच्या हिशेबात तरबेज झाली होती. आता तर काय, राजकारणातल्या सगळ्या सवाल-जवाबांचं गुणोत्तर फक्त ‘रोकडा’ एवढंच निघताना दिसतं.
भावडय़ा : ‘वरती’ सगळे हिशेब अशाच पद्धतीने चालत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मग का उगाच उन्हातान्हात घाम गाळत फिरायचं?
भाऊसाहेब : आरं, पन पक्ष कार्य म्हटल्यावर उन-वाऱ्यात फिरावचं लागनार, तहान-भुकेची पर्वा न करता लोकांन्ला भेटावचं लागनार, आपल्या पक्षाचं, उमेदवाराचं म्हनंन मद्दारांना सांगावचं लागनार. येरवी आपसातले बखेडे ठीक, पर निवडनुका लागल्यावर, पक्षानं उमेदवार दिल्यावर साऱ्यांनी येकदिलानं पुडं जायला हवं..
भाऊराव : हे झालं पूर्वीचं सूत्र. आता पक्षांतर्गत गटबाजी एवढी टोकदार झाली आहे की आपल्याच पक्षातल्या अन्य गटाच्या उमेदवाराऐवजी विरोधी उमेदवारही यांना जवळचा वाटतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळं झालेला दशरथअप्पांचा पराभव हेच सांगतो, काय भावडय़ा?
भावडय़ा : गटबाजी काय फक्त तरुणांच्या पक्षात किंवा पक्षा-पक्षांतल्या तरुणांमध्येच आहे? पण, स्वत: करून सवरून नामानिराळं राहत आमच्या माथी खापर फोडायचं, यालाच आम्ही ‘राजकारणातलं पॉलिटिक्स’ म्हणतो. सेनेत कधी नव्हे एवढी गटबाजी झाली आहे, पण काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपतल्या बंडखोरीवर बोला की..
भाऊसाहेब : फिरत ऱ्हातोस ना इकडं-तिकडं, मग तूच सांग की जरा समजून.
भावडय़ा : गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता गृहित धरूनच नाशकात पिंगळेंचं नांव सध्या राष्ट्रवादीत मागे पडलं आहे, भुजबळ आणि डॉक्टर पवारांची तोंडही विरुद्ध दिशेला आहेत. गटबाजीचंच दुसरं नांव काँग्रेस. त्यामुळेच नाशकात इच्छुकांचे अर्ज दाबून ठेवण्याच प्रकार घडला तर धुळ्यात रोहीदासदाजी अन् अमरिशभाईंमध्ये तिकीटासाठी धुळवड सुरू आहे. नंदुरबारमध्ये माणिकरावदादा आणि नाईक साहेबांमधली कुरबुर लपून राहिलेली नाही. जळगावध्ये भाजपचा प्रभाव असला तरी कदाचित गटबाजीचा विचार करूनच दादांनी सेनेचा पर्याय निवडला असावा, असं सांगतात.
भाऊसाहेब : कठीनंच म्हनायचं सगळ्या पक्षांचं अन् उमेदवारांचं.
भावडय़ा : म्हणूनच आमचं ठरलंय. पक्ष, त्याची धोरणं, प्रचार यापेक्षा आपला गट बरा अन् आपण बरे. उमेदवारी आपल्याकडं आली तर ‘जय हो’ म्हणायचं, नाहीतर दुसऱ्या गटातल्या उमेदवाराचा येळकोट करण्यासाठी विरोधी उमेदवाराला हातभार लावायचा. एकदम ‘रोकडा’ हिसाब.. काय !
पॉलिटिशन
rangeelarangari@gmail.com