Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

युती, आघाडीचे अडले घोडे; बसप, मनसेची तयारी जोरात
नाशिक / प्रतिनिधी

सेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे गाडे उमेदवार निश्चितीवरून अडले असताना बसपचे उमेदवार महंत सुधीरदास यांनी इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील प्रचाराची

 

एक फेरीही पूर्ण केली असून आता पुढील प्रचाराची फेरी नाशिकमध्ये करण्याचे त्यांचे नियोजन आहे. मनसेनेही थेट राज ठाकरे यांच्या सभेव्दारे प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली असून ही सभा जंगी व्हावी, यासाठी मनसेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदार संघांपैकी नाशिक या एकमेव मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार आहे. इतर पाचही मतदार संघ जागा वाटपात भाजपला गेल्यामुळे ही एकमेव जागा कोणत्याही परिस्थितीत सेनेच्या ताब्यात आली पाहिजे, यासाठी सेनेचे स्थानिक पदाधिकारी व्यूहरचना करण्यात मग्न झाले असून उमेदवार निश्चित झाल्यावर बैठकांना अधिक जोर येईल. सुनील बागूल किंवा दत्ता गायकवाड यांच्यापैकी एक नाव सेनेतर्फे निश्चित करण्यात येईल, असे सांगितले जाते. बागूल यांना उमेदवारी दिल्यास जमेच्या बाजू कोणत्या राहतील व नुकसानकारक बाजू काय राहतील तसेच गायकवाड यांची उमेदवारी शहरी भागासाठी कितपत लाभदायक ठरू शकेल, याविषयी पक्षाच्या नेत्यांमध्ये अधिक खल करण्यात येत आहे. लोकसभेच्या मागील निवडणुकीत आलेला गटबाजी व तटस्थपणाचा अनुभव लक्षात घेता यावेळी मात्र जो उमेदवार निश्चित करण्यात येईल, त्याच्या विजयासाठी सर्वानी एकदिलाने प्रयत्न करण्याचे ‘मातोश्री’ वरूनच बजावण्यात आल्याची चर्चा आहे.
सेनेसारखीच स्थिती राष्ट्रवादीमध्येही असून समीर भुजबळ की डॉ. वसंत पवार यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित असले तरी देविदास पिंगळे समर्थकांनीही अजून उमेदवारीची आशा सोडलेली नाही. काँग्रेसबरोबरचा जागा वाटपाचा घोळ मिटल्याशिवाय राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीमुळे युती आणि आघाडी यांच्या कार्यकर्त्यांना सध्या गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. दुसरीकडे बसपचे उमेदवार महंत सुधीरदास यांनी धडाक्यात प्रचार सुरू केला आहे. मनसेनेही शनिवारी राज ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले असून या सभेचा मनसेच्या उमेदवाराला मोठय़ा प्रमाणावर फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ही सभा विक्रमी ठरावी यासाठी मनसे पदाधिकारी कामाला लागले आहेत.