Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘गेल्या घरी तू ‘शांत’ रहा’
लोकसत्ता मधील ‘माझी अपेक्षा’ हे सदर मी अगत्याने वाचतो. त्यात मतदार आपापल्या परीने सूचना करतात. लोकप्रतिनिधींनी सतत संपर्कात रहावे, अडीअडचणी समजून घ्याव्यात, त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, आपल्या वाटेला आलेला निधी योग्य प्रकारे कारणी लावावा, वगैरे,

 

वगैरे! जणू काही उमेदवाराला या गोष्टी माहितीच नाहीत. उमेदवार बारा गावचे पाणी प्यायलेला असतो आणि मुख्य म्हणजे तो मतदाराचे बारसे जेवलेला असतो. खरी गोष्ट ही की, काही सन्माननीय अपवाद सोडले तर बहुतेक उमेदवारांना हे काही करायचेच नसते, निवडून येण्यामागे त्यांचे अंतस्थ हेतू निराळेच असतात.
आपण निवडून देतो ते उमेदवार काय लायकीचे असतात? काही सन्माननीय अपवाद असतीलही, पण ते अपवादच! निवडणुकीत आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका अफाट खर्च होतो, शासनाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक. त्याचा तपशील देऊन मी जागा अडवीत नाही; तर हा झालेला खर्च उमेदवार वसूल करणारच. अगदी दुपटी-तिपटीने वसूल करणार. एक तर पुढच्या निवडणुकीसाठी बेगमी आणि नंतर पुढच्या सात पिढय़ांसाठी तरतूद. पुन्हा संधी मिळते न मिळते! तेव्हा यातून वेळ मिळाला तर पुढच्या गोष्टी. म्हणजे मतदारांच्या अडीअडचणी सोडविणे वगैरे.
इतके दिवस गुन्हेगार उमेदवारांना बाहेरून मदत करीत, आता तर ते स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, आणि निवडूनही येतात. हे लोक काय जनतेच्या कल्याणासाठी निवडणूक लढवतात? प्रत्येक पक्षात असे गुन्हेगार खासदार आहेत. काही उमेदवार तर तुरुंगातून निवडणूक लढवतात. आणि हे पक्ष तरी अशा उमेदवारांना तिकीट का देतात? कारण पक्षांचेही हितसंबंध त्यात गुंतलेले असतात.
त्यात पुन्हा घराणेशाही आली. बापाच्या तालमीत पोरगं तयार झालेलं असतं. त्याला निराळे धडे द्यावे लागत नाहीत. बापाचे कर्तृत्व तो जवळून पहात असतो. शिवाय जोडीला बियरबाला, बारबाला, जुगार या सर्व गोष्टी आल्याच. त्यात काही गडबड झालीच तर निस्तरायला बाप आहेच. आणखीन एक महत्वाची गोष्ट! काही महाभागांच्या तर पिढय़ान् पिढया निवडून येत असतात. काही सन्माननीय अपवाद सोडल्यास कर्तृत्व काही नाही, पैसा आणि गुंडगिरी हेच भांडवल! हे आपल्याकडेच आहे असे नाही, तर पुढारलेल्या अमेरिकेतही तेच आहे. वर्षांनुवर्षे तेच ते लोक निवडून येतात. तिकडेही सर्वसाधारणपणे टीकेचा सूर हाच असतो. आपल्या The Audicity of Hope या पुस्तकात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात - All of which leads to the conclusion that if we want anything to change in Washington, we’ll need to throw the rascals out... And yet year after year we keep these rascals right where they are, with the re-election rate for house members hovering around 96%.
त्यात पुन्हा जात हा प्रकार जबरदस्त प्रभाव टाकतो. पूर्वी जातीयवाद छुपा तरी होता. आता त्याचे उघडेनागडे ओंगळवाणे स्वरूप उघडय़ा डोळ्यांनी आपण असहाय्यपणे पहात आहोत. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे तर आतून पक्के जातीयवादी असतात. आता आपला देश नुसता प्रांतवार नव्हे तर जातनिहाय विभागला गेला आहे. राज्याराज्यातून जातींच्या अगणित ठिगळात जनता विभागली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी असंख्य हालअपेष्टा भोगल्या, प्रसंगी प्राणार्पण केले त्यांनी हेच स्वप्न पाहिले होते काय?
बरं! पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर आणि जातीच्या पाठबळावर जे निवडून जातात, तिथे तरी स्वत:च्या निवडणुकीला न्याय देतील की नाही? बहुतांश लोकप्रतिनिधी आरडाओरड करुन गोंधळ घालण्यातच धन्य मानतात. किती प्रतिनिधी अभ्यास करुन लोकसभेत किंवा विधीमंडळात जातात? कामाचे तास कारणी लावतात ? जो अभ्यास करुन बोलायला जातो, त्याला बोलूही देत नाहीत. यात मात्र महाराष्ट्रातील खासदारांचा अपवाद करीन. त्यांचं हिंदी बेताचं, इंग्रजी दिव्य! अगदी मान्यवरांचंही ! काही अपवाद सोडले तर विषयाचा अभ्यास बेताचा. जवळजवळ मौनीच असतात ते. मागे एकदा मौनी खासदारांची यादीच प्रसिध्द झाली होती. त्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला असावा. असो.
काही अपवाद सोडले तर नीतिमत्ता नावाची चीजच या लोकप्रतिनिधींमध्ये नसते. म्हणूनच की काय Politics is a game of scoundrels असे म्हटले असावे. म्हणूनच लायकी असून सुध्दा सभ्य माणूस निवडणुकीच्या फंदात पडत नाही. चुकून पडलाच तर त्याची डाळ शिजत नाही. तर असे हे आपले लोकप्रतिनिधी! दुर्देवाने त्यांनाच आपल्याला मते द्यावी लागतात. कारण तेच ते आलटून पालटून आपल्या समोर येतात. आणि खरं सांगायचं तर त्यांना आपल्या मतांची गरजही नसते. त्यांचे खरेखोटे मतदार निराळेच असतात. हिशेबही निराळे असतात. तर अशा या उमेदवारांकडून म्या पामराच्या काय अपेक्षा असणार? गेल्या घरी तू ‘शांत’ रहा एवढीच कळकळीची विनंती. वसुलीची गणितं त्याची त्याला माहिती! तेव्हा मनापासून शुभेच्छा !
वसंत जहागिरदार, नाशिक